Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३१ मार्च २००९

निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडेल - महानिरीक्षक गुप्ता
नगर, ३० मार्च/प्रतिनिधी

नगर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीवर पोलिसांचे बारीक लक्ष असून, निवडणूक प्रक्रिया शांततेत व भीतीमुक्त वातावरणात पार पडेल, अशी ग्वाही नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सूर्यप्रताप गुप्ता यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. निवडणुकीच्या बंदोबस्ताचे नियोजन सध्या सुरू आहे. जिल्ह्य़ातील पोलिसांव्यतिरिक्त बाहेरून बळ मागवावे लागणार आहे.

जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांना बाजूला ठेवा - पवार
उमेदवार कर्डिले अनुपस्थित
शेवगाव, ३० मार्च/वार्ताहर
फुले, आंबेडकर व महात्मा गांधी, नेहरूंची विचारसरणी स्वीकारणाऱ्या समविचारी कार्यकर्त्यांची सामुदायिक शक्ती उभारून जातीय द्वेष निर्माण करणाऱ्यांना बाजूला ठेवावे. कोणत्याही स्थितीत महाराष्ट्राचा गुजरात होऊ देणार नाही, असे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे प्रचारसभेत बोलताना सांगितले. नगर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांच्या प्रचारार्थ झालेल्या आयोजित सभेत ते बोलत होते.

आठवले यांच्या प्रचारात खा. विखे सहभागी होणार
मंत्री विखेंची मुख्यमंत्र्यांना ग्वाही
श्रीरामपूर, ३० मार्च/प्रतिनिधी
शिर्डी मतदारसंघातील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार खासदार रामदास आठवले यांच्या प्रचारात खासदार बाळासाहेब विखे सक्रिय होतील, अशी ग्वाही शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आज मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना दिली. आठवले गुरुवारी (दि. २) नगरला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, खासदार विखे त्यावेळी उपस्थित राहणार आहेत. आठवले यांच्या प्रचारासाठी शनिवारी (दि. ४) अकोले व क कोपरगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभा आयोजिण्यात आल्या आहेत.

युतीच्या गटनेतेपदी अनिता राठोड
मनपा स्थायी समिती निवडीचा मार्ग मोकळा
नगर, ३० मार्च/प्रतिनिधी
महापालिकेतील शिवसेना-भाजप व ३ अपक्ष अशा ३३जणांच्या गटाचा नेता म्हणून शिवसेनेच्या वतीने आज नगरसेविका अनिता राठोड यांच्या नावाचे पत्र प्रशासनाला देण्यात आले. त्यामुळे आता स्थायी समिती सदस्य निवडीसाठी सर्वसाधारण सभा बोलविण्याची प्रशासनासमोरची अखेरची अडचण दूर झाली आहे.सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी, तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या गटनेत्यांची नावे यापूर्वीच प्रशासनाला दिली आहेत.

लांडगेतोड
चौथीत शिकणाऱ्या एका निरागस मुलाने ‘लांडगेतोड होणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ विचारला व लहानपणी प्रत्यक्ष पाहिलेल्या एका घटनेच्या स्मृती माझ्या मनात जाग्या झाल्या. मी तेव्हा सातवीत होतो. रविवार असल्यामुळे कुटुंबीयांसमवेत शेतावर गुरे राखण्यासाठी गेलो होतो. नुकतीच ज्वारीची कापणी झाल्यामुळे शिवारात गुरे व शेळ्या चारण्यासाठी सर्व गुराखी एकत्र जमले होते. सायंकाळी अचानक कोलाहल झाला. हाका आणि आरोळ्यांनी शिवार दणाणून गेले. ‘लांडगे आले, लांडगे आले’.. आम्ही अवतीभोवती पाहीपर्यंत लांडग्याने शेळ्यांच्या कळपात प्रवेश केला होता.

‘नगररचना’तील अनागोंदी
सगळे शहर एक प्रकारच्या नागरी असंतोषाच्या ज्वालामुखीवर बसले आहे. या ज्वालामुखीचे लहान-मोठे उद्रेक सारखे होत असतात. साध्या साध्या नागरी सुविधाही मिळत नसल्याने वैतागलेले, त्रस्त झालेले नागरिक हे उद्रेक घडवतात. महापालिकेचे प्रशासन व लोकप्रतिनिधी लवकर जागे झाले नाहीत, तर एकच मोठा उद्रेक कधी होईल हे कळणारदेखील नाही. मनपाच्या नगररचना विभागात नुकताच असा एक लहान उद्रेक झाला. अधिकाऱ्याच्या साध्या स्वाक्षरीसाठी नागरिकांना खोळंबायला लागले.

