Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३१ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

फर्स्ट सिटीच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन
नागपूर, ३० मार्च / प्रतिनिधी

रिटॉक्स बिल्डर्स अ‍ॅन्ड डेव्हलपर्सतर्फे मिहान प्रकल्पात ३१ एकरात साकारण्यात येत असलेल्या फर्स्ट सिटीच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन गुढीपाडव्याला खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार अशोक मानकर, वात्सल्य समूहाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक प्रफुल्ल गाडगे

 

आणि रिटॉक्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अतुल शिरोडकर उपस्थित होते.
फर्स्ट सिटीच्या दुसऱ्या टप्प्यातील सदनिका विकण्याची जबाबदारी वात्सल्य बिल्डर्स आणि डेव्हलपर्सवर सोपवण्यात आली आहे. यावेळी दर्डा म्हणाले, मिहान भविष्यात देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्वपूर्ण प्रकल्प ठरणार आहे. हा प्रकल्प ठरलेल्या वेळेत पूर्ण होणार असून २०५० मध्ये जगावर भारताचा तिरंगा फडकरणार आहे. ते लक्ष्य ठरवूनच योजना आखण्यात आल्या असल्याचे दर्डा म्हणाले. अतुल शिरोडकरांनी नागपुरात फर्स्ट सिटी प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेऊन विकासात हातभार लावला आहे. तसेच विपणनाची जबाबदारी गाडगे यांच्यावर टाकून महत्वाचे काम पार पाडले आहे. यावेळी प्रकल्पाबाबत माहिती देताना शिरोडकर म्हणाले, फर्स्ट सिटीमध्ये प्रारंभी क्लब हाऊस आणि स्विमिंग पुल बांधण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्याच्या विपणनाची जबाबदारी वात्सल्य समूहावर सोपवण्यात आली आहे. या प्रकल्पात एकूण १७०० सदनिका आहेत. सर्व योजना लवकरच पूर्ण करण्यात येतील, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
यावेळी माहिती पुस्तिकेचे दर्डा यांच्याहस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला आमदार देवेंद्र फडणवीस, मोतीलाल चौधरी, कैलाश खोब्रागडे, सुनील वासनकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.