Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३१ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

उत्तर महाराष्ट्रास उष्म्याचा तडाखा
प्रतिनिधी / नाशिक

मध्यंतरी झालेल्या बेमोसमी पावसामुळे खाली उतरलेला नाशिकच्या तापमानाचा पारा पुन्हा एकदा झपाटय़ाने वर जावू लागला असून सोमवारी दुपारी तापमानाने ३८ अंश सेल्सिअसहून अधिक नोंद करीत यंदाच्या हंगामातील सर्वोच्च तापमान गाठले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना आता भर उन्हात प्रचाराची कसरत करावी लागत आहे. संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात उष्णा वाढू लागल्याने सर्वसामान्य नागरीकही हैराण झाले आहेत. भुसावळमध्ये उच्चांकी तापमान ४२ अंश

 

एवढे नोंदविले गेले.
६ ते २१ मार्च या कालावधीत तापमानाने ३५ अंशांचाही टप्पा ओलांडला नाही, त्यानंतर मात्र तापमानात हळूहळू वाढ होत असून सोमवारी त्याने कमाल पातळी गाठली. २६ मार्च रोजी ३५.५ अंश सेल्सिअस, २७ मार्च ३५.८, २८ मार्च ३५.९ तर २९ मार्च ३७. ८ अशी तापमानाची नोंद आहे. सोमवारी दुपारी हे तापमान ३८ अंश सेल्सिअस झाले, अशी माहिती हवामानशास्त्र विभागाने दिली. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्य़ातील तापमानात वाढ होत आहे. मागील आठवडय़ात सलग तीन दिवस भुसावळचे तापमान ४१ अंश सेल्सिअस होते. रविवारी तापमानाने ४२ अंशाचा टप्पा गाठला. उन्हाची तीव्रता पुन्हा वाढू लागल्याने दुपारच्यावेळी सर्वत्र सामसूम होते.