Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३१ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

पंचवटी वाचनालयाच्या व्याख्यानमालेत हास्य काव्य संमेलनाची गुंफण
नाशिक / प्रतिनिधी

अध्यात्माच्या आधारे वैज्ञानिक प्रयोग झाले तरच अध्यात्माचे महत्व वाढेल, असे प्रतिपादन डॉ. प. वि. वर्तक यांनी येथील पंचवटी सार्वजनिक वाचनालयाच्या वर्धापनदिनामित्त आयोजित व्याख्यानमालेत केले. ‘परग्रहावरील भ्रमण’ या विषयावर बोलतांना वर्तक यांनी पौराणिक

 

काळातील दाखले देत आपली भूमिका मांडली.
माजी खासदार अ‍ॅड. उत्तम ढिकले हे अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर के. के. मुखेडकर, कोषाध्यक्ष प्रा. डॉ. शांताराम रायते, प्रमुख कार्यवाह नथुजी देवरे उपस्थित होते. व्याख्यानमालेचे चौथे पुष्प हास्य काव्य संमेलनाने गुंफण्यात आले. संमेलनात एकनाथ वाघ, शीला डोंगरे, भरतसिंग ठाकूर, जयश्री साठे, विजय वऱ्हाडे, दातरंगे सहभागी झाले होते. दातरंगे यांनी भारताची अर्थव्यवस्था, आर्थिक मंदीने केलेला कहर याविषयी मार्मिक भाष्य करीत होळी विषयावर कविता सादर केली.
पती म्हणाला बायकोला,
आज आहे होळी, कर आता पुरणाची पोळी
धान्यात नाही कणगी, जगात सुरू मंदी
नाही लाकडाची मोळी, बजेटने केली होळी
हातात घे झोळी, माग पुरणपोळी
करू साजरी अशी होळी
या कवितेला रसिकांची उत्स्फुर्त दाद मिळाली. यावेळी उपस्थितांचे स्वागत हिरालाल परदेशी यांनी केले. यावेळी वाचनालयातून वर्षभरात अधिकाधिक ग्रंथ वाचणाऱ्या वाचकांचा आदर्श ग्रंथ वाचक म्हणून सन्मानपत्र, ग्रंथ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
वाचनालयाचे ग्रंथपाल रामदास शिंदे यांना अखिल महाराष्ट्र पत्रकार व पत्रलेखक संघाची राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रंथपाल रामदास शिंदे यांच्यासह ग्रंथपाल योगिता भामरे प्रयत्नशील होते.