Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३१ मार्च २००९

वैशाखात तयार केलेले मसाले वर्षभर चांगले टिकतात. त्यामुळे मसाले बनवून देणाऱ्या डंकिनींबाहेर गृहिणींची झुंबड उडालेली दिसते. लालबाग येथील डंकिनीच्या दुकानाबाहेरही सध्या हेच चित्र पाहायला मिळते. तेथे एका दुकानाबाहेर मसाला करण्यापूर्वी उन्हात सुकविण्यासाठी पसरलेल्या मिरच्यांचे हे छायाचित्र .

एलआयजीवासीयांना रिहॅब एरिया निश्चित करण्यावर म्हाडा ठामच!
बिल्डर तयार नसल्यास म्हाडा करणार पुनर्विकास

प्रतिनिधी

म्हाडा वसाहतींमधील अल्प उत्पन्न गटातील (एलआयजी) रहिवाशांना इन्सेंटिव्ह एफएसआयचा (अतिरिक्त एफएसआय) लाभ देण्यासाठी रिहॅब एरिया निश्चित करणे आवश्यक आहे, असे म्हाडा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. रहिवाशांना ३०० चौरस फूट ‘रिहॅब एरिया’ निश्चित करण्याचे ठरले असून त्यावर ६० टक्के इन्सेंटिव्ह एफएसआय (१८० चौरस फूट) मिळणार असल्यामुळे प्रत्येक रहिवाशाला ४८० चौरस फूट इतका एफएसआय वाटय़ाला येणार आहे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

भांडुप ‘स्काय वॉक’बाबत एमएमआरडीएची लपवाछपवी!
बंधुराज लोणे

शहरात बांधण्यात येणाऱ्या ‘स्कॉय वॉक’च्या विरोधात स्थानिक जनता संघटित होऊन प्रश्न विचारत असल्याने एमएमआरडीएची पंचाईत झाली आहे. स्थानिक जनतेला उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे भांडुप येथील ‘स्कॉय वॉक’. ‘स्कॉय वॉक’ न बांधताही भांडुप स्थानकाजवळ होणारी वाहतूक कोंडी दूर करणे शक्य असल्याचा स्थानिक रहिवाशांनी सुचविलेला पर्याय वाहतूक खाते, पालिकेने २००३ मध्ये मान्य केला असला तरी ‘स्कॉय वॉक’ बांधण्याचा अट्टाहास एमएमआरडीएने चालविला आहे. याबाबत रहिवाशांना अर्धसत्य माहिती दिली जात असल्याचा आरोप केला जात आहे.

क्रेडिट कार्डाने केली उकल
मालाडमधील लेडिज बारमध्ये मनिषा ठाकूरचे बरे चालले होते. आकर्षक मनिषा अनेक ग्राहकांचे आकर्षण बनली होती. त्यामुळेच डान्स बार बंद झालेले असले तरी ती बऱ्यापैकी माया जमवीत होती. तिचे ठरलेले ग्राहक हमखास यायचे. त्यामध्ये शाहिद खान हा चित्रपट क्षेत्रातील कला दिग्दर्शक तर दररोज यायचा. तिच्यावर बऱ्यापैकी पैसे उधळायचा. त्यांच्या भेटी-गाठीही सुरू झाल्या. मनिषाचे त्याच्यावर प्रेम जमले होते का ते कळायला मार्ग नव्हता. मात्र शाहिद पुरता तिच्या जाळ्यात अडकला होता.

गुरुवारपासून ‘म..मराठीचा’
मराठी वृत्तवाहिन्या आणि मराठी मनोरंजन वाहिन्यांचे जाळे विस्तारते आहे. मी मराठी ही वाहिनी गुढीपाडव्यापासून नव्या रूपात सुरू झाली आहे. दैनंदिन मालिका, स्पर्धात्मक कार्यक्रम, मुलाखतीचा कार्यक्रम असे विविध ११ नवीन कार्यक्रम मी मराठी वाहिनी सुरू करणार आहे. ‘मी मराठी सिनेमा सिनेमा’ याअंतर्गत दर रविवारी संध्याकाळी ७.३० वाजता मराठी चित्रपट दाखविण्यात येतील. २३ एप्रिलपर्यंत चित्रपटाच्या दरम्यान प्रश्नमंजुषा घेतली जात असून त्यामध्ये चित्रपटावर आधारित प्रश्न विचारले जातील.

गाता रहे मेरा दिल..
हिंदी चित्रपटसृष्टीतील किशोरकुमार हे व्यक्तिमत्व म्हणजे असे काही अजब रसायन होते की त्याने केलेली कोणतीही गोष्ट दखलपात्र होत असे. गायक म्हणून तो एक मोठा कलाकार होताच, पण त्याच्यातील विनोदी अभिनेता आणि निरनिराळे अंगविक्षेप करून त्याची नाचण्याची पध्दतही विलक्षण होती. गाण्यामध्ये मर्यादेपेक्षाही धमाल करावी ती किशोरनेच..मुळात त्याच्यासारखे यॉडलिंग कोणालाही जमत नसे..जगात तोच एक गायक होता की हा प्रकार त्यानेच शोधून काढला असावा, अन त्यानेच मिरवला असावा. दादा बर्मन, राहुल देव बर्मन, ओ. पी. नय्यर, रवी आणि सी. रामचंद्र यांनी त्याच्यातील गायकाला आपल्या खास अंदाजात वापरले, त्यातही बर्मन पितापुत्रांचे त्याच्या कारकीर्दीतील योगदान फार मोठे आहे. सचिनदाँ हेच त्याला पूर्णपणे काबूत ठेवू शकायचे.

