Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३१ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार रांगेत!
विदर्भात अखेरच्या दिवशी २०३ अर्ज , यशवंत मनोहर, प्रफुल्ल पटेल, अडसूळ, शिंगणे, नाना पटोले, पुगलिया रिंगणात
नागपूर, ३० मार्च/ प्रतिनिधी

पंधराव्या लोकसभेसाठी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी, सोमवारी विदर्भात विविध राजकीय पक्षांच्या आणि अपक्ष उमेदवारांनी मोठय़ा संख्येत उमेदवारी अर्ज दाखल केले. नागपुरात तर प्रमुख

 

उमेदवारांनी अर्ज भरताना गर्दी केल्यामुळे त्यांना रांगेत उभे राहावे लागले.
विदर्भातील १० मतदारसंघात आज, अखेरच्या दिवशी २०३ उमेदवारी अर्ज दाखल झाले. ते जमेस धरता आतापर्यंत एकूण ३१५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे.
प्रफुल्ल पटेल, नरेश पुगलिया, आनंदराव अडसूळ, हरिभाऊ राठोड, नाना पटोले, अशोक नेते, मारोतराव कोवासे, डॉ. राजेंद्र शिंगणे या प्रमुख उमेदवारांचा आज अर्ज भरणाऱ्यांमध्ये समावेश आहे. सुलेखा कुंभारे यांनी नागपूर व रामटेक या दोन्ही मतदारसंघातून अर्ज दाखल केले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील सर्व, म्हणजे दहाही मतदारसंघात १६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास गेल्या २३ तारखेपासून सुरुवात झाली होती व आज अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस होता. उद्या, मंगळवारी अर्जाची छाननी होईल. २ एप्रिल हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस असून, ३ तारखेला सर्व मतदारसंघातील उमेदवारांच्या लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. नागपूर मतदारसंघात भारिप-बहुजन महासंघातर्फे डॉ. यशवंत मनोहर यांनी अर्ज दाखल केला. तर सुलेखा कुंभारे यांनी रिपब्लिकन एकता मंचाच्या उमेदवार म्हणून नागपूर व रामटेक या दोन्ही मतदारसंघातून अर्ज भरला. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे भंडारा- गोंदिया मतदारसंघातून प्रफुल्ल पटेल यांनी, तर बुलढाण्यातून डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी अर्ज दाखल केले. भंडाऱ्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला गेली असताना येथून काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी अर्ज दाखल केल्यामुळे खळबळ माजली आहे. शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांनी अमरावतीतून अर्ज भरला. चंद्रपूर मतदारसंघात काँग्रेसचे नरेश पुगलिया व स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप यांनी अर्ज दाखल केले. यवतमाळमध्ये काँग्रेसच्यावतीने हरिभाऊ राठोड यांचा अर्ज दाखल झाला. गडचिरोली-चिमूरमधून भाजपचे अशोक नेते व काँग्रेसचे मारोतराव कोवासे या दोन्ही प्रतिस्पध्र्यानी अर्ज दाखल केले. याशिवाय अकोला मतदारसंघातून बसपचे मुकीम अहमद आणि वर्धा मतदारसंघातून प्रा. झोटिंग यांचा आज अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये समावेश आहे.
नागपूर मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विविध पक्षाच्या उमेदवारांनी एकाच वेळी गर्दी केल्याने त्यांना रांगेत उभे राहून अर्ज दाखल करावे लागले. ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत यशवंत मनोहर (नागपूर) यांच्यासह बसपचे प्रकाश टेंभुर्णे (रामटेक), पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रा. जोगेंद्र कवाडे (रामटेक), बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या सुलेखा कुंभारे (रामटेक, नागपूर), अखिल भारतीय हिंदू महासभेचे अरुण जोशी ( नागपूर), समाजवादी पार्टीच्या माया चौरे (रामटेक), यांनी त्यांचे अर्ज दाखल केले. उमेदवारांच्या समर्थकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर फुलून गेला होता.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया २३ मार्चपासून सुरु झाली. आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. दरम्यानचे दोन दिवस सुटीत गेल्याने सोमवारी विविध राजकीय पक्षांच्या आणि अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी एकच गर्दी केली. पहिल्या एक तासात अपक्षांनी अर्ज दाखल केले, त्यानंतर राजकीय पक्षांचे उमेदवार आले. अर्ज दाखल करण्याची वेळ दुपारी तीन वाजेपर्यंतच असल्याने आणि उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने प्रशासनाने अडीच वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांची नावे आणि वेळेची नोंद करून घेतली. त्यानंतर क्रमाक्रमाने उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात सोडण्यात येत होते.
