Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३१ मार्च २००९

अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार रांगेत!
विदर्भात अखेरच्या दिवशी २०३ अर्ज , यशवंत मनोहर, प्रफुल्ल पटेल, अडसूळ, शिंगणे, नाना पटोले, पुगलिया रिंगणात

नागपूर, ३० मार्च/ प्रतिनिधी

पंधराव्या लोकसभेसाठी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी, सोमवारी विदर्भात विविध राजकीय पक्षांच्या आणि अपक्ष उमेदवारांनी मोठय़ा संख्येत उमेदवारी अर्ज दाखल केले. नागपुरात तर प्रमुख उमेदवारांनी अर्ज भरताना गर्दी केल्यामुळे त्यांना रांगेत उभे राहावे लागले. विदर्भातील १० मतदारसंघात आज, अखेरच्या दिवशी २०३ उमेदवारी अर्ज दाखल झाले. ते जमेस धरता आतापर्यंत एकूण ३१५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. प्रफुल्ल पटेल, नरेश पुगलिया, आनंदराव अडसूळ, हरिभाऊ राठोड, नाना पटोले, अशोक नेते, मारोतराव कोवासे, डॉ. राजेंद्र शिंगणे या प्रमुख उमेदवारांचा आज अर्ज भरणाऱ्यांमध्ये समावेश आहे. सुलेखा कुंभारे यांनी नागपूर व रामटेक या दोन्ही मतदारसंघातून अर्ज दाखल केले आहेत.

स्वबळावर निवडणूक लढण्याचा मुद्दा इतिहासजमा -माणिकराव
नागपूर, ३० मार्च / प्रतिनिधी

सोनिया गांधी विदर्भात येणार
बंडखोरांवर कारवाईचा इशारा
नागपुरातील नाराजी दूर करू
महाराष्ट्रात स्वबळावर निवडणुका लढण्याचा मुद्दा आता इतिहासजमा झाला आहे. आघाडीतील सर्व पक्षांना सोबत घेऊन निवडणुका लढलो तरच यश मिळेल, असे मत प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी येथे व्यक्त केले. काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी विदर्भात येणार असून त्यांच्या दौऱ्याची आखणी सुरू आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. परस्पर उमेदवारी अर्ज भरणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांनी दोन दिवसात ते परत न घेतल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी बंडखोरांना दिला.

पळणारा आरोपी पोलिसांच्या गोळीबारात जखमी
मध्यवर्ती कारागृहातील घटना

नागपूर, ३० मार्च / प्रतिनिधी

पळून जातअसलेला कुख्यात आरोपी पोलिसांच्या गोळीबारात गंभीर जखमी झाला. मध्यवर्ती कारागृह परिसरात सोमवारी भल्या पहाटे सव्वातीन ते साडेतीन वाजताच्यादरम्यान ही घटना घडली.
सुनीलसिंह माणिकसिंह भादा (रा. आष्टी जि. वर्धा) असे आरोपीचे नाव असून त्याला मेडिकल रुग्णालयातील वार्ड क्रमांक १९मध्ये दाखल करण्यात आले आहे. काही महिन्यांपासून मध्यवर्ती कारागृहात असलेल्या सुनीलला नांदुरा पोलिसांनी प्रॉडक्शन वॉरंटच्या आधारे ताब्यात घेतले आणि तेथील एका गुन्ह्य़ाच्या तपासासाठी २४ मार्चला घेऊन गेले. रविवारी त्याची पोलीस कोठडी संपल्याने तेथील न्यायालयापुढे हजर केले आणि नागपूरला कारागृहात आणण्यासाठी बसने निघाले.

नागपुरात विक्रमी ४२ अंश तापमानाची नोंद
अकोला ४१.५, वर्धा ४१

नागपूर, ३० मार्च / प्रतिनिधी

उन्हाचे चटके वाढतच असून २००४ नंतर आज नागपुरात मार्च महिन्यातील गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक म्हणजे ४२ अंश कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. हवामानात झपाटय़ाने होणाऱ्या बदलांचा अनुभव यंदा नागरिक घेत आहेत. मार्च महिन्याच्या आरंभी तापमानात झपाटय़ाने वाढ झाली व विदर्भाच्या अनेक भागात पारा ४० अंशांवर पोहोचला. मात्र पुन्हा हवामान बदलले आणि मार्चच्या मध्यात विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने तापमानात झपाटय़ाने घट होऊन पुढचा आठवडाभर नागरिकांना उन्हाचे चटके आणि उकाडय़ापासून दिलासा मिळाला.

