Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३१ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

राहुलला नागपुरात आणण्यात काँग्रेस नेत्यांना अपयश
नागपूर, ३० मार्च/ प्रतिनिधी

निवडणुकीच्या हंगामात काँग्रेसचे स्टार प्रचारक राहुल गांधी नागपूरमार्गे वर्धेला जात असतानाही त्यांची नागपुरात जाहीर सभा होणार नसल्याने काँग्रेस नेते चिंतित आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या कर्मभूमीतून सुरुवात करावी म्हणून राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील वर्धा लोकसभा मतदारसंघाची निवड केली.

 

वर्धेला जाण्यासाठी राहुल गांधी उद्या सकाळी विमानाने दिल्लीहून नागपूरला येतील. येथूनच हेलीकॉप्टरने ते वर्धेला जाणार आहे. वर्धा येथे त्यांची १० वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे. सभा आटोपल्यावर ते नांदेडच्या सभेसाठी रवाना होतील. तेथे त्यांची ११.३० वाजता सभा होणार आहे.
राहुल गांधी नागपूरमार्गे वर्धेला जात असल्याने त्यांनी नागपूरला एक सभा घ्यावी, असा प्रस्ताव स्थानिक नेत्यांनी ठेवला होता. त्यासाठी दिल्ली दराबारी प्रयत्नही करण्यात आले. मात्र राहुल गांधींचा कार्यक्रम पूर्वीच ठरला असल्याने त्यात बदल करणे शक्य नाही, असे सांगण्यात आल्यावर स्थानिक नेत्यांनी त्यांच्या सभेसाठी सुरू केलेल्या प्रयत्नांना विराम दिला.
वर्धेचे काँग्रेसचे उमेदवार दत्ता मेघे यांचे समर्थक मात्र राहुल गांधी यांच्या दौऱ्याची वेगळीच कथा सांगतात. मेघेंनी पक्षात प्रवेश घेतला तेव्हाच राहुल गांधी यांनी सभेबाबत त्यांना शब्द दिला होता. त्यांनी दिलेला शब्द पाळला, असा त्यांचा दावा आहे. माणिकराव ठाकरे यांनी मात्र वर्धेत सभा घेण्यामागे गांधी जिल्ह्य़ातून काँग्रेसचा संदेश संपूर्ण देशात पाठवण्याचा उद्देश असल्याचे स्पष्ट केले. राहुल पुन्हा नागपुरात येणार का, असा सवाल केला असता माणिकरावांनी त्यांना संपूर्ण देशात प्रचार करायचा असल्याचे स्पष्ट केले.