Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३१ मार्च २००९
नवनीत

जी व न द र्श न
विश्वासघाताच्या पलीकडे

 

मैत्री आणि द्रोह हे जीवनातील पायाभूत अनुभव आहेत. माणसाला कधी अमृताहून मधुर अशा मैत्रीची गोडी चाखायला मिळते, तर कधी नरकाहून भयंकर अशा जहराचा घोट घ्यावा लागतो. ख्रिस्ताने दोन्ही प्रकारचे अनुभव घेतले. मार्था, मेरी आणि लाझारस या भावंडांनी ख्रिस्तावर अकृत्रिम प्रीती केली. येशू परगावी असताना लाझारसाला अचानक मृत्यू आला. ती दुखद वार्ता ऐकताच येशूच्या डोळय़ांतून अश्रू ओघळले. देव माणसासाठी रडला! येशूने वयाच्या तिसाव्या वर्षी कार्यारंभ केला. त्याने बारा शिष्यांची निवड केली. त्याने त्यांना देवराज्याची कथा सांगितली. नव्या मानवतेचे दर्शन त्यांना घडवले. बारा गावचे पाणी प्यालेले ते बारा गडी होते. त्यांच्यात पीटरसारखा दिलदार दिलाचा मच्छिमार होता. मॅथ्यू नावाचा धनवान जकातदार होता. शंकेखोर थॉमस होता, तर मनकवडा ज्युडास होता. खेडय़ा-पाडय़ातील ही रांगडी माणसे. त्यांच्यात अधूनमधून वादावादी होत असे; परंतु येशू साऱ्यांना आपल्या पदराखाली घेऊन अध्यात्माचे धडे देत असे. अवघ्या तीन वर्षांचा कार्यकाळ येशूला लाभला. त्याने गोरगरिबांना आधार दिला. पतितांना नव्याने जगण्याची उभारी दिली; परंतु दांभिक धर्मसत्तेला आणि भ्रष्ट राजसत्तेला त्याने आव्हान दिले. त्याचा परिणाम स्पष्ट होता. ते त्याला ठार करणार होते. येशूने ही गोष्ट आपल्या शिष्यांना सांगितली. तेव्हा प्रत्येकाने आपल्या एकनिष्ठेची ग्वाही दिली. तो त्यांना म्हणाला,‘‘अशी वेळ येत आहे की, तुम्ही सारे आपापल्या घरी जाल आणि मला एकटे सोडाल; परंतु मी एकटा नाही, कारण परमपवित्र पिता माझ्याबरोबर आहे.’’ सत्त्वपरीक्षेची वेळ आली तेव्हा सारे निघून गेले. ज्याच्यावर त्याची भिस्त होती त्या ज्युडासने त्याचा मुका घेऊन त्याला शत्रूच्या हाती धरून दिले. तरीही येशूच्या ओठावर त्याच्यासाठी शब्द होता- ‘मित्रा!’ विश्वासघाताचे जहर येशूने पचवले. त्याच्या ओठावर अखेरचे शब्द होते, ‘पित्या, त्यांना क्षमा कर. कारण ते काय करतात ते त्यांना ठाऊक नाही.’
फादर फ्रान्सिस दिब्रिटो
francisd43@gmail.com

