Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३१ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

दिंडोरीत सर्वच पक्षांच्या प्रचारास वेग
नाशिक / प्रतिनिधी

उमेदवारी जाहीर होण्याआधीच सर्वप्रथम नरेंद्र मोदी यांच्या सभेव्दारे प्रचाराची सुरूवात करणारे युतीचे उमेदवार हरिश्चंद्र चव्हाण हे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करणारे पहिले उमेदवार ठरले असून आघाडीचे नरहरी झिरवाळ तसेच माकपचे जीवा पांडु गावित यांच्याही प्रचाराने वेग घेतल्याने शहरी भागासह ग्रामीण भागातही निवडणुकीचे वातावरण तयार होण्यास सुरूवात झाली आहे. झिरवाळ हे एक एप्रिल रोजी तर गावित मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल

 

करणार आहेत.
आघाडीचे उमेदवार झिरवाळ यांच्यासाठी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मनमाड, येवल्यासह अनेक ठिकाणी बैठका घेत काँग्रेस व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये मनोमीलनासाठी पुढाकार घेतला आहे. भुजबळ यांच्यासमवेत काँग्रेसच्या आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव तसेच इतरही अनेक नेत्यांनी बैठकांमध्ये सहभागी होत झिरवाळ यांच्या विजयासाठी राष्ट्रवादीच्या बरोबरीने काम करण्याचे आवाहन करण्यात आले. भुजबळ यांच्या सहभागामुळे झिरवाळ यांच्या प्रचाराने वेग घेतला असून उशिरा उमेदवारी जाहीर झाली असली तरी संपूर्ण मतदारसंघात पोहोचण्यासाठी प्रचाराचे योग्य नियोजन करण्यात आघाडीचे नेते गुंग आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीची उमेदवारी न मिळाल्यामुळे प्रारंभी काहीसे नाराज झालेले कळवणचे आ. ए. टी. पवार यांनी आता शांततेची भूमिका घेतल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम कायम आहे. पवार हे झिरवाळ यांच्या प्रचारात फारसे सक्रिय नसल्याचे चित्र दिसत असून काँग्रेस पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्याचे काम राष्ट्रवादीला करावे लागत आहे. गावागावांमध्ये बैठका, ज्येष्ठांचे मार्गदर्शन यावर राष्ट्रवादीतर्फे भर देण्यात येत असून रिपाइं कार्यकर्त्यांचीही साथ त्यांना मिळत आहे. मागील आठवडय़ात नाशिक येथे आयोजित जनता दलाच्या बैठकीत दिंडोरी मतदारसंघात उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु मुंबई येथे झालेल्या बैठकीत तिसऱ्या आघाडीतंर्गत ही जागा माकपला सोडण्यात आल्याने जनता दलानेही गावित यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तिसऱ्या आघाडीतील वाद मिटल्यामुळे व जनता दलाच्या पाठिंब्यामुळे गावित यांच्या प्रचारास अधिक बळ प्राप्त झाले आहे. नाशिकमधील सातपूर, अंबड, सिडको या परिसरात माकपचा दबदबा असल्याने या भागातील अनेक कार्यकर्ते गावित यांच्या प्रचारासाठी दिंडोरी मतदारसंघात रवाना झाले आहेत. हीच बाब युतीचे चव्हाण यांच्या बाबतीत म्हणता येईल. नाशिकमधील भाजपचे अनेक पदाधिकारी चव्हाण यांच्या प्रचारात गुंतले आहेत.