ऑटिझम
२ एप्रिल रोजी ऑटिझम दिनानिमित्त आशियाना इन्स्टिटय़ूट फॉर ऑटिझम या संस्थेतर्फे आजच्या महाविद्यालयीन तरुण-तरुणींना ऑटिझमविषयी माहिती व्हावी, लोकांमध्ये ऑटिझम झालेल्या मुलांच्या समस्या काय असतात याविषयी जनजागृतीपर कार्यक्रम विलेपार्ले पूर्व येथील साठय़े महाविद्यालयाच्या ऑडिटोरियममध्ये सकाळी ११ वाजता होणार आहे. यावेळी आशियाना इन्स्टिटय़ूटच्या शाळेतील मुले साठय़े महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसमोर नृत्याविष्कार सादर करणार असून संस्थेचा कर्मचारीवृंद छोटेसे नाटक सादर करतील. तसेच त्यानंतर संस्थेचे विश्वस्त अच्युत गोडबोले, सुहासिनी मालदे आदी मान्यवर ऑटिझम या आजाराविषयी सविस्तर माहिती देणार आहेत.

धूतपापेश्वर: भट्टीचे लवकरच स्थलांतर
प्रतिनिधी

१३५ वर्षांची प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या पनवेलमधील श्री धूतपापेश्वर आयुर्वेदिक कारखान्यामुळे परिसरातील नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे या कारखान्यातर्फे सांगण्यात आले आहे. गेल्या काही दिवसात कारखान्याची बदनामी करणारी वृत्ते काही ठिकाणी प्रसिद्ध झाली आहेत. तसेच कारखान्याविरुद्ध चुकीच्या तक्रारी नोंदविल्या जात आहेत; परंतु यात काहीच तथ्य नसून नागरिकांना इजा पोहोचेल, अशी कोणतीही कार्यपद्धती राबविली जात नसल्याचा दावाही कारखान्याने केला आहे.

दिलीप पाटील व मदन शिरकांडे या शिक्षकांचा सन्मान
प्रतिनिधी

कांदिवली येथील एकवीरा हायस्कूलमधील गणिताचे शिक्षक दिलीप पाटील व हिंदीचे शिक्षक मदन शिरकांडे यांना प्रगत महाराष्ट्र फेलोशिप पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे. प्रगत महाराष्ट्र पाक्षिकातर्फे दरवर्षी सामाजिक, शैक्षणिक, महिला व बालकल्याण आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना या पुरस्काराने सन्मानित केले जाते. दिलीप पाटील गेल्या २२ वॉर्षांपासून दिलीप पाटील गणित विषय शिकवतात, तर मदन शिरकांडे गेल्या १४ वर्षांपासून हिंदी विषय शिकवत आहेत. विद्यार्थ्यांच्या मनातील गणिताची भिती घालविण्यासाठी पाटील हे वृत्तपत्रांच्या माध्यमातूनही सातत्याने लेखन करीत असतात. अनेक शाळांतून १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित विषयावरील त्यांची व्याख्याने आयोजित केली जातात. बृहन्मुंबई गणित अध्यापक मंडळ व विज्ञान अद्यापक मंडळाचे ते सभासद आहेत. शिरकांडे यांचादेखील विविध सामाजिक संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध आहे. ओघवती भाषाशैली व विषयाचे सखोल ज्ञान यामुळे हे दोन्ही शिक्षक चांगलेच विद्यार्थीप्रिय आहेत.

गिरणी कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांना घेराव
प्रतिनिधी

शहरातील उध्वस्त गिरणी कामगारांच्या ज्वलंत प्रश्नांकडे राजकारण्यांचे लक्ष वेधण्यासाठी गिरणी कामगार कर्मचारी निवारा आणि कल्याणकारी संघ येत्या १५ दिवसांत सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रमुखांना घेराव घालून, त्यांना जाब विचारणार आहे. त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, शिवसेना व भाजपा या प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रमुखांचा समावेश आहे. सर्वप्रथम उद्या ३१ मार्च रोजी दुपारी तीन वाजता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना घेराव घालण्याचा इशारा इशारा संघाने दिला आहे. त्याचप्रमाणे २ एप्रिल रोजी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील, ६ एप्रिल रोजी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि ८ एप्रिल रोजी भाजपा प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांना घेराव घालण्यात येणार असल्याचे संघाने कळविले आहे.

‘उन्नती आपल्या हाती’ पुस्तकाचे प्रकाशन
प्रतिनिधी

महापालिकेच्या विकास कामांचे टेक्निकल ऑडीट केल्यास आर्थिक घोटाळा होणार नाहीत व कामाचा दर्जा सुधारेल, असा विश्वास कल्याण- डोंबिवली महापालिकेचे माजी शहर अभियंता हिरालाल ओसवाल यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. माजी शहर अभियंता हिरालाल ओसवाल यांनी व्यावसायिक जीवनातील अनुभवातून जनतेचे प्रश्न सोडविणे कसे शक्य आहे. याविषयीचे अनुभव कथन करणारे ‘उन्नती आपल्या हाती’ हे पुस्तक लिहिले आहे. पुस्तकाचा प्रकाशन सोहळा १० एप्रिलला सकाळी साडेदहा वाजता आचार्य अत्रे रंगमंदिरात अ‍ॅड. उज्जवल निकम यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ‘लोकसत्ता’चे संपादक कुमार केतकर स्वीकारणार असल्याचे त्यांनी सांगितले. या पुस्तकाची प्रस्तावना भारत सरकारच्या जलआयोगाचे माजी अध्यक्ष माधवराव चितळे यांनी लिहिली आहे तर मुखपृष्ठ व रेखाचित्र व्यंग चित्रकार ज्ञानेश सोनार यांनी तयार केले आहे.