Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३१ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

नाशिक-पुणे रस्त्याबाबत सारे काही उणे
प्रश्न जिव्हाळ्याचे, प्रतिनिधी / नाशिक

सुवर्ण चतुष्कोनातील शहरांचा वाहतुकीचा मार्ग प्रशस्त करण्याच्या उद्देशाने चौपदरीकरणाची योजना मांडली गेली असली तरी नाशिक-औरंगाबाद या राज्यमार्गाचा अपवाद वगळता नाशिक-पुणे महामार्गाचे विस्तारीकरण अद्याप नजरेच्या टप्प्यातही नाही तसाच नाशिक-सूरत महामार्ग देखील

 

अजून आराखडय़ाच्या पातळीवरसुद्धा येऊ शकलेला नाही.
नाशिकहून औरंगाबादला जाणाऱ्या सुमारे १९० किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे जवळपास निम्मे काम पूर्णत्वास गेले असताना नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा विषय सिन्नपर्यंतच्या प्रस्तावात अडकून पडला आहे. या मार्गावरील चंदनापुरी व अन्य छोटय़ा घाट रस्त्यांचा विस्तार करण्यासाठी आजवर सर्वेक्षण झालेले नाही. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील नाशिक-पुणे महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम रखडण्यास स्थानिक लोकप्रतिनिधींची अनास्था कारणीभूत ठरली आहे.
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वडपे-नाशिक-धुळे टप्प्यातील चौपदरीकरणाच्या कामाने चांगलाच वेग पकडला असला तरी तशी गतिमानता नाशिक-पुणे महामार्गास लाभू शकलेली नाही. देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गांचे चौपदरीकरण करण्याचे धोरण केंद्र सरकारने निश्चित केल्यानंतर हा विषय प्रामुख्याने पुढे आला होता. पुणे शहराशी नाशिककरांचा निकटचा संबंध आहे. दरवर्षी हजारो स्थानिक विद्यार्थी पुणे येथे शिक्षणासाठी जात असतात. या शिवाय, उद्योजक, व्यावसायिक, शेतकरी अशा सर्व घटकांचा मुंबई एवढाच पुण्याशीही संपर्क असतो. नाशिक-पुणे दरम्यान दररोज प्रवास करणाऱ्यांची १० हजारहून अधिक असणारी संख्या पुरेशी बोलकी आहे. सुमारे २१० किलोमीटरच्या प्रवासाकरिता लागणारा साडे पाच ते सहा तासांचा कालावधी सर्वाची डोकेदुखी ठरला आहे.
नाशिक-पुणे महामार्गाचे चौपदरीकरण प्रत्यक्षात आल्यास प्रवासाचा कालावधी किमान दीड तासाने कमी होऊ शकतो. तसेच पुण्याहून नाशिकमार्गे गुजरातला जाणाऱ्या प्रवाशांनाही याचा लाभ होणार आहे.
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाच्या तुलनेत नाशिक-पुणे महामार्गावरील वाहतुकीचे प्रमाण कमी आहे. परंतु, दोन्ही शहरांना जोडणाऱ्या मार्गावर वाहतुकीत दिवसेंदिवस वाढ होत असून पुण्याहून मुंबईला जाणारी अवजड वाहनांची वाहतूक याच मार्गाने वळविण्यात आली आहे. पुण्याहून नाशिक फाटा ते खेडपर्यंतच्या टप्प्याचे चौपदरीकरण पूर्ण झाले असले तरी नाशिकहून मात्र त्याचा श्रीगणेशा होवू शकलेला नाही. पहिल्या टप्प्यात नाशिक-सिन्नर या सुमारे २८ किलोमीटरच्या टप्प्याचे चौपदरीकरण केले जाणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवून बरीच वर्ष उलटली आहेत. प्रस्तावांतर्गत सिन्नरला बायपाय रस्ता उभारण्याचे प्रस्तावित आहे. पहिला टप्पा मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याने उर्वरित सिन्नर-संगमनेर व त्या पुढील टप्प्याचा विचार केला गेला नाही. या मार्गातील घाट रस्त्यांच्या रूंदीकरणाबाबत कोणताही अभ्यास अथवा सर्वेक्षण अद्याप झालेले नाही. एकूणात अशी स्थिती असलेल्या महामार्गाची चौपदरीकरणाची प्रक्रिया तातडीने सुरू होणे आवश्यक आहे.
नाशिक-पुणे महामार्गाच्या तुलनेत राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातून जाणाऱ्या नाशिक-औरंगाबाद रस्त्याचे चौपदरीकरण वेगात सुरू आहे. नाशिक ते येवला टप्प्यातील काम जवळपास पूर्ण झाले असून कोटमगाव ते औरंगाबाद टप्प्यातील काम बाकी आहे. मध्यंतरी हे काम बांधा, वापरा व हस्तांतरीत करा (बीओटी) या तत्वावर करण्याचा निर्णय झाला होता. त्यासाठी कामाच्या निविदाही काढण्यात आल्या. पण, ठेकेदारांनी या कामात फारशी उत्सुकता दाखविली नाही. वाहतुकीची कमी झालेली वारंवारिता त्याचे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जाते. औरंगाबादहून मुंबईला जाणाऱ्या वाहनधारकांनी गंगापूरहून कोपरगाव आणि तेथून सिन्नरमार्गे घोटीला जाण्यास प्राथमिकता दिल्याने वाहतूक बरिचशी कमी झाली आहे. औरंगाबादहून केवळ नाशिकला येवू इच्छिणाऱ्या वाहनधारकांकडून या मार्गाचा वापर केला जातो. बीओटी तत्वावर हे काम होणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राज्य शासनाने स्वत याकरिता निधी पुरविण्याचे धोरण ठेवले आहे. त्यानुसार नाशिक-औरंगाबाद रस्त्याचे काम सुरू आहे.