Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३१ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

वरुण गांधींच्या वादग्रस्त वक्तव्याचे नागपुरातही पडसाद
रणजित देशमुख म्हणतात, आशीष भरकटला
नागपूर, ३० मार्च/प्रतिनिधी

वरुण गांधींनी पिलीभीतमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्याला समर्थन देण्याचा, माझा मुलगा आशीष देशमुख याचा निर्णय पूर्णत वैयक्तिक आणि भरकटलेला असून त्याच्याशी माझा कुठलाही संबंध नसल्याचा खुलासा आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजित देशमुख यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. वरुण गांधींना पाठिंबा देण्यापूर्वी आशीषने आपल्याशी साधी चर्चा केली नसल्याचेही त्यांनी

 

स्पष्ट केले.
पिलीभीत लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार वरुण गांधी यांनी मुस्लिम समाजाच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचे आशीष देशमुख यांनी समर्थन केले होते. वरुण गांधींच्या समर्थनार्थ पिलीभीतमध्ये झालेल्या आंदोलनात त्यांनी स्वतला अटकही करवून घेतली होती. या प्रकरणाशीही आपला संबंध नसल्याचे रणजित देशमुख यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. त्याचप्रमाणे गेल्या दोन तीन महिन्यांपासून आशीष देशमुख यांनी शहरात आयोजित केलेल्या कुठल्याच कार्यक्रमांना आपला पाठिंबा नव्हता. ते सर्व आशीषचे वैयक्तिक निर्णय असल्याचे देशमुख म्हणाले.
वरुण गांधींची कट्टर हिंदुत्ववादाची भूमिका प्रत्यक्षात विहिंपची आहे. अशा सांप्रदायिक भूमिकेला आपला कुठलाही पाठिंबा नाही. माझ्या निष्ठा सोनिया गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष सरकावर आहे. आशीषच्या बदललेल्या कडव्या भूमिकेबद्दल मी त्याच्याशी चर्चा करून घेतलेला निर्णय पुन्हा तपासून पाहण्याचा सल्ला दिला होता, असेही रणजित देशमुख म्हणाले. आशीष देशमुख यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांची भेट घेतल्याच्या वृत्तात तथ्य आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आशीष म्हणतो, मी राष्ट्रप्रेमी नागरिकाच्या पाठिशी
रणजित देशमुख यांनी मुलाच्या हिंदूत्ववादी भूमिकेबद्दल ‘तो त्याचा वैयक्तिक निर्णय आहे’ असा खुलासा केला असला तरी आशीष देशमुख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार, वरुण गांधी यांना दिलेला पाठिंबा हा केवळ एका राष्ट्रप्रेमी नागरिकाला दिलेला पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. वरुण गांधींविरुद्ध लावण्यात आलेल्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचा (रासुका) प्रत्येक देशप्रेमी नागरिकाने निषेध करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
देशद्रोह्य़ांचे हात तोडून टाकावे, या वरुण गांधी यांच्या भाषणाचे समर्थन करताना आशीष देशमुख यांनी त्यात काहीच गैर नसल्याचे स्पष्ट केले आहे. निवडणूक आयोगाने वरुणवर केलेली टीका व सरकारने रासुका लावून त्यांना केलेली अटक ही एका युवा नेत्याला दडपून टाकण्याची कारवाई आहे, अशी टीकाही आशीष देशमुख यांनी केली आहे.
वरुण गांधी देशभक्त घराण्याचे वारस असून सरकारने त्यांच्यावर रासुकाची कारवाई करून देशभक्त घराण्याचा अपमान केला आहे. काँग्रेसप्रणित युपीए सरकार, राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार सर्वसामान्यांना सुरक्षा देण्याबरोबरच सर्वच पातळीवर अपयशी ठरले असल्याची टीकाही आशीष देशमुख यांनी केली आहे.
माणिकराव म्हणतात,
निलंबनाची कारवाई करू
हिंदुत्ववादी भूमिका घेतल्याबद्दल आशीष देशमुख यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्याचे समाधानकारक उत्तर न मिळाल्यास त्यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी नागपूरला आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.