Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३१ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

रामनवमीच्या दोन्ही शोभायात्रांची जय्यत तयारी
नागपूर, ३० मार्च / प्रतिनिधी

नागपूरची धार्मिक स्थळे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोद्दारेश्वर राम मंदिर व रामनगरातील राम मंदिरातून ३ एप्रिलला रामनवमीला निघणाऱ्या शोभायात्रेची तयारी जोमात सुरू झाली असून हजारो कार्यकर्ते शोभायात्रेच्या तयारीसाठी झटत आहेत. शोभायात्रेत देवदेवतांच्या मूर्ती व देखावे तयार

 

करण्यासाठी शहरातील विविध भागातील मूर्तीकार दिवस रात्र काम करीत आहेत.
पोद्दारेश्वर राम मंदिरातून निघणाऱ्या शोभायात्रेचे यावर्षी त्रेचाळीसावे वर्ष आहे. या दोन्ही शोभायात्रेत विविध धर्मातील लोक सहभागी होऊन एकजुटीने काम करतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षी प्रभूरामचंद्रांचा रथ मूर्तीकार शरद इंगळे करीत आहेत. बैद्यनाथ आयुर्वेद भवन, गुप्ता उद्योग समूह, पुरोहित अ‍ॅन्ड कंपनी, दै. भास्कर, सी.पी. पेपर अ‍ॅन्ड स्टेशनरी, बिग बाझार, विनिर ग्लास, उमरेडमधील अभियांत्रिकी महाविद्यालय, रुक्मिणी मेटल्स अ‍ॅन्ड सन्स, जायन्टस ग्रुप अ‍ॅन्ड सिटी, रामदेवबाबा भक्त मंडळ, दुर्गादेवी मानस मंडळ, सुतार समाज सेवा मंडळ, संत गाडगे महाराज बहुउद्देशीय मंडळ, चिंतेश्वर नवयुवक मंडळ आदी संस्थांतर्फे चित्ररथ तयार करण्यात येत आहेत.
पोद्दारेश्वर राम मंदिरातून दरवर्षी ६० ते ७० चित्ररथ निघतात तर रामनगरातून यावर्षी शंभरच्या जवळपास चित्ररथ शोभायात्रेत सहभागी होणार आहेत. यावर्षी रामसेतुवर व अयोध्येतील राम मंदिरावर चित्ररथ तयार करण्यात येत आहेत. चितार ओळीत फेरफटका मारला असता बहुतेक मूर्तीकारांकडे शोभायात्रेचे काम सुरू आहे. प्रभाकर सुर्यवंशी, मुलचंद पेंटर, अनिल बिंड, ताजणेकर, इंगळे इत्यादी मूर्तीकार रात्रीचा दिवस करून विविध देवदेवतांच्या मूर्ती तयार करण्यात व्यस्त आहेत. पोद्दारेश्वर राम मंदिरातून निघणाऱ्या शोभायात्रेची गेल्या दोन महिन्यांपासून तयारी सुरू असून त्यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. साधारणत गुढीपाडव्यापासून राममंदिरात शोभायात्रेची तयारी करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या बैठकी घेतल्या जातात.
समितीचे ज्येष्ठ सदस्य उमेश शर्मा यांनी सांगितले, शोभायात्रेची तयारी जवळपास पूर्ण झाली असून कार्यकर्ते कामाला लागले आहेत. दिवसेंदिवस रामभक्तांचा सहभाग वाढत आहे. चित्ररथांची कामे सुरू झाली आहेत. प्रभूरामचंद्रांच्या रथाचे काम मंदिराच्या मागच्या बाजूला सुरू आहे. पोद्दारेश्वर राम मंदिरासमोर उड्डाण पुलाचे काम सुरू असल्यामुळे मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहन ठेवण्यासाठी पुरेशी जागा नाही त्यामुळे अनेक लोकांनी मंदिर प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. दरवर्षीप्रमाणे शोभायात्रेच्या मार्गावर विविध संघटनांतर्फे प्रवेशद्वार व कमानी उभारण्यात येणार आहेत.
पश्चिम नागपूर नागरिक संघाचे यावर्षी सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्यामुळे शोभायात्रेची तयारी जोमात सुरू झाली आहे. यावर्षीची शोभायात्रा आकर्षक राहणार असल्याचे शोभायात्रा समितीचे संयोजक प्रवीण महाजन यांनी सांगितले. यावर्षी शोभायात्रेचे ३३ वे वर्ष आहे. शोभायात्रेत १०१ चित्ररथ व मार्गावर ६० ते ७० प्रवेशद्वार राहणार आहेत. चौकाचौकात पुष्पवृष्टी, विद्युत रोषणाई, विविध लोकनृत्य शोभायात्रेत
सहभागी होणार असून त्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. शिवाय शोभायात्रेच्या मार्गावर चौकात आकर्षक रोषणाई करण्यात येणार आहे. चित्ररथ तयार करण्यासाठी विविध संघटना समोर आल्या असून त्यांनी काम सुरू केले आहे. विविध समित्या स्थापन करण्यात आल्या असून प्रत्येक समितीला त्यांची कामे वाटून देण्यात आली आहेत. संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त दहाही दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
समितीचे अध्यक्ष संदीप गवई व संयोजक प्रवीण महाजन यांच्या नेतृत्वाखाली शोभायात्रेची तयारी जोमात सुरू आहे. आमदार देवेंद्र फडणवीस, अ‍ॅड. आनंद परचुरे, मितेश भांगडिया, माजी महापौर विकास ठाकरे, डॉ. पिनाक दंदे, बाबा मैंद, अ‍ॅड निशांत गांधी, अनिल आष्टनकर, सुनील हिरणवार, संजय पाल, संजय बंगाले, संदीप जोशी, परिणय फुके आदी समितीते पदाधिकारी व कार्यकर्ते शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. उत्तर नागपुरात मोतीबाग येथून निघणाऱ्या शोभायात्रेची तयारी जोमात सुरू झाली आहे.