Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३१ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

रावेरमध्ये सर्वाना उत्सुकता राष्ट्रवादीच्या उमेदवाराची
घडामोडी
जळगाव / वार्ताहर

रावेर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटय़ाला गेल्यानंतर एकिकडे काँग्रेसमधील असंतोष कमालीचा वाढला असताना राष्ट्रवादीत इच्छुकांची अनेक नावे चर्चेत येऊ लागले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील वाद थांबण्याचे चिन्ह दिसत नसताना भाजपचे उमेदवार हरिभाऊ

 

जावळे यांच्यासाठी युतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी बैठका घेणे सुरू केले आहे.
रावेर आपल्याच ताब्यात राहील, या अपेक्षेने काँग्रेसकडून आधीच व्यूहरचना व मोर्चे बांधणीस सुरूवात झाली होती. परंतु राज्य पातळीवरील जागा वाटपाच्या चर्चेत अखेरच्या फेरीत राष्ट्रवादीने बाजी मारली व रावेरवर हक्क सांगितला. राष्ट्रवादीकडून इच्छुक म्हणून भुसावळचे आ. संतोष चौधरी व रवींद्र पाटील यांच्या नावाची प्रामुख्याने चर्चा आहे. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष असलेले पाटील हे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगर मतदार संघात भाजपचे एकनाथ खडसे यांच्याकडून त्यांना अवघ्या १८०० मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. हक्काचा मतदार संघ हातचा गेल्याने काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण होणे स्वाभाविकच, परंतु वर्षांपासून उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी करून जनसंपर्क व प्रचार सुरू केलेल्या इच्छुकांच्या संतापाचा कडेलोट झाला. काँग्रेसच्या काही इच्छुकांनी तर अजूनही आशा सोडलेली नसून मतदारसंघ काँग्रेसच्या वाटय़ाला येईल व आपणास उमेदवारीची संधी मिळेल, या आशेवरील काही जण दिल्ली सोडण्यास तयार नाहीत. जळगाव मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार अ‍ॅड. वसंत मोरे, पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष गुलाबराव देवकर, जळगाव महानगर अध्यक्ष बंडु काळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी आम्ही रावेरची मागणी केली नव्हती, परंतु आता मिळालाच आहे तर सर्वशक्तीनिशी लढु, अशी भूमिका घेतल्याने काँग्रेस इच्छुकांच्या संतापात अधिकच भर पडली आहे. दरम्यान युतीचे उमेदवार हरिभाऊ जावळे हे मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असून एकनाथ खडसे यांनी जावळे यांच्या प्रचाराची सर्व धुरा सांभाळली आहे. भारिप-बहुजन महासंघाने हाजी इस्माईल हसन तेली यांची उमेदवारी जाहीर केली आहे. क्रांती सेनेतर्फे छावाचे भीमराव मराठे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यांचा प्रचारही ठिकठिकाणी सुरू झाला आहे. आता सर्वाच्या नजरा राष्ट्रवादीकडून कोणाला उमेदवारी दिली जाते, यावर लागून असून राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर झाल्यावर काँग्रेसचा विरोध मावळण्यास सुरूवात होईल, अशी चर्चा आहे.