Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३१ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

स्वबळावर निवडणूक लढण्याचा मुद्दा इतिहासजमा -माणिकराव
नागपूर, ३० मार्च / प्रतिनिधी

सोनिया गांधी विदर्भात येणार
बंडखोरांवर कारवाईचा इशारा
नागपुरातील नाराजी दूर करू
महाराष्ट्रात स्वबळावर निवडणुका लढण्याचा मुद्दा आता इतिहासजमा झाला आहे. आघाडीतील

 

सर्व पक्षांना सोबत घेऊन निवडणुका लढलो तरच यश मिळेल, असे मत प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी येथे व्यक्त केले. काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी विदर्भात येणार असून त्यांच्या दौऱ्याची आखणी सुरू आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. परस्पर उमेदवारी अर्ज भरणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांनी दोन दिवसात ते परत न घेतल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी बंडखोरांना दिला.
काँग्रेसचे स्टार प्रचारक व युवा नेते राहुल गांधी यांच्या वर्धा येथील प्रचार दौऱ्याची माहिती देण्यासाठी आज माणिकराव ठाकरे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. राहुल गांधी यांच्या सभेची तयारी पूर्ण झाली असून ही सभा जंगी होणार असल्याचा दावा त्यांनी केला. राहुल गांधी यांच्यानंतर सोनिया गांधी विदर्भात येणार आहेत. त्यांच्याही दौऱ्याची आखणी सुरू आहे, असे ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी झाल्यानंतरही विलासराव देशमुख स्वबळावर निवडणूक लढण्याबाबत वक्तव्ये करीत असल्याकडे ठाकरे यांचे लक्ष वेधले असता त्यांनी आता हा मुद्दा इतिहासजमा झाल्याचे सांगितले. आघाडीत सामील सर्व पक्षांना सोबत घेऊन प्रचार करण्यावर पक्षाचा भर राहील असे ते म्हणाले.
राज्यात जास्तीत जास्त जागाजिंकण्यासाठी प्रदेश काँग्रेसने संपूर्ण तयारी केली आहे. काही लोकसभा मतदारसंघात झालेल्या बंडखोरीकडे त्यांचे लक्ष वेधले असता दोन दिवसात अर्ज परत घेतला नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. काँग्रेसचे उमेदवार असलेल्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी बंडखोरी केली आहे. राष्ट्रवादीने त्यांच्या बंडखोर नेत्यांना अर्ज मागे घेण्यास सांगावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले
नागपूरच्या काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी असल्याचे मान्य करून प्रमुख नेत्यांशी चर्चा करून ती दूर केली जाईल, असे सांगून सर्व नाराज नेते मुत्तेमवारांच्या प्रचारात सहभागी होतील, असा विश्वास माणिकरावांनी व्यक्त केला. नागपूर महापालिकेतील विरोधी पक्ष नेता ठरविण्याची जबाबदारी काही नेत्यांवर सोपवण्यात आली आहे. लवकरच हा प्रश्न निकाली निघेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.