Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३१ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

धुळ्यात पटेल समर्थकांचा बैठकांवर भर
धुळे / वार्ताहर

असंतुष्ट आ. रोहिदास पाटील समर्थकांनी पुतळा दहन, रास्ता रोको, नेत्यांविरुद्ध घोषणाबाजी या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर धुळे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आ. अमरिश पटेल समर्थकांनीही प्रत्युत्तर देण्यासाठी कंबर कसली असून त्यासाठी बैठकांचे

 

नियोजन करण्यात येत आहे.
शिंदखेडा येथील बिजासनी मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीस आ. राजवर्धन कदमबांडे, उमेदवार अमरिश पटेल, काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, ज्ञानेश्वर भामरे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. डॉ. हेमंत देशमुख यांनी काँग्रेसने अनेकांना केवळ खूप काही दिले, त्यामुळे पक्षाला बदनाम करणाऱ्यांना अर्थ उरत नाही, असा टोला अप्रत्यक्षरित्या रोहिदास पाटील यांना हाणला. आ. द. वा. पाटील यांनीही पटेल यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले. काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी पक्षापेक्षा कोणीही मोठा असू शकत नाही, असे स्पष्ट करीत पक्षनेत्यांनी पक्षाच्या प्रतिमेची जाळपोळ करणे किती योग्य आहे, याचा विचार करायला हवा, असे सांगितले. पटेल यांनी पक्षाने टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली. पाटील समर्थकांच्या असंतोषाच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने प्रचाराचा धडाका उडवून देण्याचे नियोजन केले असून मंगळवारी धुळे येथील व्यंकटेश लॉन्स येथे सकाळी दहाला बैठक घेण्यात येणा आहे. धुळे शहरातील काँग्रेस, राष्ट्रवादी व मित्र पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे चंद्रकांत केले, रिपाइंचे केंद्रीय सचिव एम. जी. धिवरे, युवराज करनकाळ, संजय पगारे यांनी केले आहे.
दुसरीकडे लोकसंग्राम पक्षाचे उमेदवार अनिल गोटे यांनी काँग्रेस व भाजपने मतदारसंघाबाहेरील उसने उमेदवार दिल्याचा आरोप केला आहे. १६ लाख मतदारांमधून या दोन्ही पक्षांना लोकसभेत प्रतिनिधीत्व करू शकेल असा एकही लायक उमेदवार मिळू नये, असा उपरोधिक टोला गोटे यांनी लगावला आहे. विकासात्मक दृष्टीकोन असलेले आपण एकमेव उमेदवार आहोत, असा दावा करून आपण शेती, पिण्याचे पाणी आणि विकास या आधारावर निवडणूक लढवित आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. भाजप-सेना युतीचे उमेदवार प्रतापदादा सोनवणे यांच्या प्रचारार्थ विनोद तावडे यांनी शहरातील मान्यवरांच्या गाठीभेटी घेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. युतीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे प्रचार केल्यास काँग्रेसमधील दुहीचा लाभ सोनवणे यांना मिळू शकेल, असे तावडे यांनी म्हटले आहे.