स्नेहमिलन सोहोळा
नागपूर, ३० मार्च / प्रतिनिधी

मराठा विद्या प्रसारक समाजातर्फे शुक्रवारी, २७ मार्चला गुढीपाडव्याला सक्करदऱ्यातील छत्रपती शिवाजी स्मृती सभागृहात स्नेहमिलन सोहोळा पार पडला. संस्थेचे अध्यक्ष मनोहर मोहिते अध्यक्षस्थानी होते. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. अरविंद मोहिते, श्रीमंत संग्रामसिंह राजे भोसले, शिवाजी मोहिते, मुख्यसचिव दिलीप चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन तसेच छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला व प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्रतिमेला हार घालून करण्यात आली. वरवधु मेळाव्याच्या पुस्तिकेचे प्रकाशन झाल्यानंतर सुप्रसिद्ध दूरदर्शन व आकाशवाणी कलाकार दुर्गेश खडसे यांच्या संचाचा शहनाईवादन कार्यक्रम झाला.

विद्यार्थ्यांची आत्महत्या
मलकापूर, ३० मार्च/ वार्ताहर

वर्गशिक्षिकेने भर वर्गामध्ये अपमान करून पेपर अर्धवट सोडण्यास लावून घरी पाठवून दिल्याने मलकापूर येथील बी.ए. च्या प्रथम वर्षांला असणाऱ्या विद्यार्थ्यांने आत्महत्या केली. वीरेंद्र विजयकुमार डागा (१९) असे मृत विद्यार्थ्यांचे नाव असून त्याने जळगाव खानदेश येथील जैन होस्टेल मध्ये गळफास लावून आत्महत्या केली. तो जळगाव खानदेश येथे एम.जे. कॉलेज मध्ये बी.बी.ए.च्या प्रथम वर्षांला शिक्षण घेत होता. त्याची वार्षिक परीक्षा सुरू होती. त्यामध्ये एम.जे. कॉलेजच्या केंद्रावर पर्यावरण शास्त्राचा पेपर सुरू होता. यावेळी ११ ते १२ वा. दरम्यान पर्यवेक्षक परीक्षा केंद्रावर फिरत असताना त्यांनी वीरेंद्रच्या वर्गात प्रवेश केला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडून विद्यार्थ्यांनी कॉप्यांची फेकाफेक केली. त्यातील एक कॉपी वीरेंद्रच्या टेबलाजवळ आढळली. त्यामुळे वर्गावर असलेल्या शिक्षिकेने यास जाब विचारला असता कॉफी त्याची नसल्याची त्याने सांगितले. शिक्षिकेने वीरेंद्रचा पेपर घेऊन त्याला वर्गातून बाहेर जाण्यास सांगितले. या प्रकरणी डागा कुटुंबीयांनी शिक्षिकेविरुद्ध जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. विद्यार्थ्यांची उत्तरीय तपासणी करून मलकापूर येथे सायंकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुस्लिम समाजाच्या प्रगतीसाठी आरक्षणाची गरज -डॉ. बारी
नागपूर, ३० मार्च / प्रतिनिधी

मुस्लिम समाज शैक्षणिक व आर्थिक विकासाबाबत उपेक्षित असून त्यांच्या प्रगतीसाठी आरक्षणाची गरज असल्याचे मत राष्ट्रीय मुस्लिम बहुजन परिषदेचे प्रमुख डॉ. असलम बारी यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय मुस्लिम बहुजन परिषदेतर्फे नुकताच मुस्लिम आरक्षण मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते. डॉ. बारी म्हणाले, सच्चर आयोग आणि राष्ट्रीय सॅम्पल सर्वे संघटनेच्या अहवालानुसारही मुस्लिम उपेक्षित आहेत. ओबीसींच्या तुलनेत मुस्लिम समाज आज मागे आहे. केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, मणिपूर या राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावे व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी, अशी मागणी डॉ. बारी यांनी केली.
यावेळी राष्ट्रीय मुस्लिम बहुजन परिषदेचे अध्यक्ष प्रा. जावेद शेख, नब्बु शेख, मजहर शेख, मुश्ताक कुरैशी, जिया अहमद यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. युसुफ यांनी केले. अजीज भाई यांनी आभार मानले.

