Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३१ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

भावनांची तेढ आणि हरवलेले बाल्य
मुलांचे भावविश्व

आपल्या मुलांच्या वर्तनाविषयी पालक हल्ली अधिक जागरूक होत आहेत. पण, गतिमान जीवनशैलीमुळे अनेकदा इच्छा असूनही त्यांना मुलांशी मोकळेपणाने संवाद साधता येत नाही.

 

त्यामुळे मुलांबाबत केवळ जागरूक राहण्यापेक्षा त्यांचे मित्र बनून मुलांना ‘सकारात्मक’ बनविण्याची खरी गरज आहे. त्या अनुषंगाने, बालरोगतज्ज्ञ व बाल आहारतज्ज्ञ या नात्याने गेली अनेक वर्षे मुले आणि त्यांचे पालक यांच्या सततच्या संपर्कात असणाऱ्या डॉ. शामा कुलकर्णी ‘नाशिक वृत्तान्त’ च्या माध्यमातून दर मंगळवारी मुलांच्या भावविश्वासाचा वेध प्रस्तुत मालिकेतून घेत आहेत..
‘क्ष’ खूपच अस्वस्थ होती. शून्यात पहात होती. छोटीशी पाचवीमधील मुलगी. तिच्या शाळेतून तिचे वर्गात लक्ष नसते अशी तक्रार आली होती. तिचा आय.क्यू. काढला तर १३० म्हणेज उत्तमच आला होता. मग तिची अभ्यासात घसरण का ? तिच्या आईवडिलांना ती मंद वाटत होती, तसे तर मुळीच नव्हते. तिच्या काऊन्सेलिंगमध्ये उलगडलेले कोडे निराळेच होते. तिचे बाबा खूपच संतापी स्वभावाचे. स्वयंपाकाची थोडी चव बिघडली की ताटच भिरकावून द्यायचे, डबा भरायला थोडा वेळ झाला तर गाडीला किक मारताना डबा फेकून देत, तिला हाक मारली जाई तीच मुळी दचकवणाऱ्या सुरात. कधी कधी फेकलेल्या वस्तू आईला लागत असत. वडील आईला रात्री मारतील या भीतीने रात्री ती झोपतच नसे. दोघांच्या मध्ये रडत बसून राही. मग झोप न झालेली सुजून लाल झालेल्या डोळ्यांची ती निरागस बालिका वर्गात पेंगत असे. मधेच तिची तंद्री लागे. मध्येच ती दचकून इकडे तिकडे पाही. दिवसाढवळ्या आई-वडिलांचा घटस्फोट झाल्याचे स्वप्न ती पहात राही. तिचे भवितव्य म्हणजे जणू एक काळाकुट्ट घनदाट अंध:कार होता ! मुलींना परिकथेतील राजकुमाराची स्वप्ने पडतात. परंतु पतीपत्नीचे नाते एवढे भयंकर असल्याचे पाहून तिला आपल्या आयुष्यात कधीकाळी काही चांगले घडू शकते, याबद्दल विश्वासच वाटेनासा झाला होता.
त्याचप्रमाणे क्ष हा मुलगा आई-बाबा आणि आजी-आई यांच्या भांडणातून त्रस्त झालेला. त्याला सतत भीतीने, नैराश्याने ग्रासले होते. वडिलांनी त्याला ८० टक्के मिळाल्यावर गाडी देण्याचे कबूल केले होते. त्याने ९० टक्के मिळवले. त्याला घरी आल्यावर पालकांनी प्रेमाने जवळ घेणे अपेक्षित होते. पण घडले दुसरेच ! त्याचे स्वागत असे झाले..
बाबा - या.. घ्या. बाईसाहेब, तुमचे दिवटे आले. बसवा डोक्यावर त्यांना.
आई- अहो, पण घ्या ना गाडी..
बाबा - कशाला ? पोरी फिरवायला ?
आई - ते. ही खरंच. हल्लीची पोरंच मुळी अशी !
दोन अश्रू खळकन् त्याच्या गालांवर टपकले. त्याचे मन भरकटले. तो ताडकन खोलीत जावून झोपला.
दुसऱ्या दिवशीही तेच,मग हळूहळू त्याला वाईट मुलांनी जाळ्यात ओढले. एक निरागस मासा गळाला लागला.
आज तो मुलगा पूर्ववत सुधारण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच्या आयुष्यातील हरवलेले बालपण शोधतो आहे. त्याला त्याच्या बाबांनी ऱ्हदयाशी घेवून ‘माझं बाळ ते’ म्हणावे एवढीच त्याची आस आहे. पण आई-बाबा त्याच्यावर पूर्ण वाईटपणाचा शिक्का मारून त्याच्याकडे पाठ फिरवून बसलेत. कधी कळेल त्यांना हे ?
त्या मुलाच्या भावनांचे चढउतार पाहून जीवलगा.. राहिले रे दूर घर माझे.. या गाण्याचा एक नवीनच भावार्थ असल्याचा साक्षात्कार होतो. या मुलाचे बाल्य न परतीच्या वाटेवर मैलोगणती दूर राहिले आहे. त्याला त्याचे जिव्हाळ्याचे मायबाप जवळ घेण्यास तयार नाहीत. त्याच्या मनावर त्याच्या घसरलेल्या पावलांचेच ओझे पडले आणि तो आपल्या आईबाबांनाच साद घातलो आहे. पाऊल थकले.. माथ्यावरती जड झाले ओझे ? आईबाबांनो कृपया क्षमाशील व्हा- तुमच्या मते घोडा झालेल्या, वाढलेल्या बछडय़ाच्या निरागस मनावर तुमची फुंकरच गारवा आणेल.
डॉ. शामा जगदीश कुलकर्णी, संपर्क - ०२५३-२३२२००१, ९८२३०५८५२७