Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३१ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

नागपूर शहरात तीन नवे सहायक पोलीस आयुक्त
नागपूर, ३० मार्च / प्रतिनिधी

नागपूर शहरात तीन नवे सहायक पोलीस आयुक्त सोमवारी रुजू झाले. शहरात आता सात सहायक

 

पोलीस आयुक्त झाले आहेत.
‘२५ लाख लोकसंख्येच्या नागपूर शहरात केवळ चारच सहायक पोलीस आयुक्त’ असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’च्या आजच्या अंकात प्रसिद्ध झाले. नागपूर शहरात सक्करदरा, गणेशपेठ, अंबाझरी, सीताबर्डी, एमआयडीसी, सदर, अजनी, कोतवाली, लकडगंज, पाचपावली, गुन्हे शाखेत दोन, विशेष शाखेत दोन, कल्याण, प्रशासन, वायरलेस, मुख्यालय, वाहतूक शाखेत चार, अशी सहायक पोलीस आयुक्तांची एकूण २२ पदे मंजूर आहेत.
कालपर्यंत केवळ चारच सहायक पोलीस आयुक्त शहरात उरले होते व त्यांच्याकडे इतर विभागांचा प्रभार सोपवण्यात आला आहे.
अजनी विभागाचे के. एस. बहुरे, कोतवाली विभागाचे जीवराज दाभाडे, लकडगंज विभागाचे वसंत सयाम व पाचपावली विभागाचे अनिल बोबडे हे ते चार सहायक पोलीस आयुक्त आहेत. आज शहरात तीन नवे सहायक पोलीस आयुक्त रुजू झाले. अमरावतीहून आलेले विजय बाहेकर यांना सीताबर्डी, मुंबईहून आलेले एस. एस. खाडे यांना सदर तर देऊळगावराजा येथून आलेले संतोष वानखेडे यांना सक्करदरा विभाग देण्यात आला आहे.
नव्या तीन नियुक्तया झाल्यानंतरही नागपुरात सहायक पोलीस आयुक्तांची एकूण १४ पदे रिक्त आहेत. शहर पोलीस दलात विशेष शाखा, गुन्हे शाखा, प्रशासन व वाहतूक शाखा महत्वाच्या गणल्या जातात. या शाखांमधील रिक्त पदे अद्याप भरली गेलेली नाहीत. शहरातील हालचालींवर पाळत ठेवण्याची आणि निवडणूक काळात त्याची विशेष गरज असलेल्या विशेष शाखेत सहायक पोलीस आयुक्त नाहीत, ही अत्यंत खेदजनक बाब शहर पोलीस दलाच्या नशिबी आली आहे.