कु तू ह ल
सूर्यग्रहण
सूर्यग्रहण कसं लागतं? सूर्यग्रहणं ही कोणकोणत्या प्रकारची असतात?
सूर्याला ग्रहण लागणं म्हणजे सूर्य झाकला जाणं. पृथ्वीवरून पाहताना कधीकधी चंद्र सूर्याला झाकतो, त्या घटनेला आपण सूर्यग्रहण असं म्हणतो. सूर्यग्रहण होण्यासाठी पहिली आवश्यकता म्हणजे सूर्य-चंद्र-पृथ्वी यांचं एका सरळ रेषेत येणं. ही शक्यता केवळ अमावस्येलाच प्रत्यक्षात येऊ शकते. पण पृथ्वीभोवती चंद्र ज्या कक्षेत फिरतो ती कक्षा सूर्य-पृथ्वी कक्षेला समांतर नसून थोडीशी कललेली आहे. त्यामुळे बहुतेक अमावस्यांना चंद्र आकाशात सूर्याच्या थोडासा वर किंवा खाली असतो. मात्र कधीतरी सूर्य व चंद्र अमावस्येच्या दिवशी एकमेकांसमोर येतात आणि सूर्याला ग्रहण लागतं. सूर्यग्रहणाचे तीन प्रकार असतात. चंद्राने सूर्यबिंबाचा काही भागच झाकला तर दिसतं ते खंडग्रास सूर्यग्रहण. जर चंद्रामुळे सूर्य पूर्णपणे झाकला गेला तर दिसतो खग्रास सूर्यग्रहण हा निसर्गाचा अप्रतिम आविष्कार! सूर्यग्रहणाचा तिसरा प्रकार म्हणजे कंकणाकृती सूर्यग्रहण. कधीकधी चंद्रबिंब सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही. अशावेळी सूर्य बांगडीसारखा म्हणजे कंकणाकृती दिसतो. खग्रास सूर्यग्रहणासाठी आवश्यक असलेला सर्वात मोठा योगायोग म्हणजे सूर्यबिंब व चंद्रबिंब यांचा सारखाच आकार. सूर्य-पृथ्वी अंतर व सूर्य-चंद्र अंतर यामध्ये सुमारे ४०० पटीचा फरक आहे, तसंच सूर्याचा व्यास व चंद्राचा व्यास यामध्येही सुमारे चारशे पटीचा फरक आहे. या आश्चर्यकारक योगायोगामुळेच सूर्यबिंब व चंद्रबिंब यांचा आकार पृथ्वीवरून सारखाच दिसतो. सूर्याला चंद्रबिंबाने पूर्णपणे झाकल्याच्या स्थितीला खग्रास स्थिती असं म्हणतात. खग्रास स्थिती जास्तीतजास्त ७ मिनिट ३१ सेकंद दिसू शकते. कंकणाकृती सूर्यग्रहणाचा जास्तीतजास्त कालावधी १२ मिनिट ३० सेकंद असू शकतो.
प्रदीप नायक
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
रने देकार्त
तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात आधुनिक तत्त्वज्ञानाचा जनक म्हणून रने देकार्त यांना अग्रपूजेचा मान दिला जातो. त्यांचा जन्म ३१ मार्च १५९६ रोजी फ्रान्समधील तुरेन या प्रांतात झाला. त्या काळातील पारंपरिक पद्धतीचे शिक्षण जेसुईटच्या ‘ला प्लेशे’ या शाळेतून घेतले. तथापि त्यांचे विचार पारंपरिक शिक्षण घेऊनही स्वतंत्र राहिले. काही काळ सैन्यात नोकरी केल्यावर भरपूर प्रवास करून पॅरिस सोडण्याचा त्यांनी निर्णय घेतला. कारण पॅरिसमध्ये लेखन-वाचनासाठी शांतता मिळणे शक्य नव्हते. ते हॉलंड येथे स्थायिक झाले ते अगदी मृत्यूपर्यंत! गणित आणि विज्ञानात त्यांना विशेष गती होती. पदार्थविज्ञानाची संकल्पना न्यूटनच्या अगोदर त्यांनी मांडली होती. ‘ला मान्ट्’ या ग्रंथातून त्यांनी विश्वातील घडामोडींचे स्पष्टीकरण गणिताच्या भाषेत मांडता येते हे पहिल्यांदा जगाला सांगितले. ज्ञानाचा उगम बुद्धीतच आहे, असे मत त्यांनी मांडले. आपले २० वर्षांचे चिंतन त्याने ला मॉन्ट् या ग्रंथातून साधले असले तरी तो ग्रंथ ख्रिस्ती धर्ममरतडाच्या भीतीमुळे प्रकाशित केला नाही. यावर उपाय म्हणून एक छोटी पुस्तिका ‘डिस्कोर्स ऑन द मेथड’ ही प्रसिद्ध केली. यातून मेथापिझिकलची कल्पना त्यांनी मांडली. ‘मी विचार करतो म्हणून मी आहे’, हे तत्त्व त्यांच्या विचारांचे सार आहे. त्यांचे विचार वास्तववादी होते. त्यांची मते धर्माधांना मान्य नसल्याने हॉलंडमधली २० वर्षे त्यांनी अज्ञातवासात काढली. ११ फेब्रुवारी १६५० रोजी त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतरही धर्ममरतडांचा ससेमिरा सुटला नाही. फ्रान्सने त्यांचा मृतदेह पुरण्यास नकार दिला. पुढे त्यांचे थोरपण लक्षात आल्यावर पॅरिसमध्ये मोठय़ा सन्मानाने त्यांच्या मृतदेहाचे दफन करण्यात आले. ल्ल संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
लाडके फ्रेंड आबोदा

