Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३१ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

खरसोलीतील योग शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर, ३० मार्च / प्रतिनिधी

पतंजली योग समितीतर्फे नरखेड तालुक्यातील खरसोली येथे पाच दिवसीय योग प्राणायाम शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात योग तज्ज्ञ मनोहर नरेटे यांनी प्रात्याक्षिकासह योगाची

 

माहिती दिली. शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
रोगमुक्त देह, विकार मुक्त बुध्दी, प्रसन्न आत्मा व शांत निरामय जीवन जगण्यासाठी योग व प्राणायाम करा. यातूनच स्वस्थ भारताची कल्पना साकार होणार आहे. योगाने शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनात क्रांतिकारी बदल होत आहे. आज जनतेत योगाविषयी जागरुकता व उत्साह वाढत आहे. योग साधना केल्याने शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक लाभ मिळतात. तेव्हा योग करा व निरोगी समाजाची निर्मिती करा, असे आवाहन या शिबिरात योग तज्ज्ञांनी केले.
नरखेड पंचायत समितीचे सभापती नरेश अडसडे यांच्या हस्ते मनोहर नराटे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. पाच दिवस चाललेल्या या शिबिरात दोनशे नागरिक सहभागी झाले होते. यानंतर दररोज ग्राम सफाई मोहीम राबवण्यात आली. शिबीर यशस्वी करण्यासाठी सहयोगी योग शिक्षक दीपक ढोमणे, प्रमोद बांदरे, तारासिंग जरोले, विनायक रेवतकर, गुड्डू नरेटे यांनी सहकार्य केले.
एनआयटी गार्डनमध्ये योग व प्राणायाम शिबीर
योग प्राणायाम समितीच्यावतीने ५ ते १२ एप्रिलपर्यंत सकाळी ५.३० ते ७.३० वाजेपर्यंत दररोज नि:शुल्क योग विज्ञान व प्राणायाम शिबीर आयोजित करण्यात आले आहे. आशीर्वादनगर येथील एनआयटी गार्डनमध्ये आयोजित शिबिराचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन योग प्राणायाम समितीच्या वतीने करण्यात आले आहे.