Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३१ मार्च २००९

करोडोंच्या ठेवी अडकूनही पतसंस्थांचा विषय दुर्लक्षित
प्रश्न जिव्हाळ्याचे
वार्ताहर / जळगाव

जिल्हातील नागरी सहकारी पतसंस्थांची अवस्था बिकट झाली असून बोटावर मोजता येतील एवढय़ा संस्थांचा अपवाद वगळता जवळपास सर्वच बंद स्थितीत आहेत. मनमानी कारभार, तारण न घेता कोटय़वधीचे कर्जवाटप केलेल्या संचालकांच्या कार्यशैलीचा फटका सर्वसामान्य गुंतवणूकदारांना सोसावा लागत आहे. सर्वच पतसंस्थांमध्ये अपहार किंवा गैरव्यवहार झालेला नसला तरी ज्या ज्या संस्थांमध्ये असे प्रकार घडले त्याची झळ संसर्गजन्य रोगाप्रमाणे सर्वच संस्थांना सहन करावी लागली. त्यामध्ये अनेक चांगल्या संस्थाही भरडल्या गेल्या. परिणामी, जिल्हयातील सहकारी पतसंस्थांची व्यवस्था मोडकळीस आल्याचे दिसत असून हजारो ठेवीदारांच्या जीवनात अंधार दाटलेला दिसून येतो. असे असताना राजकीय पटलावर मात्र हा प्रश्न बऱ्याच अंशी दुर्लक्षित राहिल्याचे पहावयास मिळते.

पैगंबरांच्या जीवनावर चर्चासत्राद्वारे प्रकाशझोत
वार्ताहर / धुळे

संपूर्ण विश्वासाठी कृपानिधी असलेल्या प्रेषित मुहम्मद पैगंबरांचे आदर्श जीवनचरित्र विशिष्ट समाजाच्या हितासाठी मर्यादित नसून संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी आहे, असे प्रतिपादन ‘दअवतुल कुराण’ या पुस्तकाचे मराठी अनुवादक मुहमंद शफी अन्सारी यांनी केले आहे. कुठल्याही प्रकारचा भेदभाव न पाळता मानवाला मानव म्हणून जगण्याचा समान अधिकार प्रदान करणारा आणि जगाला दया, क्षमा व शांतीचा उच्च संदेश देणारा असल्याचे विचारही त्यांनी मांडले.
येथील गरूडबागेतील काकासाहेब बर्वे स्मृति सभागृहात सर्वधर्म संघातर्फे ‘मानवी कल्याणाचे मार्गदर्शक प्रेषित मुहम्मद पैगंबर’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते.

व्यक्तिमत्त्व विकास झ्र् २५
मालिक समुपदेशन करणारी पुस्तके

‘विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, तर ते प्रत्येक गोष्ट वेगळ्या प्रकारे करतात.’ विक्रीचे उच्चांक मोडणाऱ्या ‘यू कॅन विन’ या पुस्तकाचे लेखक ‘शिव खेरा’ यांचे हे सुप्रसिद्ध वाक्य. या वाक्याचं तर त्यांनी ट्रेडमार्क मिळवले आहे. सध्याच्या स्पर्धात्मक युगात युवापिढीला पावलोपावली झगडावे लागत आहे. तडजोड करावी लागत आहे. अशा वेळी अपेक्षित ध्येयप्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतात. जिद्द, चिकाटी, संयम, आत्मविश्वास, प्रबळ इच्छाशक्ती, सकारात्मक दृष्टिकोन, योग्य नियोजन आदी गुणांची नितांत गरज असते.

चर्चासत्रात आपत्ती व्यवस्थापनाविषयी मंथन
जळगाव / वार्ताहर

सर्व स्तरावर आपत्ती व्यवस्थापन होणे आवश्यक असून आपत्ती काळात परिस्थिती अधिक गंभीर होऊ नये, कमीतकमी हानी व्हावी, यासाठी आर्थिक, मानसिक, शारीरिक, सामाजिक तयारी याविषयी वैचारिक मंथन होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्राचार्या डॉ. मंगला जंगले यांनी केले.
अरूणोदय ज्ञान प्रसारक मंडळ संचलित एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाशी संलग्न येथील कला, वाणिज्य व गृहविज्ञान महिला महाविद्यालयात ‘आपत्ती’ व्यवस्थापनातील नवप्रवाह या विषयावर राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जंगले बोलत होत्या. परिषदेचे अध्यक्ष तथा अरूणोदय ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. ए. पी. चौधरी यांनी बुद्धीवंतांचे निर्बुद्धीकरण दूर करणे हा आपत्ती व्यवस्थापनातील एक महत्वाचा भाग असल्याचे सांगितले. मानव निर्मित आपत्ती अधिक गंभीर असते. आपत्तींनासुद्धा माणूसच काही प्रमाणात जबाबदार असतो असे ते म्हणाले.
आपत्ती म्हणजे अचानक घडणारी दुर्घटना असल्याचे सांगून मानव आणि निसर्ग निर्मित आपत्ती टाळणे तसेच भूकंपासारख्या आपत्तीबाबत प्रा. आर. आर. भालसिंग यांनी मार्गदर्शन केले. आपत्ती व्यवस्थापनातील नवे वैद्यकीय प्रवाह या विषयावर डॉ. तृप्ती बढे यांनी मार्गदर्शन केले. विविध प्रकारच्या लहान-मोठय़ा आजारांवरील आपत्तीसाठी वैद्यकीय उपाय व प्राथमिक उपचारांची माहितीही त्यांनी दिली. भौगोलिक माहिती प्रणाली या विषयावर प्रा. एस. एन. भारंभे यांनी मार्गदर्शन केले. तर प्रा. डॉ. मंदाकिनी पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन विषयावर स्वरचित भारूड सादर केले.

जळगाव जिल्ह्य़ासाठी सहा निवडणूक निरीक्षक
जळगाव / वार्ताहर

जिल्ह्य़ातील जळगाव आणि रावेर या दोन लोकसभा मतदार संघांसाठी निवडणूक आयोगाकडून सहा निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून हे निरीक्षक चार एप्रिल रोजी जिल्ह्य़ात दाखल होतील, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुणाल कुमार यांनी दिली.
जळगाव लोकसभा मतदार संघातील जळगाव शहर आणि जळगाव ग्रामीणसाठी टी. विजयकुमार (आंध्र प्रदेश), चाळीसगाव व पाचोरा यासाठी कर्नाटकचे ए. एस. श्रीकांत, अमळनेर व एरंडोलसाठी आंध्रचे एस. रवी तर रावेर मतदार संघातील भुसावळ व जामनेरसाठी राजस्थानचे सूरजमल मीना, रावेर आणि चोपडासाठी बिहारचे शिशीर सिन्हा, मुक्ताईनगर व मलकापूरसाठी झालखंडचे बद्रीनारायण दास यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्य़ात चार मोबाईल व्हॅनव्दारे मतदारांना मतदार यंत्रांचीही माहिती देण्यात येत आहे किंवा नाही, याची माहिती नेमण्यात आलेले क्षेत्रिय अधिकारी घेणार असल्याचेही कुमार यांनी सांगितले. मीडिया कक्ष प्रमुख महापालिका आयुक्त रामनाथ सोनवणे, अपर पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.