मनोरमा कांबळे हत्या प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेणार
नागपूर, ३० मार्च / प्रतिनिधी

मनोरमा कांबळे हत्या प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेण्याचा निर्धार अखिल भारतीय धम्मसेनेने केला आहे. टिळक पत्रकार भवनात मनोरमा कांबळे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार यांनी या लढय़ाला संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली. या सभेच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय धम्मसेनेचे प्रमुख भदंत आर्य नागार्जून सुरेई ससाई हे होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. रणजित मेश्राम, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शिरीष बोरकर, सरचिटणीस राहुल अवसरे, प्रा. देवीदास घोडेस्वार, अ‍ॅड. जयदेव श्यामकुवर व अ‍ॅड. संदेश भालेकर हे उपस्थित होते. यावेळी बोलताना द्वादशीवार यांनी मनोरमा कांबळे हत्याप्रकरणी न्याय मिळवण्यासाठी संघटित लढय़ाची गरज व्यक्त केली. या प्रकरणात लोकशाहीचे चारही स्तंभ पराभूत झाले अन् पैसा जिंकला. त्यामुळेच या प्रकरणाचे गांभीर्य अधिक आहे, असे ते म्हणाले. प्रा. रणजित मेश्राम यांनी, नव्याने लढा उभारण्याची गरज स्पष्ट केली. भय्या खैरकर यांनी प्रास्ताविक व संचालन केले.

वास्तुशास्त्रावर परिसंवाद; आरोग्य लाभाची ग्वाही
नागपूर, ३० मार्च / प्रतिनिधी

सनराईज पीस मिशनच्यावतीने हिंदी मोरभवनात ‘वास्तुशास्त्रामुळे आरोग्य लाभ’ या विषयावर चर्चासत्र पार पडले. चर्चासत्रात बोलताना वास्तुशास्त्र विशेषज्ञ धीरज बोरकर म्हणाले, यावर्षी उत्तर दिशेला तोंड करून बसू नये. यामुळे शारिरीक त्रास वाढू शकतो. आभा मंडळाचे महत्त्व सांगताना ते म्हणाले, वास्तुशास्त्राच्या दृष्टीने अयोग्य असणाऱ्या घरातसुद्धा सकारात्मक आभा मंडळामुळे सुखी जीवन जगता येऊ शकते. राजयोगिनी मनीषाबहन म्हणाल्या, सहज राजयोग ध्यानामुळे सर्वागिण विकास करणे शक्य आहे. राजयोगाद्वारे अष्टशक्तीची प्राप्ती होत असल्याचे त्यांनी सांगितले. सनराईज पीस मिशनचे संस्थापक अध्यक्ष हरगोविंद मुरारका यांनी संस्थेचा परिचय करून दिला. याप्रसंगी राजयोगिनी मनीषा बहन व प्रेमप्रकाश भाई यांना सनराईज आध्यात्मिक रत्न पारितोषिक देण्यात आले. धीरज बोरकर यांना सनराईज विदर्भ रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सारिका फुलझेले यांनी केले.

रामभाऊ रुईकरांना आदरांजली
नागपूर, ३० मार्च/प्रतिनिधी

कामगार केसरी रामभाऊ रुईकर प्रतिष्ठानच्यावतीने रुईकर पुण्यतिथीनिमित्त, चिटणीस पार्कवरील रामभाऊ रुईकरांच्या पुतळय़ाला हार घालून आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी रुईकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकुंद मुळे, आमदार दीनानाथ पडोळे, राष्ट्रीय मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष एन.एस. पिल्लई, दिलीप हरडे, तुकाराम डेकाटे, गंगाधर पारखेडकर, इंटकचे पंढरीनाथ सालेगुंजेवार, प्रा. प्रताप चव्हाण, मधु मटके आदींनी कामगार केसरी रामभाऊ रुईकरांना आदरांजली वाहिली.