दामोदर आजोबांना आपल्या नातवाचे खूप कौतुक होते. जो भेटेल त्याला शौनकच्या बाललीला सांगायचे. तो कोडय़ांचे खेळ चुटकीसरशी सोडवतो, याचा त्यांना अभिमान होता. शौनक माझी नक्कल फार छान करतो म्हणत तो कसा वाकून चालतो, चष्म्यावरून बघत बोलतो, पेपर वाचत बसतो आणि सगळय़ांना सांगतो ‘मी आता आबोदा आहे’. आजोबा रोज आतुरतेने आपल्या नातवाची वाट पाहायचे. तो उत्साहाने रसरसणारा, चिमखडे बोल बोलणारा नातू त्यांच्या आयुष्याचा प्रकाश होता. तो आला की, त्याच्याबरोबर त्यांचे कंटाळवाणे, निरस आयुष्य रंगीबेरंगी होई. तो नसताना त्याच्या बाललीलांच्या आठवणींनी त्यांचे एकसुरी आयुष्य संगीतमय होई. शौनक आई-बाबांबरोबर आजी-आजोबांच्या फ्लॅटवर एका सुंदर सकाळी आला. आजोबांना शौनकला पाहून इतका आनंद झाला की, नाष्टा करताना तसेच उठून ते दाराकडे लगबगीने आले. ‘अरे शोनू, कसा आहेस तू? शाळेतल्या टीचरना तू काढलेलं फुगेवाल्याचं चित्र दाखवलंस का..’ म्हणत आजोबा त्याच्याजवळ गेले. थोडय़ा थंड, पण त्रासिक स्वरात शौनकची आई म्हणाली,‘‘अण्णा, अहो तो बूट काढतोय ना? थांबा ना थोडं! नंतर विचारा काय विचारायचंय ते!’’ आजोबांना मात्र काय करू, काय नको असं झालं होतं. त्यांनी मोठ्ठी कॅडबरी, चित्र काढण्यासाठी स्केचबुक, रंगीत पेन्सिली, शौनकला आवडते म्हणून छोटीशी बॅटरीवर चालणारी मोटारकार असा खजिना साठवून ठेवला होता. ‘शौनक, अरे बाळा, तुझ्यासाठी आबोदानं काय काय गंमत आणलीय ठाऊक आहे का? ओळख पाहू काय असेल..? हं, हं.. फक्त तीनवेळाच सांगायचं. मग गेले मार्क. अरे..’ आजोबा भराभरा उत्साहाने बोलत होते. शौनकच्या आईनं म्हटलं,‘‘त्याला नीट दूध पिऊद्या. मधेमधे बोलायला लावू नका. ठसका लागेल.’’ आजीला हे सगळं फार दुखदायक वाटत होतं. पण दामोदरना गप्प राहा म्हणून कसं सांगणार. आपलं दुखणं, आजार, म्हातारपण सगळं विसरून शौनकबरोबर किती आनंदात असतात अण्णा. कसं काही म्हणायचं त्यांना? ती आपली सुनेवरचा राग आणि नाराजी गिळून गप्प बसली. शौनकचं दूध पिऊन झालं. त्यानं कधी नव्हे ते कटकट न करता शहाण्यासारखं घटाघट पिऊन टाकलं दूध. कारण त्याला आजोबांबरोबर गप्पा मारायच्या होत्या. अनेक गमती सांगायच्या होत्या. दामोदरांना काय मूड आला कुणास ठाऊक! ते म्हणाले,‘‘शोन्या, चल आपण दंगामस्ती खेळूया. बघू कोण जास्त दंगा करतंय.’’ शौनकच्या आईने ते ऐकले आणि ती घाईने आजोबांच्या स्टडीत येऊन म्हणाली,‘‘शौनक, आजोबांशी दंगामस्ती करायची नाही. तुला माहिती आहे, ते म्हातारे आहेत. त्यांना बरं नसतं. तू आपला तुझ्या बाबांबरोबर काय दंगा करायचा तो कर.’’ पाच वर्षांचा शौनक मोठय़ांदा आईवर ओरडला,‘‘तू मला सारखंसारखं काही सांगू नकोस. ते माझे आबोदा आहेत. माझे सगळय़ांत लाडके फ्रेंड. तू घरी जा. मी आबोदांकडेच राहीन.’’ आपले आजी-आजोबा आपल्यावर खूप प्रेम करतात आणि त्यांना तुमच्या प्रेमाची गरज असते. आजचा संकल्प- मी आजी-आजोबांना भेटेन. त्यांना आवडणाऱ्या गोष्टी त्यांच्यासाठी करेन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com