रिपाइं आघाडी समर्थित भारिप बहुजन महासंघाचे उमेदवार व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर १२.५० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. त्यांच्यासमवेत प्रा. रणजित मेश्राम, नगरसेवक डॉ. मिलिंद माने, राजू लोखंडे आणि रिपाइं आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या प्रमुख सुलेखा कुंभारे यांनी रामटेकसोबतच नागपूर लोकसभा मतदारसंघातूनही उमेदवारी अर्ज दाखल करून सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला. रविवारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन रामटेक येथून लढणार असल्याचे स्पष्ट केले होते. दुपारी १.४५ वाजता त्या जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या. त्यांच्यासोबत मोठय़ा प्रमाणात महिला समर्थक होत्या.
बसपचे उमेदवार प्रकाश टेंभुर्णे यांनी रामटेक लोक सभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत बसपचे जिल्हाध्यक्ष नागोराव जयकर, बांधकाम व्यावसायिक विजय डांगरे, उत्तम शेवडे व पक्ष कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
नागपूर येथून जगदीश अंबादे, राजेश पुगलिया, मो. रफिक शेख बिस्मिल्ला, प्रा. अताऊर रहेमान, प्रतिभा खापर्डे यांनी, तर रामटेक मतदारसंघातून विकास राजाराम दामले या अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल केला.
वर्धा लोकसभा मतदारसंघात आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वाधिक म्हणजे एकूण १५ अर्ज सादर करण्यात आले. यासह आता २४ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये प्रा. मधुकर झोटिंग (स्वभाव), नितीन कंगाले (बसप), डॉ. नीलेश गुल्हाणे (अपक्ष), शेख सलीम (अपक्ष), अ‍ॅड. सुरेश शिंदे (इंडियन जस्टीस पार्टी), कैलाश भोसे (गोंडवाणा मुक्ती सेना), प्रकाश रामटेके (अपक्ष), विश्वेश्वरराव तागडे (भारिप बहुजन महासंघ), जगन्नाथ राऊत (शिवराज्य), सारंग यावलकर (अपक्ष), प्रफुल्ल पाटील (राजद), नितीन चव्हाण (पीपल्स रिपब्लिकन पार्टी), ईश्वर गजापुरे (अपक्ष), मिर्झा खलिब (झारखंड मुक्ती सेना) यांचा समावेश आहे. यापूर्वी काँग्रेसचे दत्ता मेघे, भाजपचे सुरेश वाघमारे, भारिपचे धर्मपाल शंभरकर यासह ९ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहे.
अमरावती लोकसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज स्वीकारण्याच्या अखेरच्या दिवशी आज १४ उमेदवारांनी अर्ज सादर केले. अर्ज भरणाऱ्या उमेदवारांची संख्या २९ वर पोहचली आहे. शिवसेना- भाजप युतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ तसेच प्रहार संघटनेचे डॉ. राजीव जामठे जंगी मिरवणुका काढून आतापर्यंत निरस जाणवणाऱ्या या निवडणुकीत रंग भरला. उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्ताने दोघांनीही जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
उमेदवारी अर्ज भरणाऱ्या प्रमुख उमेदवारांमध्ये, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व रिपाइं आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र गवई, शिवसेना- भाजप युतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ, आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील प्रहार संघटनेचे डॉ. राजीव जामठे, बहुजन समाज पक्षाचे गंगाधर गाडे, भारिप- बहुजन महासंघाचे डॉ. हेमंतकुमार माहुरे, स्वतंत्र भारत पक्षाचे विजय विल्हेकर, युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटच्या माया कांडलकर यांचा समावेश आहे. आज दुपारी शिवसेनेच्या राजापेठ येथील मध्यवर्ती प्रचार कार्यालयापासून आनंदराव अडसूळ यांच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. शहरातील मुख्य मार्गावरून फिरून ही मिरवणूक जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचली. या मिरवणुकीत मोठय़ा संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. भगवे झेंडे आणि घोषणांनी वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला.
