Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३१ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

रोझ कन्व्हेंशनमध्ये डॉ. शास्त्री सन्मानित
नागपूर, ३० मार्च/प्रतिनिधी

इंडियन रोझ फेडरेशन आणि निलगिरी रोझ सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने उटी शहरातील सेंटेनरी रोझ पार्क येथे आयोजित २७व्या ऑल इंडिया रोझ कन्व्हेंशन आणि इंटरनॅशनल रोझ सेमिनारमध्ये नागपुरातील डॉ. एन.व्ही. शास्त्री यांना सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले. या सोहोळय़ाचे उद्घाटन तामिळनाडूच्या खादी आणि ग्रामोद्योग मंत्र्यांच्या हस्ते झाले. या सोहोळय़ाला इंडियन रोझ

 

फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. अरविंद साबळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सेंटेनरी रोझ पार्कमध्ये तीन हजाराहून अधिक जातींची ३० हजाराच्यावर गुलाबाची झाडे लावली गेली आहेत. या पार्कला गुलाबाच्या जागतिक संस्थेकडून गार्डन ऑफ एक्सलन्स हा किताब बहाल झाला आहे. यावेळी आयोजित अखिल भारतीय गुलाब प्रदर्शनात डॉ. एन.व्ही. शास्त्री यांनी भरपूर बक्षिसे मिळवली. या प्रदर्शनाच्या निमित्ताने दरवर्षी भारतात गुलाबावर संशोधनात्मक कार्य करणारे तसेच, गुलाबाच्या सोसायटीमार्फत विविध कार्यक्रम राबवणाऱ्या व्यक्तींना गोल्ड मेडल प्रदान करण्यात येते. यावर्षी नागपूरचे डॉ. एन.व्ही. शास्त्री आणि जयपूरचे अरूण यांना विजय पोकर्णा सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले. हैद्राबादचे नवाब शहा आलम खान, भोपाळचे ए.आर. खान यांना गुरुबक्शसिंग गोल्ड मेडल बहाल करण्यात आले. डॉ. शास्त्री यांनी गुलाबामध्ये संशोधन तसेच, गुलाबाच्या आंतरराष्ट्रीय स्तराच्या २५च्या वर गुलाबाच्या नवीन जाती विकसित केल्या आहेत. या कार्यासाठी त्यांना सुवर्ण पदक देण्यात आले.