डी. सी. गर्ग यांच्या हस्ते
आज विदर्भ डायरीचे प्रकाशन
नागपूर, ३० मार्च / प्रतिनिधी

विदर्भ डेली न्यूज पेपर्स असोसिएशनतर्फे २००९-१० च्या विदर्भ डायरीचे प्रकाशन ३१ मार्चला वेस्टर्न कोल फिल्ड लिमिटेडचे अध्यक्ष व प्रबंधक संचालक डी. सी. गर्ग यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. शंकरनगरातील राष्ट्रभाषा संकुलाच्या बाबुराव धनवटे सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक भि. म. कौशल, तरुण भारतचे प्रबंध संचालक अनिल पत्की, वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी उपस्थित राहतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुप्ता कोल लिमिटेडचे अध्यक्ष पद्मेश गुप्ता उपस्थित राहणार आहेत.

आवडीचे क्षेत्र निवडल्यास यश मिळवणे सोपे -नाथे
नागपूर, ३० मार्च / प्रतिनिधी

आधुनिक काळात सर्वच क्षेत्रात स्पर्धा असली तरी, आवडीनुसार क्षेत्र निवडल्यास यश मिळवणे सोपे जाते, असे मत प्रा. संजय नाथे यांनी व्यक्त केले. नाथे करिअर अकादमीद्वारे आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. तरुणांना प्रशासकीय क्षेत्राचे आकर्षण आहे. अनेकांना त्यामध्ये करिअर करावेसे वाटते. यामुळेच अनेक तरूण स्पर्धा परीक्षेकडे वळत आहेत. स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम आणि विद्यापीठ अभ्यासक्रम याची सांगड घालून उमेदवारांनी नियमित अभ्यासाबरोबर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करावा, असे प्रा. नाथे म्हणाले. यावेळी त्यांनी युपीएससी, एमपीएससी, बँक, रेल्वे, स्टाफ सिलेक्शन कमिशन या परीक्षांच्या अभ्यासक्रमाची माहिती दिली. या परीक्षांमधील साम्य व भेद लक्षात घेऊन अभ्यास कसा करावा, यावर प्रा. संजय नाथे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेकरिता ग्रंथपाल रमेश पळसकर, अनिल गोखले, रवी अय्यर, सुरेंद्र अंबाडकर यांनी सहकार्य केले.

बुधवारपासून सौर ऊर्जेबाबत कार्यशाळा
नागपूर, ३० मार्च / प्रतिनिधी

सौर ऊर्जा क्षेत्रातील तांत्रिक ज्ञान देण्याकरिता १ ते ३० एप्रिलदरम्यान, कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. नागपूर देशातील पहिली सोलर सिटी होत आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्यांची संख्या नगण्य आहे. त्यामुळे शहरात टेक्निशियन, उत्पादक, सप्लायर, डिस्ट्रीब्यूटर्स, मॅन्युफॅक्चर्स तयार करणे गरजेचे आहे. तेव्हाच या क्षेत्रातील मार्केट नागपूरकरांच्या हाती राहील. नागपूरमध्ये मोठय़ा प्रमाणात सौर ऊर्जा उपलब्ध आहे. यात सोलर वॉटर हिटर, सोलर लाईट, स्ट्रिट लाईट, रोड ब्लिंकर्स, स्ट्रिट लाईट, सिग्नल तसेच घनकचरा व्यवस्थापन व एनर्जी ऑडीट व पावर मॅनेजमेंट हे विषय शिकवल्या जाणार आहेत. प्रशिक्षण शिबिरात सरकारी कर्मचारी, मजुरांची मुले, महिला बचतगटाकरता विशेष सूट देण्यात आली आहे. अधिक माहितीकरिता जैन चॅरिटेबल ट्रस्ट, कामगार भवन, बैद्यनाथ चौक नागपूर येथे संपर्क साधावा.