दुसरीकडे अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील प्रहार युवाशक्ती संघटनेचे उमेदवार डॉ. राजीव जामठे यांनीही प्रहार कार्यकत्यांच्या पाठबळावर शहरातून मिरवणूक काढली. प्रहारच्या पांढऱ्या रंगांच्या झेंडय़ांनी तसेच ‘अमरावतीकर जय हो’ च्या घोषणा देत डॉ. जामठे यांच्या समर्थकांनी निवडणूक प्रचाराच्या या महत्वाच्या टप्प्यात चांगला रंग भरला. उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ संपल्यानंतरही प्रहारच्या कार्यकर्त्यांनी शहरात मिरवणुकीद्वारे फिरून डॉ. जामठे यांचा प्रचार केला.
आज अखेरच्या दिवशी अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांमध्ये शिवसेना- भाजप युतीचे आनंदराव अडसूळ, प्रहार संघटनेचे डॉ. राजीव जामठे, स्वतंत्र भारत पक्षाचे विजय विल्हेकर, युडीएफच्या ममता कांडलकर, डेमोक्रेटिक सेक्यूलर पक्षाचे प्रवीण चवडे, इंडियन जस्टिस पार्टीचे मिलिंद लोणपांडे, अपक्ष म्हणून अ‍ॅड. सुधीर तायडे, सुधाकर रामटेके, सुनील उगले, अमोल जाधव, राजीव सोनोने, बंडू साने, अ‍ॅड. संजय वानखडे, श्रीकृष्ण उमक यांचा समावेश आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपाइं आघाडीचे डॉ. राजेंद्र गवई यांनी पतंग, कपबशी व दूरदर्शन हे पक्षचिन्ह मागितले आहे. रिपाइंचे परंपरागत उगवता सूर्य हे चिन्ह गोठवण्यात आल्याने त्यांना वेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे.
अकोल्यातून ९ उमेदवारी अर्ज
अकेाला लोकसभा मतदारसंघातून बहुजन समाज पक्षाचे उमेदवार मुकीम अहमद तसेच समाजवादीपक्षाचे इब्राहीमखां अमीरखां यांच्यासह ९ उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले.
उमेदवारांनी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने बसपा, सपा आणि युडीएफच्या उमेदवारांचा समावेश होता. बहुजन समाज पक्षाचे मुकीम अहमद, समाजवादी पक्षाचे इब्राहीम खां अमीरखां, युडीएफचे मुजीबुलखां चांदखां, डेमोक्रेटिक पार्टीचे अतिक अहमद गुलाब गिलानी, क्रांतीकारी जयहिंद सेनेचे गणेश ताठे यांच्यासह अपक्ष उमेदवार ठाकूरदास चौधरी, देवीदास राऊत, अजाबराव घोंगडे, आणि बहुजन समाज पक्षाचे शंकरराव इंगळे यांनी निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले.
पुगलिया, चटप यांचे अर्ज
काँग्रेस-राष्ट्रवादी व रिपाइं युतीचे नरेश पुगलिया, स्वतंत्र भारत पक्षाचे अ‍ॅड. वामनराव चटप व भारिप बहुजन महासंघाचे देशक खोब्रागडे यांचेसह एकूण चौदा उमेदवारांनी आज अर्ज दाखल केले.
स्थानिक गांधी चौकातील महात्मा गांधी यांचे पुतळय़ाला काँग्रेस-राष्ट्रवादी व रिपाइं युतीचे अधिकृत उमेदवार नरेश पुगलिया यांनी पुष्पहार घालून मिरवणुकीची सुरुवात झाली. अग्रस्थानी कॉंग्रेसचे कार्यकर्ते हातात झेंडे घेऊन होते तर मध्यभागी खुल्या जीपवर नरेश पुगलिया, पालकमंत्री अनिस अहमद, राष्ट्रवादीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम, माजी आमदार शिवाजीराव मोघे, माजी खासदार उत्तमराव पाटील, आमदार एस.क्यू. झामा, माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर, बाबुराव पानघाटे, सुदर्शन निमकर, निलेश पारवेकर, अविनाश वारजूकर, अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे, दीपक जयस्वाल, सुनील देरकर, प्रभावती ओझा, राजाभाऊ ठाकरे, सव्वालाखे, जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष विनायक बांगडे, युवक कॉंग्रेस अध्यक्ष अविनाश ठावरी, राहुल पुगलिया, अशोक नागापुरे, रामू तिवारी, निखील काच्छेला, नंदू नागरकर,बापू धोटे, महिला कॉंग्रेस अध्यक्ष डॉ. रजनी हजारे,अ‍ॅड. विजया बांगडे, अनु दहेगांवकर यांच्यासह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले.
