Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३१ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने एकाची सिनेस्टाईल लूट
नांदगाव / वार्ताहर

तालुक्यातील कासारी घाटात रविवारी रात्री घडलेल्या कार लुटीच्या घटनेने वेगळेच वळण घेतले असून सदर लूट पूर्वनियोजित होती असे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी सहा जणांना पोलिसांनी अटक केली असून १० ते १५ जण फरार आहेत. यात पायल नावाची मुलगी असल्याचे समजते. मारहाण करून चोरटे ज्या इंडिका कारमधून पळाले ती पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतली असून या कारचा मालक मूळ साकोरे गावचा राहणारा असल्याने पोलिसी संशयाची सुई साकोरे परिसारकडे

 

वळली आहे.
सोन्याच्या आमीषाला बळी पडून कमी भावाने सोन्याचा हंडा मिळविण्याची लालसा नाशिकच्या राजेंद्र सोनार यांना महाग पडली. या घटनेत त्यांचे सुमारे दीड लाख रुपये गेले व पायाला इजाही झाली. नांदगाव पोलिसांची तत्परता एवढी की घटनेनंतर एक तासातच चार संशयित ताब्यात आले. या प्रकारामागे संघटित गुन्हेगार व गुन्ह्य़ांची साखळी असल्याचा पोलिसांचा संशय असून लवकरच ती उजेडात येईल असा विश्वास मनमाडचे पोलीस उपअधीक्षक विश्व पानसरे यांनी व्यक्त केला.
या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे पंडित घुसळे, निलेश भातडे, राजेश घोडे, नंदू कांबळे, पांडूरंग गुढे, तात्याराव घुसळे हे सर्व नाशिकचे आहेत. साकोरे गावातल्या काही जणांना संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एखाद्या चित्रपटातली कथा वाटावी असे नियोजन सदर घटनेमागे असल्याचे आता उजेडात येत आहे. पोलीस निरीक्षक प्रकाश मेढे यांनी दिलेल्या माहितीनुसार घुसळे या पितापुत्रांनी प्लॅन केला. त्यानुसार त्यांनी नंदू कांबळे यास गिऱ्हाईक शोधण्यास सांगितले.
कांबळेने पांडूरंग गुढेशी संपर्क साधला. त्याने राजेश घोडे या मित्राशी संपर्क साधून निरोप दिला. घोडे याचा मित्र राजेंद्र सोनार आहे. तो महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र कंपनीत गुणवत्ता निरीक्षक पदावर काम करतो. प्लॅननुसार सोनार यास आधी सोन्याचा तुकडा दाखविण्यात आला. हंडा सापडला आहे, ही गुप्त बात आहे. त्यामुळे सोने कमी भावाने मिळेल, असे आमीष दाखवले गेले, त्याला सोनार बळी पडले. त्यानंतर हे हंडाभर सोने घेण्यासाठी घोडे यांच्या मोटारीतून पैसे घेऊन सोनार निघाले. त्यांच्यासह कांबळे, गुढे एक मुलगा व पायल असे सहा जण होते. नांदगावकडे निघाले असता ठरल्यानुसार गाडी सायंकाळी संकेतस्थळी कासारी घाटात पोहोचली. त्या ठिकाणी आडवाटेला इंडिका गाडीमध्ये काही अज्ञात व्यक्ती दबा धरून बसल्या होत्या. तेथे लघुशंकेच्या निमित्ताने ही गाडी थांबली. खुणवाखुणवी झाली, सात-आठ जणांच्या टोळक्याने हल्लाबोल केला. घोडे याला थोडी मारहाण करून सोनार यास जबरदस्त मारहाण करीत त्याच्याकडची रोख रक्कम व सोन्याची साखळी अंगठी लुटण्यात आले. त्यानंतर इंडिकातून पायल व एक युवक फरार झाले.
घटना घडतेवेळी जातेगावचे स्थानिक वार्ताहर हिंगमिरे दुचाकीवरून जात होते. त्यांनी हा प्रकार दुरून बघितला आणि वर पळून येणाऱ्या जखमी सोनारांना गाडीवर बसून कुसुमकेला गावाकडे नेले. आपल्या भ्रमणध्वनीवरून त्यांनी ही घटना तातडीने नांदगाव पोलीस ठाण्यात कळवली. पोलीस निरीक्षक मेढे यांचे सहकारी उपनिरीक्षक डी. के. परदेशी, सहायक निरीक्षक गायकवाड, किशोर अहिरराव, के. पी. जगताप, अरूण पगारे, एम. एम. बाचकर, पी. आर. डगळे, आव्हाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. कासारीजवळ त्यांना कांबळे व गुढे सापडले. पुढे चोरटय़ांच्या इंडिकाचा पाठलाग करत ते शिऊरला पोहोचले. त्याठिकाणी चोरटय़ांच्या गाडीचे टायर पंक्चर झाले होते, पण अंधाराचा फायदा घेत ते पळून जाण्यात यशस्वी झाले.