नगरकरांना ‘गृहित’ धरू नका!
वीस वर्षे! तीसुद्धा सलग! सेना-भाजप युतीचा भगवा झेंडा नगर शहर विधानसभेवर फडकतो आहे. तो खाली घेण्याचा अनेकदा प्रयत्न झाला, पण प्रत्येक वेळी फसला. सेना-भाजपचाच विजय झाला व तोही चढत्या भाजणीने! दर वेळी तोच प्रमुख प्रतिस्पर्धी असतानाही मतदारांना किमान एकदा तरी त्याला संधी द्यावी, असे वाटले नाही. आंधळेपणाने मतदान होते असे म्हणावे तर प्रत्येक वेळी ते वाढते कसे?
लोकसभेची निवडणूक दुसऱ्यांदा (मधल्या ५ वर्षांच्या खंडाने) लढवत असलेले सेना-भाजप युतीचे उमेदवार दिलीप गांधी यांच्या समर्थकांना नेमकी हीच गोष्ट फायद्याची वाटते.

पक्षचिन्हाचे राजकारण!
काँग्रेसचे पूर्वीचे चिन्ह ‘गाय-वासरू’ होते. ‘गाय-वासरू नका विसरू’, असा निवडणुकीतील प्रचार आजही बुजुर्ग मतदारांच्या स्मरणात आहे. काँग्रेसमधील फुटीनंतर हे चिन्ह गोठविले गेले आणि पंजा चिन्ह मिळाले. पूर्वी जनसंघाचे चिन्ह ‘दिवा’ होता. आता भाजपचे ‘कमळ’ चिन्ह आहे. कम्युनिस्ट पक्षाचे ‘विळा-कणीस’ आणि ‘विळा-हातोडा’ हे चिन्ह मात्र कायम आहे. रिपब्लिकन पक्षाचे ‘हत्ती’ चिन्ह गोठविले गेले. नंतर ‘उगवता सूर्य’ चिन्ह आले. फुटीनंतर तेही गोठवले गेले. हत्ती मायावतींना मिळाला, तर उगवता सूर्य तमिळनाडूत क रूणा निधींच्या डीएमकेकडे गेला.

गांधींच्या प्रचारदौऱ्यात काँग्रेस आघाडीचे कार्यकर्ते
श्रीगोंदे, ३० मार्च/वार्ताहर

मतभेद विसरून तालुक्यातील दोन्ही काँग्रेसचे नेते राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांच्या विजयासाठी झटत असतानाच या नेत्यांच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी मात्र आज भाजपचे उमेदवार दिलीप गांधी यांचे उत्स्फूर्त स्वागत करून तालुक्यातील प्रचार दौऱ्यात हजेरी लावली.
दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे उमेदवार कर्डिले यांनी तालुक्यात वनमंत्री बबनराव पाचपुते, काँग्रेस नेते शिवाजीराव नागवडे, बाबासाहेब भोस, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विठ्ठलराव काकडे या प्रमुखांसह तालुक्यातील २८ गावांचा दौरा केला. काही गावांमध्ये त्यांना प्रतिसादही चांगला मिळाला. जिरायत पट्टय़ात त्यांच्या सभांना मोठी गर्दी झाली होती.

वाकचौरे विश्वासात घेत नसल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांत नाराजी
राहाता, ३० मार्च/वार्ताहर

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे हे तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत नसल्यामुळे निष्ठावान शिवसैनिकांनी त्यांच्या कार्यपद्धतीविषयी उघडपणे नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. शिर्डी शहर शिवसेनेच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिर्डी लोकसभा मतदारसंघातील भाजप-सेनेचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे हे निष्ठावान शिवसैनिकांना विश्वासात घेत नाहीत.