नरेश पुगलिया यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी प्रदीप काळभोर यांच्या कार्यालयात अर्ज दाखल केले. मिरवणुकीत काँग्रेसच्या दुसऱ्या गटाचे माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे, आदिवासी विभागाचे राज्यमंत्री विजय वडेट्टीवार, आमदार संजय देवतळे गैरहजर होते. शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाचे अधिकृत उमेदवार अ‍ॅड. वामनराव चटप यांची मिरवणूक स्थानिक पटेल हायस्कूल चौकातून निघाली. संघटनेचे कार्यकर्ते आदिवासींचे नृत्य सादर करत होते. मिरवणुकीत मध्यभागी संघटनेचे अधिकृत उमेदवार आमदार अ‍ॅड. वामनराव चटप लोकांना हात जोडून आशीर्वाद घेतले.
शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी, महिला आघाडी प्रमुख सरोज काशीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अ‍ॅड. चटप यांनी अर्ज सादर केले. भारिप बहुजन महासंघाचे अधिकृत उमेदवार देशक खोब्रागडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बॅ. राजाभाऊ खोब्रागडे, गिरीश खोब्रागडे यांच्या पुतळय़ाला अभिवादन करून शहराच्या मुख्य मार्गाने मिरवणूक काढली. मिरवणूक जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचल्यानंतर देशक खोब्रागडे यांनी अर्ज दाखल केला. तीन प्रमुख उमेदवारांसह आज एकूण चौदा उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यामध्ये संजय राघोबा ताजणे, सुधीर मोतीराम हिवरकर, विठोबा सदाशिव गिलबिले, भास्कर परसराम डेकाटे, सुरेंद्र अंगद तिवारी, रज्जाक पठाण, अनिता संघरक्षीत खरतड, लोमेश मारोती खरतड, विठोबा दीनानाथ मेश्राम, नारायण साहू गोडे यांचा समावेश आहे.
भंडारा-गोंदिया मतदारसंघात २९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. काहींनी एकापेक्षा अधिक तर काहींनी पक्षाच्या नावे तसेच अपक्ष म्हणून अर्ज भरले. या मतदारसंघाकरिता राष्ट्रवादीचे उमेदवार प्रफुल्ल पटेल व अपक्ष म्हणून नाना पटोले यांनी अर्ज दाखल केले.
अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांमध्ये ब्रह्मस्वरूप गजभिये (अपक्ष), गणेशराम येळे (अपक्ष), ग्यानीराम आमकर (समाजवादी), ग्यानीराम आमकर (अपक्ष), प्रदीप राणे (अपक्ष), नाना फाल्गुनराव पटोले (अपक्ष), मूलचंद रहांगडाले (अपक्ष), संजय मेश्राम (गोंडवाणा गणतंत्र पार्टी), तेजराम मुटकुरे (अपक्ष), छत्रपाल बिसेन (अपक्ष), धनंजय मोहकर (भाजप), शिशुपाल नत्थुजी पटले (भाजप), मोहमद अली खाँ अब्दुल खाँ (अपक्ष), सदानंद गणवीर (अपक्ष), धनंजय राजभोज (अपक्ष), इंद्रकुमार राही (काँग्रेस), गणेशदेव डहरवाल (अपक्ष), सुनील जमईवार (राष्ट्रीय समाज पक्ष), डॉ. हरिश्चंद्र सलाम (अपक्ष), हेमंत उंदीरवाडे (प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी), महेंद्र खोब्रागडे (अपक्ष), प्रफुल्ल मनोहरभाई पटेल (राष्ट्रवादी काँग्रेस), नाना जैराम पंचबुद्धे (राष्ट्रवादी काँग्रेस), रोशन बडगे (अपक्ष), अकरसिंग पटले (अपक्ष), प्रतिभा वसंत पिंपळकर (भारतीय बहुजन महासंघ), कृष्णा गमरे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया-एकतावादी), मिर्झावाहिद बेग अहमद बेग (मुस्लीम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया),
