Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३१ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘दुय्यम मुद्दय़ांना महत्त्व नको’
योग्य माणूस योग्य जागी बसत नाही हीच आपल्याकडे शोकांतिका आहे. राजकारणात तर हे प्रकर्षांने जाणवते. पण, यासंबंधीचा विचार निवडणूक पर्वात ज्या गांभीर्याने व्हावयास पाहीजे आहे तोच होत नसल्याचे दिसते. खरे तर प्रत्येकाने जसे हे माझे घर आहे, तसा हा माझा देश आहे, हा

 

विचार करण्यास प्रवृत्त व्हावयास पाहीजे. असा विचार जेव्हा प्रत्येकाला महत्वाचा वाटू लागेल, त्याचवेळी योग्य माणूस सत्तेवर जाऊन आपले कर्तव्य बजावण्याची प्रक्रिया सुरु होईल. आपण आपल्या घरातील प्रत्येक निर्णय घेताना जसे घराला कोणतेही नुकसान होणार नाही, याची काळजी घेतो तसेच या देशाचे भवितव्य राबवणारी माणसे अथवा नेते सत्तास्थानी बसतील तेव्हाच या भारतभूमीतून पुन्हा सुवर्णधूर निघू शकेल. पण याचा गांभिर्याने विचार करणारी प्रक्रियाच थांबलेली असताना देशाचे भवितव्य कसे बदलू शकेल, हाच खरा या निवडणुकीचा उद्देश यानिमित्ताने चर्चिला जावा असे वाटते. परंतु, आज निवडणूक म्हटली की चर्चा कशाची होते, तर कोणाला तिकीट मिळावे, कोणता पक्ष सत्तास्थानी यावा, कोणाची युती अथवा आघाडी सत्तास्थानी बसू शकेल, कोण पंतप्रधान होवू शकेल.. या आणि अशा मुद्दय़ांची. खरे तर हे मुद्दे दुय्यम आहेत.
आज ज्याला सत्तापदी जाण्याची ओढ लागली आहे. त्यामुळे देशसेवा म्हणजे एक बिझनेस झाला आहे आणि अनेकजण त्याकडे खऱ्या अर्थाने बिझनेस म्हणूनच बघतात. सत्तापदांना कमाईचे साधन आणि मानसन्मानाचे माध्यम मानले जाते. आपण देशाचे काही देणे लागतो ही भावनाच त्यामुळे संपुष्टात येण्याचा धोक आहे. या मिळणाऱ्या सत्तेतून मला, माझ्या पक्षाला माझ्या गोतावळ्याला काय काय मिळू शकते याचाच विचार करून आज बहुसंख्य सत्ताधीशांच्या मनात घोळत असतो. आपण सर्व मतदारही राजकारण म्हणत गप्प बसून सहन करत आल्याने सुरुवातीपासून राजकारणी मंडळी सामान्यांची जास्तीत जास्त निराशा करीत आली आहेत. तरी देखील कुठल्याही गोष्टीला अंत हा असतोच. हे लक्षात घेता येत्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण परिवर्तन करु शकू, असा आशावाद धरण्यास हरकत नाही.
या निमित्ताने १०० टक्के मतदान हा एक उत्तम मार्ग आहे. तो आपण सर्वजण अंमलात आणू शकू. यावेळी हा प्रत्येकाने स्वत:ला बंधनकारक समजून तो अंमलात आणला, तर बरीचशी चुकीची माणसे विनासायास यातून बाजूला जाऊ शकतील. मात्र पुढील निवडणुकीपुर्वी याचे कायद्यात रुपांतर होऊन मतदान करणे सक्तीचे करावे म्हणजे त्यापुढील निवडणुकीत योग्य व्यक्ती योग्य जागी निवडणे ही संकल्पना खऱ्या अर्थाने अंमलात येईल. अशा वातावरणात चांगली माणसे या क्षेत्रात येण्यास प्रवृत्त होतील की ज्यायोगे एखादी कंपनी जितक्या उत्कृष्ट पध्दतीने आपला कारभार करते, तसा हा देश उत्तम कार्यक्षमतेचा देश म्हणून नावारुपाला येईल.
आज प्रत्येक पक्षातील सत्तेत असलेले बहुतेक सत्ताधीश आणि प्रशासन सेवेतील अधिकारी ज्यांच्या सहीने या देशातील नागरिकांचे व्यवहार चालतात त्यांची कार्यपध्दती भ्रष्ट आहे. हे सर्व फक्त आपल्या कुटुंबाचा आणि आपल्या गोतावळ्याचाच विचार करुन देशाचा कारभार हाकत आहेत. या देशातील लोकसंख्या ११५ कोटी आहे. त्यातील ९९ टक्के सामान्य लोक प्रमाणिक असले तरी मुळात सत्तास्थानी असलेली मंडळी आणि प्रशासन सेवेतील महत्वपूर्ण व्यक्तींमधील ९९ टक्के लोक भ्रष्ट असल्याने सगळे गणित बिघडते. असे हे ९९ टक्के भ्रष्ट नेते आणि प्रशासकीय अधिकारी मंडळी एकमेकांशी संगनमत करून संपूर्ण देशावर हुकुमत चालवत आहेत. हा असमतोल या निवडणुकीच्या माध्यमाने बदलण्याचा योग या मतदारांना चालून आला आहे. त्याने तो गांभीर्याने मतदान करून राबवला तर, या देशात येणाऱ्या भविष्यात परिवर्तनाची लाट यावयास वेळ लागणार नाही..
सतीश निरंतर, नाशिक