जातीयवादी शक्तींना धडा शिकवा - पिचड
राजूर, ३० मार्च/वार्ताहर

आदिवासींच्या हक्कांवर गदा आणण्याचे काम युती सरकारच्या काळातच घडले. जातीयवादी व धर्माध शक्तींना लोकसभा निवडणुकीत धडा शिकवा, असे आवाहन आमदार मधुकरराव पिचड यांनी केले. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत श्री. पिचड बोलत होते. बैठकीस रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय वाकचौरे, उपसभापती यमाजी लहामटे, चंद्रकांत सरोदे, काशिनाथ साबळे, कुंडलिक वाळेकर, शरद कोंडार, बाळासाहेब देशमुख उपस्थित होते.

विजयासाठी साईचरणी प्रिया दत्त यांचे साकडे
राहाता, ३० मार्च/वार्ताहर

काँग्रेस पक्षाच्या मुंबईतील उमेदवार खासदार प्रिया दत्त यांनी आज शिर्डीत येऊन साईचरणी विजयासाठी साकडे घातले. दुपारी साडेबारा वाजता प्रिया दत्त मैत्रिणीसह साईदर्शनासाठी आल्या होत्या. पत्रकारांशी बोलताना दत्त म्हणाल्या की, निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा अजेंडा आहे. पूर्वीचे अनेक प्रश्न मतदारसंघात अजून प्रलंबित आहेत. ते सोडविणे हे आपणापुढील मोठे काम आहे. आमचे कुटुंबीय साईबाबांचे पूर्वीपासून भक्त आहे. माझे वडील सुनील दत्त व भाऊ संजय दत्त बाबांचे निस्सीम भक्त आहेत. काँग्रेस पक्षाने सांगितल्यास लखनौमध्ये संजय दत्त यांच्या प्रचाराला जाणार काय, असा प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या की, काँग्रेस पक्षाची तशी नीती नाही. पक्ष तसे सांगणारही नाही. त्यामुळे प्रचाराला जायचा प्रश्नच येत नाही. संजयबद्दल अधिक बोलण्यास मात्र त्यांनी नकार दिला. दर्शन घेतल्यानंतर प्रिया दत्त मंदिराबाहेर आल्या, परंतु काहीतरी मागायचे राहिले, या भावनेतून त्या पुन्हा मागे फिरून मंदिरात गेल्या. त्यांनी दुसऱ्यांदा दर्शन घेतले. संजय दत्तसंदर्भात आज न्यायालयात निकाल होता. संजय यास न्यायालयाकडून दिलासा मिळावा, यासाठी बहीण प्रिया यांनी पुन्हा दर्शन घेतले असल्याची चर्चा होती.

गांधींच्या प्रचाराबाबत पारनेरला उद्या मेळावा
वाडेगव्हाण, ३० मार्च/वार्ताहर

नगर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार दिलीप गांधी यांच्या प्रचार नियोजनाच्या दृष्टीने युतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा बुधवारी (दि. १ एप्रिल) सकाळी ११ वाजता पारनेर येथे बेलकर मंगल कार्यालयात आयोजित केला असल्याची माहिती भाजप तालुकाध्यक्ष कृष्णाजी बडवे यांनी दिली. मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार विजय औटी, शिवसेना तालुकाप्रमुख सबाजी गायकवाड आदींनी केले आहे.

‘शिर्डी’बाबत ‘मनसे’ची उद्या कोपरगावला बैठक
कोपरगाव, ३० मार्च/वार्ताहर

शिर्डीतील निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मनसेच्या कोपरगाव, राहाता व श्रीरामपूर तालुक्यांतील शाखाध्यक्ष, महिला आघाडी, मनसे विद्यार्थी सेना, महाराष्ट्र राज्य परिवहन सेना या संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक बुधवारी (दि. १ एप्रिल) सकाळी १० वाजता येथील वीरा पॅलेस येथे जिल्हाध्यक्ष विजय काळे यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच जिल्हा संघटक अरुण पाटील, उपजिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर गाडे यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती उपजिल्हाध्यक्ष संतोष गंगवाल व कोपरगाव शहराध्यक्ष सतीश काकडे यांनी दिली.
----------------------------------------------------------------------------