यवतमाळात २५ अर्ज दाखल
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. काँग्रेसचे उमेदवार हरिभाऊ राठोड यांच्यासह तब्बल २५ उमेदवारांनी अर्ज आज दाखल केले. यात हरिभाऊसह विविध राजकीय पक्षांचे ८ उमेदवार असून इतर सर्व अपक्ष उमेदवार आहे. युनायटेड डेमॉक्रेटी फ्रन्टचे उमेदवार म्हणून पश्चिम मुंबईच्या जबिहार युनुस महंमद यांनी अर्ज दाखल केला आहे. या पक्षाचे अध्यक्ष कर्नल सुधीर सावंत यावेळी हजर होते. अर्ज दाखल करणाऱ्या महत्त्वाच्या उमेदवारात समाजवादी पक्षातर्फे महंमद खान अजीजखाँ पुसद, भारिप बहुजन महासंघातर्फे कुरैशी शेख मेहबुब पुसद, गोंडवाना गणतंत्र पार्टीतर्फे बंडू गणपत मेश्राम, यवतमाळ जनस्वराज्य शक्ती पक्षातर्फे दिलीप हरिभाऊ भालेराव रिसोड जि. वाशीम, बहुजन समाज पार्टीतर्फे राजानंद ऊर्फ राजू श्रावण गणवीर यांचा समावेश आहे.
काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे उमेदवार हरिभाऊ राठोड यांचा उमेदवारी अर्ज दाखल होण्यापूर्वी येथील गांधी भवनात त्यांच्या समर्थनार्थ मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे होते. यावेळी काँग्रेस उमेदवार हरिभाऊ राठोड, खासदार विजय दर्डा, माजी मंत्री वसंतराव पुरके, अपक्ष आमदार संजय देशमुख, माजी आमदार कीर्ती गांधी, सुरेश लोणकर, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रीतीला दुधे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उत्तम शेळके यावेळी उपस्थित होते. यावेळी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष वामनराव कासावार, प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता सर्व एकदिलाने हरिभाऊ मागे उभे झाले पाहिजे. आमच्याजवळ विकासाचा कार्यक्रम मात्र विरोधकांजवळ काहीच कार्यक्रम नसल्याने, अफवा ते पसरवू शकतात. पक्षात कोणतेही मतभेद नसून सर्व कामाला लागल्याचे ते म्हणाले. इतर सर्व वक्तयांनी विचार मांडल्यावर मिरवणुकीने सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात आले. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, खासदार विजय दर्डा, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उत्तम शेळके, माजी मंत्री वसंत पुरकेंसह हरिभाऊ राठोड यांनी जिल्हाधिकारी यांच्या कक्षात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला.
बुलढाणा लोकसभा मतदार संघात २० उमेदवारांनी २६ अर्ज सोमवारी दाखल केले. आतापर्यंत २६ उमेदवारांनी ३७ अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये डॉ. राजेंद्र शिंगणे - राष्ट्रवादी काँग्रेस, राजेश ताठे -अपक्ष, नीळकंठ ताठे -अपक्ष, सय्यद हुसेन -युडीएफ, इरफान रजाक -युडीएफ, वामन जाधव -स्वभाप, चंदर्कांत फेरन-अपक्ष, कुरेश शे. सिंकदर -अपक्ष, अमरदीप इंगळे -क्रांतीसेना, विठ्ठल तायडे -अपक्ष, रवींद्र ढोकणे - भारिप-बमसं, राजेश लहासे - अपक्ष, छगन मेहेत्रे - अपक्ष, शालिकराम सिराळ - अपक्ष, छगन राठोड - अपक्ष, ईश्वर पांडे - अपक्ष, अनीस बेग मिर्झा - अपक्ष, आशिष खरात - अपक्ष, दिलीप खरात - अपक्ष, पंढरीनाथ हुसे - अपक्ष, विठ्ठलराव दांडगे - अपक्ष यांचा समावेश आहे.