Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३१ मार्च २००९

अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कायद्याआडून हिंदू धर्म संपविण्याचा प्रयत्न - नरेंद्र महाराज
बेलापूर/वार्ताहर

हिंदूनी पाश्चात्य संस्कृती झुगारून भारतीय संस्कृतीचे आचरण करण्याची आवश्यकता असून, त्यासाठी प्रत्येक पालकाने स्वत:च्या मुलांवर चांगले संस्कार करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन स्वामी नरेंद्र महाराज यांनी येथे केले. कोपरखैरणे येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. हिंदू धर्मात पुनप्र्रवेश केलेल्या २५० जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा व प्रवचनाचा कार्यक्रम रविवारी संपन्न झाला. याप्रसंगी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले, श्रीराम सेनेचे प्रमोद मुतालिक यांनी पब संस्कृतीला विरोध केला. ही बाब चांगली असली, तरी त्यांनी कायदा हातात घेणे योग्य नव्हते. पालक मुलांवर चांगले संस्कार करण्यास कमी पडल्याने मुले अशा संस्कृतीकडे वळली आहेत. पालकांनी आत्ताच मुलांवर अंकुश ठेवला नाही, तर नंतर त्यांच्यावर पश्चात्ताप करण्याची वेळ येईल. जन्मदिवसाला केक कापून मेणबत्त्या फुंकण्यासारख्या पाश्चात्य संस्कृतीला हिंदूंना विरोध केला पाहिजे, असेही मत त्यांनी व्यक्त केले. अशिक्षितपणा, आर्थिक दुर्बलता ही धर्मातरणाची कारणे आहेत. असे धर्मातरण करण्यामध्ये ख्रिश्चन मिशनरी आघाडीवर आहेत. धर्मातरण करून राष्ट्रांतर करण्याचा त्यांचा डाव आहे. यासाठी धर्मातर बंदी कायदा भारतात लागू करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेले कायदे पुरेसे आहेत. यासाठी नवीन कायदा करणे म्हणजे हिंदू धर्म संपविण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. गीता, रामायण, ज्ञानेश्वरी शाळा व महाविद्यालयांमधून शिकविण्यात आली, तर खऱ्या अर्थाने अंधश्रद्धांचे निर्मूलन होईल. यासाठी शैक्षणिक अभ्यासक्रमात तशी सुधारणा करणे आवश्यक असल्याचे नरेंद्र महाराज म्हणाले. जो हिंदू हिताचा विचार करेल अशांना निवडून द्या, असेही ते म्हणाले.

धूतपापेश्वर: भट्टीचे लवकरच स्थलांतर
पनवेल/प्रतिनिधी

१३५ वर्षांची प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या पनवेलमधील श्री धूतपापेश्वर आयुर्वेदिक कारखान्यामुळे परिसरातील नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे या कारखान्यातर्फे सांगण्यात आले आहे. गेल्या काही दिवसात कारखान्याची बदनामी करणारी वृत्ते प्रसिद्ध झाली आहेत. तसेच कारखान्याविरुद्ध चुकीच्या तक्रारी नोंदविल्या जात आहेत; परंतु यात काहीच तथ्य नसून नागरिकांना इजा पोहोचेल, अशी कोणतीही कार्यपद्धती राबविली जात नसल्याचा दावा कारखान्याने केला आहे. देशभरात तसेच परदेशात गुणकारी आणि दर्जेदार आयुर्वेदिक औषधांचा पुरवठा करणाऱ्या या कारखान्यात इंधनासाठी केवळ गायीच्या शेणाच्या गोवऱ्यांचा तसेच लाकडाचा वापर केला जातो. या इंधनाच्या ज्वलनामुळे कारखान्यातून धूर बाहेर पडतो. पूर्वी पनवेलच्या वेशीवर असणारा हा कारखाना आता वाढलेल्या वस्तीमुळे शहराच्या केंद्रस्थानी आला आहे. या धुराचा त्रास परिसरातील नागरिकांना होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यातील भट्टीचा विभाग वावंजे येथील नवीन प्रकल्पाच्या ठिकाणी स्थलांतरित करण्याचा निर्णय कारखान्याने घेतला आहे आणि लवकरच त्याची अंमलबजावणीही होणार आहे. मात्र तरीही काही व्यक्ती आणि पक्षांकडून कारखान्यावर मोर्चा काढण्याच्या, कारखाना बंद पाडण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. अशा परिस्थितीत ग्राहकांनी आणि पाठीराख्यांनी कारखान्याविरुद्ध होणाऱ्या अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन कारखान्याच्या मालकांनी केले आहे. दरम्यान, या कारखान्याच्या वावंजे प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी गेलेला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा पदाधिकारी आणि कारखान्याचे व्यवस्थापक यांच्यात शनिवारी संध्याकाळी बाचाबाची झाली. कळंबोली पोलिसांनी या पदाधिकाऱ्याला अटक केल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.