सय्यदबाबा दग्र्याच्या उरुसाला आज प्रारंभ
श्रीरामपूर, ३० मार्च/प्रतिनिधी

मुस्लिम व हिंदूधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या सय्यदबाबा दग्र्याच्या ७९ व्या उरुसाला उद्या (मंगळवारी) प्रारंभ होत असून, यानिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे. तीन दिवस चालणाऱ्या उरूसास सायंकाळी साडेसहा वाजता संदलची मिरवणूक काढल्यानंतर प्रारंभ होईल. डावखर यांच्या मानाच्या चादरीनंतर तहसील व पोलीस ठाणे मानाची चादर चढवितील. त्यानंतर विविध संघटना व भक्त चादरी चढवितील. सुमारे ३०० वषार्ंपूर्वी ईस्लाम प्रचारकांची पालखी औरंगाबाद येथे आली. पालखी श्रीरामपूरहून जात असताना हजरत सय्यद कादरीबाबा यांचे येथे निधन झाले. शहरातील व्यापारी गंगाराम डावखर यांनी येथे बाबांची समाधी बांधली. सन १९२५पासून या समाधीवर चादर चढविण्याचा मान डावखर कुटुंबाला आहे. उरूस समितीत विविध धर्मांतील व्यक्ती असून, हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून या उत्सवाकडे पाहिले जाते. संदलनंतर २ दिवस प्रसिद्ध कव्वाल कव्वाली सादर करतात. कव्वाल्यांचा सामना रंगतो. कव्वाल हाजी हबीब अजमेरी उरुसाचे आकर्षण आहेत. उरुस मैदानाची स्वच्छता करण्यात आली. या भागातून जाणाऱ्या वाहतुकीबाबत पोलिसांनी दक्षता घेतली आहे. वाहतूक नियंत्रण कक्षातील पोलीस या ठिकाणी थांबून वाहतूक सुरळीत करीत आहेत.

मालमोटारींच्या समोरासमोर धडकेत एक ठार, तीनजण जखमी
राहाता, ३० मार्च/वार्ताहर

पोहेगाव येथील रोहम वस्तीजवळील वळणावर आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दोन मालमोटारींची समोरासमोर धडक झाली. यात एकजण ठार, तर तीनजण जखमी झाले. या अपघातामुळे पोहेगाव ते चांदेकसारे व जवळकेदरम्यान वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कोपरगावहून संगमनेरकडे जाणारी मालमोटार (टीएन २९ डीबी ८०३) व संगमनेरकडून कोपरगावकडे चाललेल्या मालमोटारीची (केए ०१ सी २६५३) समोरासमोर धडक झाली. यामध्ये मरियान (वय ६०, तामिळनाडू) जागीच ठार झाला, तर सुरेश नीरज (वय २८), मणिअप्पम मरीअप्पम (वय ३२), मुबारक फहासा (२९, सर्व राहणार तामिळनाडू) जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कोपरगाव नगरपालिकेच्या रुग्णालयात नेण्यात आले. या अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती. एका मालमोटारीत कापसाच्या गाठी होत्या. धडकेनंतर या गाठींनी पेट घेतला. कोपरगाव पालिकेच्या अग्निशमन दलाच्या बंबाने ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पोहेगावचे पोलीस पाटील काकासाहेब झांबरे यांनी या अपघाताची शिर्डी पोलिसांनी माहिती दिली. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल पी. बी. ढवळे व एस. एन. बोटे करीत आहेत.

‘आशा केंद्र देशाचे आशास्थान’
श्रीरामपूर, ३० मार्च/प्रतिनिधी

कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट संचालित आशा केंद्राच्या पर्यायी वैद्यकशास्त्राच्या आधारे अॅक्युपंक्चर व पंचकर्म उपचार पद्धतीमुळे आरोग्य क्षेत्रात नवी क्रांती केली. त्यामुळे आशा केंद्र देशाचे आशास्थान होईल, असे प्रतिपादन रूबी हॉलचे डॉ. संजय व्होरा यांनी केले. केंद्राने नव्याने सुरू केलेल्या सुविधायुक्त आंतररुग्ण विभाग व वातानुकूलित रुग्णवाहिका सेवेचे डॉ. व्होरा यांच्या हस्ते उदघाटन झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. डॉ. दिलीप पडघन, डॉ. रवींद्र कवडे, डॉ. दिलीप शिरसाठ, डॉ. राहुल कुलकर्णी, डॉ. ज्ञानेश रािहज उपस्थित होते. कार्यकारी संचालक डॉ. धनंजय धनवटे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. गरजूंना तातडीची सेवा देण्याचा संस्थेचा उद्देश असल्याचे सांगितले. अध्यक्ष फिरोज अश्रफ, विश्वस्त सुरेश शेळके यांनी रुग्णसेवेचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. सर्वधर्म समभावाचे प्रतीक म्हणून धर्मगुरूंनी प्रार्थना केली. वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय वलवे, डॉ. सतीश पुंड, डॉ. अनिल काळे, डॉ. कार्तिकी पुंड, व्यवस्थापक बाबासाहेब वाघ, प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत डोखे उपस्थित होते. सूत्रसंचालन सुनील पंडित यांनी केले. वाघ यांनी आभार मानले.

तहसीलदार मुंडके यांनी राहात्यात पदभार घेतला
राहाता, ३० मार्च/वार्ताहर

तब्बल एक महिन्यानंतर येथील तहसील कार्यालयात तहसीलदार म्हणून राहुल मुंडके यांनी रविवारी पदभार स्वीकारला. तत्कालीन तहसीलदार डॉ. यशवंतराव माने यांची बदली होऊन साई संस्थानच्या उपकार्यकारी अधिकारीपदी निवड झाल्याने गेल्या महिनाभरापासून तहसीलदारपद रिक्त होते. प्रभारी कार्यभार नायब तहसीलदार दत्ता शेजूळ यांच्याकडे होता. तहसीलदारपदी करमाळा येथून बी. बी. जाधव यांनी पदभार स्वीकारला. परंतु निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे एक दिवसच त्यांनी काम पाहिले. मुंडके यांनी यापूर्वी संगमनेर येथे तहसीलदार म्हणून काम केले. सध्या ते जळगाव जिल्ह्य़ातील यावल येथे गेल्या सव्वातीन वर्षांपासून तहसीलदार म्हणून कार्यरत होते.

निंबेगावात वृक्षतोड
कर्जत, ३० मार्च/वार्ताहर

तालुक्यातील निंबे येथे सामाईक बांधावरील झाडांची बेकायदेशीर वृक्षतोड सुरू असून, ती तत्काळ थांबवावी, अशी मागणी अंकुश खामगळ यांनी वन विभागाकडे लेखी स्वरूपात केली आहे.
निंबे गावामधील गट नंबर १७२/१ ही जमीन श्री. खामगळ यांच्या ताब्यात वहिवाटीसाठी आहे. १७२/२ ही जमीन गणूबाई जरक यांच्या नावावर आहे. दोन्ही जमिनीमध्ये सामाईक बांध आहे. या बांधालगत चंदनाची २, चिंचेची ७ व लिंबाची ५ झाडे आहेत. गणूबाई जरक यांनी ही झाडे स्वत तोडण्याचा प्रयत्न केला. यापूर्वीही अशी झाडे तोडली आहेत. वास्तविक या झाडांचे उत्पन्न सामाईक वाटून घेण्यात येत होते. त्यामुळे या झाडांची तोड होऊ नये, अशी मागणी शेवटी श्री. खामगळ यांनी केली आहे.

‘निमा’च्या पारनेर तालुकाध्यक्षपदी डॉ. सरोदे
निघोज, ३० मार्च/वार्ताहर

निमा या संघटनेची नुकतीच तालुक्यात स्थापना झाली. संघटनेच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. ‘निमा’च्या तालुकाध्यक्षपदी येथील डॉ. अशोक सरोदे यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी भाऊसाहेब खिलारी (टाकळी ढोकेश्वर), सचिव म्हणून श्रीकांत पटारे (पारनेर), सहसचिवपदी किशोर पुरकर (पारनेर), खजिनदारपदी किरण रोहोकले (भाळवणी), सहखजिनदारपदी अजित लंके (देवीभोयरे), संघटक प्रविण दिवटे (पारनेर), सदस्य आबासाहेब खोडदे (जवळे), एम. डी. मगर (सुपे), विश्वास गायकवाड (कान्हूरपठार), बाळासाहेब पठारे (सुपे), श्री. मंदीलकर (वडझिरे), नरोडे (पारनेर), वर्षां पुजारी (पारनेर), शंकर कवाद (राळेगण थेरपाळ) यांची निवड झाली. डॉ. चंद्रकांत कोलते यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

पोस्टल फोरमची कार्यकारिणी जाहीर
कोपरगाव, ३० मार्च/वार्ताहर

येथील डाक विभागाची पोस्टल फोरमची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, ‘लोकसत्ता’चे वार्ताहर महेश जोशी, वैभव आढाव, नितीन देशमुख, एस. डी. सय्यद, वर्षां वाडेकर यांचा त्यात समावेश आहे. निवडीचे पत्र पोस्टमास्तर एस. एल. वर्धावे यांनी पाठविले. फोरमच्या माध्यमातून टपालविषयक विविध समस्या मांडून त्यांचे निराकरण करण्यात येत आहे, असे श्री. वर्धावे यांनी सांगितले.

