Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३१ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘व्होटर्स हेल्पलाइन’चा असाही अनुभव
प्रतिनिधी / नाशिक

मतदारांना आपले नांव मतदारयादीत आहे की नाही, यादी भाग क्रमांक कोणता, मतदान केंद्र कोणते याबाबत सविस्तर माहिती मिळावी या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयाने मोठा गाजावाजा करून सुरू केलेली वोटर्स हेल्पलाइन वास्तवात गैरसोयीचीच अधिक ठरत असल्याचा अनुभव पहिल्याच दिवशी नाशिककरांना घ्यावा लागला. अपूर्ण माहिती, अत्यल्प मनुष्यबळ, संवाद कौशल्याचा पूर्णत: अभाव असलेले कर्मचारी या सगळ्यामुळे संबंधित क्रमांकांवर वारंवार दूरध्वनी

 

करूनही बहुसंख्य चौकस मतदारांच्या पदरी निराशाच पडत होती.
मतदारांना प्रस्तुत माहिती घरबसल्या मिळावी या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयाने खास हेल्पलाईन तयार केली. त्यासाठी २३१७१५१ ते ५८ असे क्रमांकही देण्यात आले. परंतु, सोमवारी या क्रमांकांवर संपर्क साधला असता नाव नोंदवून घेऊन पुन्हा काही वेळाने दूरध्वनी करायला सांगितले जात होते. त्यानुसार काही वेळाने दूरध्वनी केला असता अगोदरचा कर्मचारी जागेवर नसल्याने पुन्हा एकदा नांव आणि वय टिपून घेऊन अध्र्या तासाने दूरध्वनी करण्याची सूचना केली जात होती. प्रस्तुत प्रतिनिधीला सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळात तब्बल पाच वेळा हाच अनुभव घ्यावा लागला. सायंकाळी संबंधित दूरध्वनीवर असणाऱ्या कर्मचाऱ्याने पुन्हा तीच माहिती विचारल्यावर त्याला सगळा घटनाक्रम कथन केला असता, येथे दोनच कर्मचारी आहेत, फोन लाईन्स सारख्या सुरू आहेत, मग काय करणार, असे उत्तर मिळाले. अधिक चौकशी केली असता वास्तवात अद्याप संपूर्ण ‘डाटा अपलोडच’ झाला नसल्याचे सांगण्यात आले. थोडेसे काम बाकी असून त्यानंतरच सुसज्ज यंत्रणा कार्यरत होईल, असे स्पष्टीकरण प्रशासनातर्फे करण्यात आले असले तरी मग तत्पूर्वीच एवढय़ा घाईने हेल्पलाईन का सुरू करण्यात आली याचे उत्तर मात्र संबंधितांकडे नव्हते.