Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३१ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

नागपुरात विक्रमी ४२ अंश तापमानाची नोंद
अकोला ४१.५, वर्धा ४१
नागपूर, ३० मार्च / प्रतिनिधी

उन्हाचे चटके वाढतच असून २००४ नंतर आज नागपुरात मार्च महिन्यातील गेल्या पाच वर्षांतील

 

सर्वाधिक म्हणजे ४२ अंश कमाल तापमानाची नोंद करण्यात आली.
हवामानात झपाटय़ाने होणाऱ्या बदलांचा अनुभव यंदा नागरिक घेत आहेत. मार्च महिन्याच्या आरंभी तापमानात झपाटय़ाने वाढ झाली व विदर्भाच्या अनेक भागात पारा ४० अंशांवर पोहोचला. मात्र पुन्हा हवामान बदलले आणि मार्चच्या मध्यात विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने तापमानात झपाटय़ाने घट होऊन पुढचा आठवडाभर नागरिकांना उन्हाचे चटके आणि उकाडय़ापासून दिलासा मिळाला. त्यानंतर मार्चच्या शेवटच्या आठवडय़ात पुन्हा पारा चढायला लागला व तापमान ३५ अंशांपर्यंत पोहोचले. गेल्या तीन दिवसात सकाळपासून कडक उन्हं तर, दुपारनंतर ढगाळलेले आकाश अशा लहरी हवामानाचा अनुभव नागरिक घेत आहेत. मात्र आज नागपुरात २००४ नंतर पहिल्यांदाच मार्च महिन्यातील सर्वाधिक म्हणजे ४२ अंश कमाल तापमानाची नोंद झाली. सकाळपासून जाणवणाऱ्या उन्हाच्या चटक्यांमुळे नागरिक हैराण झाले. आज विदर्भाच्या तीन जिल्ह्य़ांमध्ये पारा चाळीस अंशांपुढे गेला. अकोला येथे ४१.५ आणि वर्धा येथे ४१ अंश कमाला तापमानाची नोंद झाली. वाशीममध्ये ३९.६ अंश तर, बुलढाण्यात ३८ अंश तापमान नोंदवण्यात आले. यापूर्वी २८ मार्च १८९२ मध्ये सर्वाधिक ४५ अंश तापमानाची नोंद झाली आहे. ४ मार्च १८९८ ला केवळ ८.३ अंश किमान तापमान नोंदवण्यात आले. ३१ मार्च १९९९ मध्ये ४१, २८ मार्चला २००० मध्ये ४०.४, २००१ मध्ये २५ मार्चला ४०.२, २५ मार्च २००२ ला ४०.४, २१ व ३१ मार्च २००३ ला ४०, २० व २२ मार्च २००४ ला ४२, २८ मार्च २००५ ला ४०.१, २६ व २७ मार्च २००६ ला ३८.६, ३१ मार्च २००७ ला ४०.७ तर, ८ मार्च २००८ ला ३८.७ अंश कमाला तापमान नोंदवण्यात आले.