राहुरी बार असोसिएशनतर्फे वकील साळवी यांना श्रद्धांजली
देवळाली प्रवरा, ३० मार्च/वार्ताहर

राहुरी बार असोसिएशनच्या वतीने नगर येथील वकील पीटर साळवी यांच्या खुनाचा लवकरात लवकर तपास करून दोषींवर कारवाई करावी, यासाठी आज न्यायालयीन कामकाज सुरू झाल्यानंतर सभा घेण्यात आली. त्या वेळी साळवी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.राहुरी न्यायालयाचे सहदिवाणी न्यायाधीश द. शं. खेडेकर या वेळी म्हणाले की, शांत, मनमिळावू व सुसंस्कृत ज्येष्ठ वकील साळवी यांच्याबाबतीत ही दुर्दैवी घटना आहे. ते आदर्श वकील होते. या वेळी राहुरी बार असोसिएशनचे ज्येष्ठ विधीज्ञ वसंत मुथा, भैय्यासाहेब शेळके, आर. एम. उंडे, एस. जी. लांबे, बारचे सचिव तुषार भुजाडी आदींनी श्रद्धांजली वाहिली.

खासदार विखे आठवलेंचे प्रचारप्रमुख - गायकवाड
नगर, ३० मार्च/प्रतिनिधी

शिर्डी मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार, रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांचे निवडणूक प्रचारप्रमुख म्हणून खासदार बाळासाहेब विखे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आठवले यांच्या वतीने रिपाईंचे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक गायकवाड यांनी ही माहिती दिली. दरम्यान, आठवले १ एप्रिलला नगरमध्ये येत असून, दि. २ रोजी ते शिर्डी मतदारसंघासाठीचा अर्ज दाखल करणार आहेत. बुधवारी (दि. १) राष्ट्रवादीचे नगर मतदारसंघातील उमेदवार आमदार शिवाजी कर्डिले अर्ज दाखल करतील. या वेळी आठवले उपस्थित राहणार आहेत. गुरुवारी आठवले अर्ज दाखल करतील व त्यांच्या उपस्थितीत तत्पूर्वी सकाळी ११ वाजता ओम गार्डन येथे सभा होईल, असे गायकवाड यांनी सांगितले.

दलित महासंघ जिल्हाध्यक्षपदावरून सुनील उमाप यांची हकालपट्टी
नगर, ३० मार्च/प्रतिनिधी

दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष (दक्षिण) सुनील उमाप यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्रक दलित महासंघाने काढले. बहुजन रयत परिषदेतील वक्तव्य, स्वतची केलेली प्रसिद्धी या कारणावरून उत्तर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ सुलाखे यांनी उमाप यांना नोटीस बजावली. मात्र, त्यांनी त्यास सकारात्मक उत्तर दिले नाही. त्यामुळे उमाप यांची हकालपट्टी करण्यात आली. नवीन जिल्हाध्यक्ष निवडेपर्यंत प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून काशिनाथ सुलाखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पत्रकावर महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष रशीद शेख, उपाध्यक्ष दिलीप सोळसे, महिला जिल्हाध्यक्ष अरुणा कांबळे यांच्या सह्य़ा आहेत. कारवाईसाठी बोलाविलेल्या बैठकीस समाजाचे ज्येष्ठ नेते पोपट साठे, नामदेव चांदणे, रावसाहेब नेटके, रवींद्र चांदणे, दीपक जाधव, रखमाजी शिंदे आदी उपस्थित होते.

