Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३१ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

पक्षाच्या ‘डिव्हिडंड’अभावी वैयक्तिक भांडवलावरच भिस्त..
अभिजीत कुलकर्णी

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असणाऱ्या सहा पैकी एकाही विधानसभा मतदारसंघात स्वपक्षाला प्रतिनिधित्व नाही आणि उलट प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे मात्र सहापैकी तब्बल पाच आमदार

 

अशी स्थिती कागदावर अत्यंत प्रतिकूल भासत असली तरी भाजपच्या हरिश्चंद्र चव्हाणांचे हौसले मात्र बुलंद आहेत. अर्थात, त्यामागे चव्हाण यांचा लोकसंपर्क, स्थानिक पातळीवरील राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आणि त्यातूनच विविध पक्षातील नेतेमंडळींशी जुळलेले त्यांचे सूर ही प्रमुख कारणे असल्याचे म्हणावे लागेल. पण, हे सारे वैयक्तीक भांडवल असतानाही या भागात भाजप मुळातच कमकुवत असल्याने त्यांना प्रतिस्पध्र्याप्रमाणे पक्षाच्या ताकदीचा ‘डिव्हीडंड’ मिळणे दुरापास्त आहे. दुसरीकडे मित्रपक्ष असलेल्या सेनेची भूमिकादेखील ‘स्लिपिंग पार्टनरशीप’चीच असणार, हेही तेवढेच खरे.
लोकसभेच्या गेल्या निवडणुकीप्रसंगी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश करून चव्हाणांनी चक्क बाजीही मारली. मात्र, गेल्या पाच वर्षांत परिस्थिती खूप बदलली आहे. मतदारसंघ पुनर्रचनेत त्यांच्या पूर्वीच्या मालेगाव मतदारसंघाचे अस्तिव लोप पाऊन दिंडोरी हा नवा मतदारसंघ अस्तित्वात आला आहे. त्यामुळे या ठिकाणची राजकीय समीकरणे अमूलाग्र बदलली आहेत. दिंडोरी मतदारसंघातील नांदगाव या शिवसेनेकडे असलेल्या एकमेव विधानसभा मतदारसंघाचा अपवाद वगळता उर्वरित पाचही विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहेत. या प्रक्रियेत चव्हाणांसाठी त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणावी लागेल ती म्हणजे मतदारसंघातून वगळलेला मालेगाव शहराचा भाग. कारण सध्याच्या रचनेत नांदगाव अथवा सुरगाण्याऐवजी हा भाग जर मतदारसंघात समाविष्ट असता तर भाजप उमेदवाराला विजयाची यत्किंचितही उमेद येथून राहिली नसती. हाच हातच्याचा अंक घेऊन चव्हाण आता आपल्या बेरजेच्या राजकारणाला लागले आहेत. प्रादेशिकतेचा विचार केल्यास चव्हाण यांच्या पथ्थ्यावर पडणारी आणखी एक बाब आहे, ती म्हणजे ते कळवण तालुक्याचे मूळ निवासी आहेत. त्यातच या भागावर ज्यांचा प्रभाव आहे, त्या आमदार ए. टी. पवारांना राष्ट्रवादीने खासदारकीचे तिकीट नाकारल्यामुळे नाही म्हटले तरी त्यांची नाराजी चव्हाणांना लाभदायी ठरेल. लगतच्या सुरगाणा भागात तर चव्हाणांच्या राजकारणाची पाळेमुळे रुजली असल्याने या परिसरातूनच मोठय़ातमोठी आघाडी पदरात पाडून घेण्याचे त्यांचे प्रयत्न असतील. त्याला आपल्या वैयक्तीक संपर्काची जोड देऊन चांदवड, नांदगाव, निफाड व येवल्यात चव्हाण यांना तग धरावी लागेल. नाशिक जिल्हा परिषदेच्या व जिल्हा सहकारी बँकेच्या राजकारणात प्रदीर्घकाळ असलेल्या चव्हाणांनी त्यामाध्यमातून जोडलेली या परिसरातील मित्रमंडळी आता त्यांच्या कामी येऊ शकतील. फारसा कुणाला न दुखवण्याचा स्वभाव ही देखील चव्हाण यांची जमेची बाजू म्हणावी लागेल. अणुकरारावरून केंद्र सरकारविरोधात मांडण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावाप्रसंगी रुग्णालयातून थेट दिल्लीला जाऊन पक्षाच्या बाजूने मतदान करण्याच्या निर्णयामुळे त्यांची पक्षनिष्ठा उजळून निघाली आहे. मतदारसंघात अल्प का होईना, पण जो काही निमशहरी भाग आहे, तेथे चव्हाण यांना त्याचा लाभ होईल. उमेदवारी आपल्यालाच मिळणार हे गृहीत धरून चव्हाण यांनी जवळपास सहा महिन्यांपासून मतदारसंघात भेटी-गाठींचे सत्र सुरू केले आहे. तसेच पहिल्या टप्प्यात झालेल्या मोदींच्या सभेमुळे काही अंशी वातावरणनिर्मितीही झाली आहे. मात्र, एवढय़ा बळावर राष्ट्रवादीचा मतदारसंघावर असलेला मोठा प्रभाव पुसून टाकणे जिकीरीचे काम आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा येवला व लगतचा निफाड हे दोन विधानसभा मतदारसंघ चव्हाण यांच्यासाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरणार आहेत. येवल्यात विकासाची संकल्पना दृश्य स्वरूपात अवतरल्याने सध्या या भागावर भुजबळ यांचा वरचष्मा सहज दिसून येतो. स्वत:च्या मतदारसंघात आपल्या पक्षाच्या उमेदवाराला किती आघाडी मिळते, त्यावर भुजबळांचीही प्रतिष्ठा ठरणार असल्याने ते चव्हाणांना नामोहरम करायचा कसोशिने प्रयत्न करतील.
निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी झिरवाळ यांना मिळावी, यासाठी सुरूवातीपासून घेतलेली उघड भूमिका पाहता, तेथेही चव्हाण यांना खेळपट्टी फारशी अनुकूल राहणार नाही. या दोन्ही तालुक्यांसह नांदगाव तालुक्यात शिवसेनेची ताकद लक्षणीय असली तरी सेनेची मंडळी किती मनापासून चव्हाण यांना साथ देतील त्याबाबत अनेकांच्या मनात साशंकता आहे. झिरवाळ स्वत: दिंडोरीचे असले तरी चव्हाण यांनीही दिंडोरीतून पूर्वी निवडणूक लढविली असल्याने त्यांचा येथे बऱ्यापैकी संपर्क आहे. अशावेळी या पट्टय़ात होणारी हानी चव्हाण सुरगाणा, पेठ, कळवण आणि नांदगाव येथून कितपत भरून काढतात, त्यावरच त्यांच्या विजयाचे गुणोत्तर अवलंबून असेल.