Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३१ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

सावधान-विश्रामातला असहकार!
भाऊसाहेब :
काय म्हन्ती निवडनुकीची खडाखडी भावराव ?
भाऊराव : जोरात सुरू आहे, आता एकेकाचे उमेदवारी अर्ज भरून झाल्यावर प्रचाराला खरा वेग येईल.
भाऊसाहेब : त्ये अर्ज-बिर्ज भरनं म्हंजे लै जोखमीचं काम. तवा पुडारी-अधिकारी समद्ये यकदम ‘सावधान’मदी असनार..
भावडय़ा : हो, सध्या सावधान-विश्रामचा खेळ रंगात आहे.
भाऊसाहेब : म्हंजे ?
भावडय़ा : निवडणुकीच्या डावपेचांसाठी नेतेमंडळी एकदम सावधान झाली असली तरी आदर्श आचारसंहितेमुळे बहुतेक अधिकारी मात्र विश्राम घेत आहेत..

 

भाऊराव : नाही तरी एरवी कधी ते कामं करतात ?
भावडय़ा : ते ही खरचं. पण, सध्या काहीही झालं किंवा काहीच झालं नाही तरी सांगायला कारण आहे ना, आचारसंहितेचं.
भाऊराव : पण, एकीकडे आदर्श आचारसंहितेचं अवडंबर माजवणारी ही मंडळीच या काळात जिल्हाधिकाऱ्यांविरोधात असहकार पुकारतात, त्याचं काय ?
भाऊसाहेब : आजच्या काळात बी महात्माजींचा असहकार या मंडळींनी टिकवून ठय़ेवलाय म्हनायचा..
भाऊराव : तो असहकार देशहितासाठी होता, हा स्वहितासाठी आहे.
भाऊसाहेब : आँ !
भावडय़ा : स्वहितासाठी नाही ; स्वाभिमानासाठी ! जिल्हाधिकारी असंसदीय भाषा वापरतात, शिव्यांची लाखोली वाहतात म्हणून असहकार पुकारावा लागल्याचं तमाम अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
भाऊराव : उपमर्द करणाऱ्याविरोधात घेतलेला हा मर्दानी पवित्रा टिकला नाही ना, पण फार काळ.
भावडय़ा : प्रशासकीय अधिकारी म्हटल्यावर काही मर्यादा येतात, शेवटी चौकट ही पाळावीच लागते.
भाऊसाहेब : पन, मग ती मोडायच्या फंदात का पडावं उगी ?
भावडय़ा : तसं नाही, मात्र अन्यायाविरोधात उभं रहायलाचं हवं.
भाऊराव : अरे, पण कामात कसूर केली, वेळच्या वेळी कामं झाली नाहीत, चुका झाल्या तर बोलणी बसणारच ना.
भावडय़ा : चुकीबद्दल बोलणं ठीक ; नियमानुसार मेमो द्यायलाही हरकत नाही, पण म्हणून कुणाला शिव्या का घालायच्या उगीच ? जिल्हाधिकारीपदासारखी महत्त्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्यांनी याचं भान राखायलाच हवं.
भाऊराव : जिल्हाधिकारी असं बोलत असतील तर ते अशोभनीयच आहे. पण ,या अधिकाऱ्यांनीही आत्मपरीक्षण करायला पाहिजे.
भाऊसाहेब : काय त्ये ?
भाऊराव : आपण वेळच्या वेळी कामं करतो का, कामाच्या पूर्ततेपेक्षा बदल्या, बढत्या यामध्ये आपला किती वेळ खर्ची पडतो, बदल्यांसाठी राजकीय मंडळींची शिफारस, प्रसंगी दबाव कसा आणला जातो, आपापल्या कंपूतल्या अधिकाऱ्यांचं आख्खं सर्कलच्या सर्कल एकाठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी कसं हलवलं जातं.. मग, आय.ए.एस. लॉबीही आपल्या केडरला सांभाळणारच ना. त्यामुळेच तर लगोलग असहकार गुमान गुंडाळून ठेवावा लागला इतर अधिकाऱ्यांना.
भावडय़ा : म्हणजे यांच्यातही ‘राजकारणातलं पॉलिटिक्स’ जोरात आहे की !
भाऊसाहेब : मग बरुबर हाये, ‘वान न्हाई पनं गुन लागनारच’..
पॉलिटिशन