Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३१ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

पळणारा आरोपी पोलिसांच्या गोळीबारात जखमी
मध्यवर्ती कारागृहातील घटना
नागपूर, ३० मार्च / प्रतिनिधी

पळून जातअसलेला कुख्यात आरोपी पोलिसांच्या गोळीबारात गंभीर जखमी झाला. मध्यवर्ती कारागृह परिसरात सोमवारी भल्या पहाटे सव्वातीन ते साडेतीन वाजताच्यादरम्यान ही घटना घडली.

 

सुनीलसिंह माणिकसिंह भादा (रा. आष्टी जि. वर्धा) असे आरोपीचे नाव असून त्याला मेडिकल रुग्णालयातील वार्ड क्रमांक १९मध्ये दाखल करण्यात आले आहे. काही महिन्यांपासून मध्यवर्ती कारागृहात असलेल्या सुनीलला नांदुरा पोलिसांनी प्रॉडक्शन वॉरंटच्या आधारे ताब्यात घेतले आणि तेथील एका गुन्ह्य़ाच्या तपासासाठी २४ मार्चला घेऊन गेले. रविवारी त्याची पोलीस कोठडी संपल्याने तेथील न्यायालयापुढे हजर केले आणि नागपूरला कारागृहात आणण्यासाठी बसने निघाले. नांदुऱ्याचे पोलीस हवालदार राजेंद्र देशमुख, सुनील मुळे (गनमॅन) व शिपाई सुनील साळुंके त्याच्यासोबत होते. अडीच वाजताच्या सुमारास ते व्हरायटी चौकात उतरले. तेथून ऑटोरिक्षाने सव्वातीन वाजताच्या सुमारास मध्यवर्ती कारागृह परिसरात पोहोचले. दुसऱ्या फाटकानंतर ऑटो रिक्षातून उतरल्यानंतर सुनीलने लघुशंकेसाठी विनंती केली. पोलिसांनी त्याला ‘रात्री अंधारात कोण बघते येथेच उरक’ असे म्हटले. सुनीलसिंह दूर जाऊ लागल्याने पोलिसांना शंका आली. दोन-तीन पावले जात नाही तोच त्याने हाताला जोरदार झटका दिला. त्यामुळे त्याच्या हातकडीला बांधलेली दोरी सुटली. सुनीलसिंह पळू लागल्याने तिघेही पोलीस त्याच्यामागे धावले. ‘थांब नाहीतर गोळ्या घालू’ असे ओरडत पोलीस त्याच्यामागे धावू लागले. कारागृह वसाहतीमधून धावत सुनीलसिंह परेड ग्राऊंडमध्ये आला. त्याच्या अंगात पांढरा पायजमा असल्याने अंधारात तो दिसताच पोलिसांनी त्याला पुन्हा थांबण्यास सांगितले. तो थांबत नाही हे दिसताच हवालदार सुनील मुळे याने त्याच्या रायफलीतून दोन गोळ्या झाडल्या. एक गोळी लागली नाही. दुसरी गोळी सुनीलच्या डाव्या मांडीला मागून लागली. सुनीलसिंह जागेवरच कोसळला.
हा पाठलाग सुरू असताना तिघे पोलीस ‘संत्री’, ‘मेजर’ असे ओरडत तसेच शिटय़ा वाजवत धावत होते. त्यामुळे वसाहतीमधील कर्मचारी जागे झाले आणि लाकडी दंडुके घेत मैदानाकडे धावले. योगायोगाने वर्धा मार्गावरून जात असलेल्या धंतोली पोलिसांच्या मोबाईल गस्त वाहनातील कर्मचाऱ्यांना गोळीबाराचा आवाज ऐकू गेला. परेड ग्राऊंडमध्ये आवाज ऐकू आल्याने पोलीस तेथे पोहोचले. कारागृहातूनही नियंत्रण कक्षाला सूचना गेली. मोबाईल वाहनातून बिनतारी संदेश नियंत्रण कक्षाला गेला. धंतोली पोलीस ठाण्यात रात्र पाळीतील पोलीस उपनिरीक्षक धनंजय पाटील, हवालदार संजय ठाकूर सहकाऱ्यांसह तेथे पोहोचले. धंतोली पोलिसांनी लगेचच सुनीलसिंह भादा याला मेडिकल रुग्णालयात नेले. या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस आयुक्त मधुकर गावित, पोलीस उपायुक्त कोमलसिंह ठाकूर, हरीष चव्हाण घटनास्थळी आले. त्यांनी नांदुरा पोलिसांची पाठ थोपटली. नांदुरा पोलिसांनी बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक िहमतराव देशभ्रतार यांना मोबाईलवरून या घटनेची माहिती दिली. पोलीस आयुक्तांनी बिनतारी यंत्रावरून संपर्क साधत नांदुरा पोलिसांचे अभिनंदन केले. दुपारी या तिघांचे आयुक्तालयात अभिनंदन करीत हवालदार संजय मुळे याला १ हजार रुपयांचे बक्षीस दिले.
सुनीलसिंह कुख्यात गुन्हेगार असून ‘मोक्का’चा आरोपी आहे. काही महिन्यांपूर्वीच पाचपावली पोलिसांनी त्याला पकडले होते. तेव्हा त्याने पोलीस हवालदारावर प्राणघातक हल्ला केला होता. गेल्याच आठवडय़ात धंतोली पोलीस ठाण्यातून पळून गेलेला आरोपी राजा कलसी याचा सुनील साथीदार आहे. धंतोली पोलिसांनी आरोपी सुनीलविरुद्ध ताब्यातून पळून जाण्याचा प्रयत्न व सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले.