Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३१ मार्च २००९

उत्तर महाराष्ट्रास उष्म्याचा तडाखा
प्रतिनिधी / नाशिक

मध्यंतरी झालेल्या बेमोसमी पावसामुळे खाली उतरलेला नाशिकच्या तापमानाचा पारा पुन्हा एकदा झपाटय़ाने वर जावू लागला असून सोमवारी दुपारी तापमानाने ३८ अंश सेल्सिअसहून अधिक नोंद करीत यंदाच्या हंगामातील सर्वोच्च तापमान गाठले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना आता भर उन्हात प्रचाराची कसरत करावी लागत आहे. संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात उष्णा वाढू लागल्याने सर्वसामान्य नागरीकही हैराण झाले आहेत. भुसावळमध्ये उच्चांकी तापमान ४२ अंश एवढे नोंदविले गेले.

पक्षाच्या ‘डिव्हिडंड’अभावी वैयक्तिक भांडवलावरच भिस्त..
अभिजीत कुलकर्णी

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असणाऱ्या सहा पैकी एकाही विधानसभा मतदारसंघात स्वपक्षाला प्रतिनिधित्व नाही आणि उलट प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे मात्र सहापैकी तब्बल पाच आमदार अशी स्थिती कागदावर अत्यंत प्रतिकूल भासत असली तरी भाजपच्या हरिश्चंद्र चव्हाणांचे हौसले मात्र बुलंद आहेत. अर्थात, त्यामागे चव्हाण यांचा लोकसंपर्क, स्थानिक पातळीवरील राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आणि त्यातूनच विविध पक्षातील नेतेमंडळींशी जुळलेले त्यांचे सूर ही प्रमुख कारणे असल्याचे म्हणावे लागेल.

सावधान-विश्रामातला असहकार!
भाऊसाहेब :
काय म्हन्ती निवडनुकीची खडाखडी भावराव ?
भाऊराव : जोरात सुरू आहे, आता एकेकाचे उमेदवारी अर्ज भरून झाल्यावर प्रचाराला खरा वेग येईल.
भाऊसाहेब : त्ये अर्ज-बिर्ज भरनं म्हंजे लै जोखमीचं काम. तवा पुडारी-अधिकारी समद्ये यकदम ‘सावधान’मदी असनार..
भावडय़ा : हो, सध्या सावधान-विश्रामचा खेळ रंगात आहे.
भाऊसाहेब : म्हंजे ?
भावडय़ा : निवडणुकीच्या डावपेचांसाठी नेतेमंडळी एकदम सावधान झाली असली तरी आदर्श आचारसंहितेमुळे बहुतेक अधिकारी मात्र विश्राम घेत आहेत..
भाऊराव : नाही तरी एरवी कधी ते कामं करतात ?

‘दुय्यम मुद्दय़ांना महत्त्व नको’
योग्य माणूस योग्य जागी बसत नाही हीच आपल्याकडे शोकांतिका आहे. राजकारणात तर हे प्रकर्षांने जाणवते. पण, यासंबंधीचा विचार निवडणूक पर्वात ज्या गांभीर्याने व्हावयास पाहीजे आहे तोच होत नसल्याचे दिसते. खरे तर प्रत्येकाने जसे हे माझे घर आहे, तसा हा माझा देश आहे, हा विचार करण्यास प्रवृत्त व्हावयास पाहीजे. असा विचार जेव्हा प्रत्येकाला महत्वाचा वाटू लागेल, त्याचवेळी योग्य माणूस सत्तेवर जाऊन आपले कर्तव्य बजावण्याची प्रक्रिया सुरु होईल. आपण आपल्या घरातील प्रत्येक निर्णय घेताना जसे घराला कोणतेही नुकसान होणार नाही, याची काळजी घेतो तसेच या देशाचे भवितव्य राबवणारी माणसे अथवा नेते सत्तास्थानी बसतील तेव्हाच या भारतभूमीतून पुन्हा सुवर्णधूर निघू शकेल.

नाशिक-पुणे रस्त्याबाबत सारे काही उणे
प्रश्न जिव्हाळ्याचे, प्रतिनिधी / नाशिक

सुवर्ण चतुष्कोनातील शहरांचा वाहतुकीचा मार्ग प्रशस्त करण्याच्या उद्देशाने चौपदरीकरणाची योजना मांडली गेली असली तरी नाशिक-औरंगाबाद या राज्यमार्गाचा अपवाद वगळता नाशिक-पुणे महामार्गाचे विस्तारीकरण अद्याप नजरेच्या टप्प्यातही नाही तसाच नाशिक-सूरत महामार्ग देखील अजून आराखडय़ाच्या पातळीवरसुद्धा येऊ शकलेला नाही. नाशिकहून औरंगाबादला जाणाऱ्या सुमारे १९० किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे जवळपास निम्मे काम पूर्णत्वास गेले असताना नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा विषय सिन्नपर्यंतच्या प्रस्तावात अडकून पडला आहे.

‘व्होटर्स हेल्पलाइन’चा असाही अनुभव
प्रतिनिधी / नाशिक

मतदारांना आपले नांव मतदारयादीत आहे की नाही, यादी भाग क्रमांक कोणता, मतदान केंद्र कोणते याबाबत सविस्तर माहिती मिळावी या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयाने मोठा गाजावाजा करून सुरू केलेली वोटर्स हेल्पलाइन वास्तवात गैरसोयीचीच अधिक ठरत असल्याचा अनुभव पहिल्याच दिवशी नाशिककरांना घ्यावा लागला. अपूर्ण माहिती, अत्यल्प मनुष्यबळ, संवाद कौशल्याचा पूर्णत: अभाव असलेले कर्मचारी या सगळ्यामुळे संबंधित क्रमांकांवर वारंवार दूरध्वनी करूनही बहुसंख्य चौकस मतदारांच्या पदरी निराशाच पडत होती.

नाशिकची रंजना राऊत उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्काराने सन्मानित
नाशिक / प्रतिनिधी

पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतंर्गत एच. पी. टी. महाविद्यालयाची विद्यार्थिनी रंजना राऊतला महाराष्ट्र शासनाचा २००७-०८ या वर्षांचा राज्यस्तरीय उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार जाहीर झाला आहे. शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर महाविद्यालयातील सर्व उपक्रमातील सक्रिय सहभागातून हा पुरस्कार देण्यात आल्याची प्रतिक्रिया रंजनाने व्यक्त केली. विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. संजय चाकणे व विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. संभाजी पठारे यांनी रंजनाला पारितोषिक जाहिर केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी, कार्यक्रम अधिकारी प्रा. शशिकांत साबळे उपस्थित होते. रंजना ही नाशिक विभागातील अशा प्रकारचा पुरस्कार प्राप्त करणारी पहिलीच विद्यार्थिनी आहे. सदर कार्यक्रम पुणे विद्यापीठाच्या नाशिक विभागीय केंद्रात झाला. या कार्यक्रमास नाशिक जिल्हा समन्वयक बी. जे. भंडारे, विभागीय सचिव डॉ. पवार तसेच महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

डॉ. स्वाती टोकेकर यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन
नाशिक / प्रतिनिधी

येथील कुसुमाग्रज स्मारकमध्ये पुष्पावती रूंग्टा कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. स्वाती टोकेकर यांच्या ‘प्रश्न उमलत्या वयाचे’ व ‘तोल सांभाळतांना’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन माजी शिक्षण उपसंचालक निरंजन कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गोपाळराव बेळे, डॉ. अमोल कुलकर्णी, नरेश महाजन हे उपस्थित होते. कळमकर यांनी बदलत्या समाजजीवनाचा मूलभूत पायाभूत घटक म्हणजे मुले असल्याने तो सुरक्षित कसा राहील, या विषयी अंतर्मुख करणारी ही दोन्ही पुस्तके आहेत, असे सांगितले. टोकेकर यांनी अध्यापन करतांना मुलांशी निर्माण झालेल्या नात्यातून हा लेखन प्रवास सुरू झाल्याचे सांगितले. विद्याथ्यार्ंमुळे लेखनासाठी प्रेरणा मिळाली, असेही त्यांनी सांगितले. डॉ. कुलकर्णी यांनी एक उत्तम समुपदेशक म्हणून टोकेकरांची पुस्तके मार्गदर्शक ठरतील, असे सांगितले. यावेळी समीर कुलकर्णी, सोनाली मोरे, मानसी जगताप यांचा सत्कार करण्यात आला. जोगेश्वर नांदुरकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.

नसती उठाठेव मित्र परिवारातर्फे व्याख्यानमाला
नाशिक / प्रतिनिधी

येथील नसती उठाठेव मित्र परिवारातर्फे यंदाही हनुमान जयंती उत्सवानिमित्त येत्या तीन ते नऊ एप्रिल या कालावधीत व्याख्यानमाला, गीत रामायण व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गंगापूर रस्त्यावरील नरसिंहनगर येथील हनुमानमंदिराजवळ दररोज सायंकाळी सातला हे कार्यक्रम होणार आहेत. पहिल्या दिवशी म्हणजे तीन एप्रिल रोजी श्रीराम नवमीनिमित्त गीत रामायण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गायक प्रसाद दुसाने व सहकारी तो सादर करतील. दुसरे पुष्प सुहास आगरकर यांच्या ‘सामथ्र्य समर्थाचे’ या व्याख्यानाद्वारे गुंफले जाणार आहे. त्यानंतर ५ एप्रिल डॉ. श्रीकृष्णबुवा सिन्नरकर यांचे किर्तन, ६ व ७ एप्रिल विजय देशमुख यांचे ‘मृत्यूंजय महावीर कर्ण’ तर ८ एप्रिलला डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर आक्षेप व खंडण’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. ९ एप्रिल रोजी सकाळी सहाला श्री हनुमान जन्माचा कार्यक्रम साजरा केला जाणार आहे. पूजा अभिषेक, श्री सत्यनारायण पूजन, आरती आदींचा त्यात समावेश राहील.

आस केंद्रातर्फे महिला मेळावा
नाशिक / प्रतिनिधी

नाशिकरोड येथे महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, आस सेंटर फॉर ह्य़ूमन होप आणि एकात्मिक बालविकास सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वॉर्ड इंटरवेंशन व वस्ती विकास’ कार्यक्रमांतर्गत नाशिकरोड विभागातील गर्भवती महिलांसाठी ‘महिला मेळावा’ झाला. अध्यक्षस्थानी डॉ. आनंद तांबट (स्त्री रोगतज्ज्ञ) होते. प्रमुख पाहुणे म्हणून बालविकास प्रकल्प अधिकारी सुरेखा पाटील तसेच आसचे समन्वयक रवींद्र पाटील उपस्थित होते. डॉ. तांबट यांनी गर्भवती महिलांना त्यांचा आहार, व्यायाम, त्यांची मानसिकता, याबाबत कशी काळजी घ्यावी, शरीराची ठेवण, त्यावर अवलंबून असणारी गर्भधारणा व प्रसुती यावर मार्गदर्शन केले. एच. आय. व्ही. / एड्स या विषयावर अंगणवाडी सेविकांनी एक नाटिका सादर केली. तसेच मनिष वाघमारे यांनी गाणी सादर केली. प्रास्तविक सविता गजभिये यांनी केले. सूत्रसंचलन एस. डी. कोथुळकर यांनी केले. आभार द्वारका खैरनार व गौरी ताजनपुरे यांनी मानले.

निफाड तालुका विद्युत कर्मचारी पतसंस्थेवर नम्रता पॅनलचे वर्चस्व
नाशिक / प्रतिनिधी

निफाड तालुका महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्वच जागांवर सलग तिसऱ्यांदा बाळासाहेब कर्डीले यांच्या नेतृत्वाखालील नम्रता पॅनलने वर्चस्व सिद्ध केले. इतर मागासवर्ग गटात बाळासाहेब कर्डिले यांनी सर्वाधिक ८७ मते मिळवली तर सर्वसाधारण गटात बाबुराव काकूळते, राजेंद्र खालकर, संतोष बैरागी, शिवाजी सुरवाडे, विलास वडघुले, पॅडलिक याटे, मुकुंद कदम, सुभाष बोचरे, जगन्नाथ राऊत, भटक्या जमाती व विषेश मागास प्रवर्ग गटात कचरू शिंदे, अनुसूचित जाती-जमातीत खंडेराव घुरे आदी विजयी झाले. निवडणूक अधिकारी म्हणून ए. एम. ढोमसे यांनी कामकाज बघितले.

एटीएम सेंटरला आग
प्रतिनिधी / नाशिक

शहराच्या मध्यवस्तीतील गजबजलेल्या महात्मा गांधी रस्त्यावर सोमवारी दुपारी एका एटीएम सेंटरमध्ये अचानक आग लागल्याने खळबळ उडाली. अग्निशमव्न विभागाने आगीवर त्वरित नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज अग्निशामक विभागाने व्यक्त केला आहे.महात्मा गांधी रस्त्यावरील आयडीबीआय बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये ही घटना घडली. दुपारी बाराच्या सुमारास एटीएम सेंटरमधून धुराचे लोट बाहेर येऊ लागले. त्यामुळे भयभीत झालेल्या सुरक्षारक्षक व परिसरातील व्यावसायिकांनी या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला कळविली. तेव्हा कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले. शॉर्टसर्किंटमुळे एटीएम सेंटरमधील वातानुकूलीत सयंत्राला आग लागली होती. त्यात यंत्रणेचे किरकोळ नुकसान झाले असले तरी एटीएम यंत्र सुरक्षित असल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली. या एटीएम सेंटरच्या आसपास अनेक दुकाने आहेत. पाण्याचे बंब दाखल झाल्यानंतर बघ्यांची गर्दी जमल्याने महात्मा गांधी रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.