शिर्डी मतदारसंघात दलित महासंघातर्फे लोंढे
नगर, ३० मार्च/प्रतिनिधी

शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शरद लोंढे यांना उमेदवारी देण्यात आली असल्याची माहिती दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ सुलाखे यांनी दिली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गेल्या ६० वर्षांत मातंग समाजाला न्याय दिला नसल्यामुळे संघटनेने स्वतंत्र उमेदवार राखीव जागांवर उभे करावेत, असे श्रमिक कार्यालयात झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले. त्यानुसार लोंढे यांची एकमताने निवड करण्यात आली. लोंढे महासंघाचे उत्तर जिल्हाध्यक्ष आहेत.यावेळी महासंघाची जिल्हा कार्यकारिणी निवडण्यात आली. नामदेव चांदणे (संपर्कप्रमुख), रावसाहेब नेटके (उपाध्यक्ष), शेख रशीद (कार्याध्यक्ष), दीपक जाधव (सचिव), रखमा शिंदे (सहसचिव), अरुणा कांबळे (सल्लागार). रवींद्र चांदणे (नगर), रोहिदास साळवे (पारनेर), भय्यासाहेब वाल्हेकर (नेवासे), साहेबराव केंदळे (पाथर्डी) यांची तालुकाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.

‘एच. पी. गॅस ग्राहकांसाठी वेगळी वितरण व्यवस्था करा’
नगर, ३० मार्च/प्रतिनिधी

एच. पी. एजन्सी रद्द झालेल्या ग्राहक भांडारातील गॅस ग्राहकांसाठी कंपनीने वेगळ्या जागेत जादा काऊंटर सुरू करावे, अशी मागणी ग्राहक संघ, अखिल भारतीय ग्राहक पंचायत व ग्राहक सेवा महासंघातर्फे करण्यात आली. एजन्सी रद्द झाल्याने गॅस ग्राहकांची जबाबदारी कंपनीने अहमदनगर गॅस कंपनी (घासगल्ली) व ममता गॅस (गुलमोहोर रस्ता) यांच्याकडे सोपविली आहे. मात्र, अपुरी जागा, कर्मचाऱ्यांची कमतरता, जादा ग्राहक संख्या यामुळे या एजन्सी सेवा पुरविण्यास असमर्थ ठरत आहेत. अतिरिक्त ग्राहक लादल्याने एजन्सी चालकांवरही मानसिक ताण पडत असून, ग्राहकांनाही डोकेदुखी झाली आहे. त्यामुळे वेगळे काऊंटर त्वरित सुरू करण्यात यावे, तसेच ग्राहकांनीही अहमदनगर व ममता गॅस एजन्सीला सहकार्य करावे, असे आवाहन संघटनांनी केले आहे. निवेदनावर शिरीष बापट, बाबासाहेब भालेराव, सुरेश रुणवाल यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बिटकेवाडी ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात
कर्जत, ३० मार्च/वार्ताहर

तालुक्यातील बिटकेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नानासाहेब बिटके यांची, उपसरपंचपदी शंकर घालमे यांची बिनविरोध निवड झाली आहे. बिटकेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदासाठी आज निवडणूक झाली. या ग्रामपंचायतीत एकूण ९ सदस्य आहेत. यापैकी शिवसेनेचे ६ सदस्य आहेत. सरपंचपदासाठी बिटके यांचा एकमेव अर्ज आला, तर उपसरपंचपदासाठी घालमे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. या वेळी शिवाजी खोमणे, कौसल्या खराडे, दादा शेळके, भरत शिंदे हे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, राजेंद्र वळवी, बळीराम यादव, दीपक राहाणे, अतुल कानडे, उपतालुकाप्रमुख अंगद रूपनर, चंद्रकांत शिंदे, नारायण दळवी, दादा घालमे, दादा बिटके, यांनी अभिनंदन केले.

गांधींच्या प्रचारासाठी उद्या नगरला बैठक
नगर, ३० मार्च/वार्ताहर

लोकसभेच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भाजपचे उमेदवार दिलीप गांधी यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी १ एप्रिल रोजी नगर येथे तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक होत आहे. बैठकीस उमेदवार दिलीप गांधी, जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे व जिल्हा सरचिटणीस प्रा. भानुदास बेरड मार्गदर्शन करणार आहेत. पक्षाचे तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीस पक्षाच्या जिल्हा कार्यालयात सकाळी ११ वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन पक्षाचे तालुका सरचिटणीस श्याम पिंपळे यांनी केले आहे.