Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३१ मार्च २००९
भावताल
(सविस्तर वृत्त)

‘अर्थ अवर’चा अर्थ!

 

पर्यावरणाच्या रक्षणासाठी गेल्या शनिवारी (२८ मार्च) जगभरातील काही शहरांनी एका तासासाठी वीज बंद ठेवली. ऑस्ट्रेलियातील सिडनीपासून अमेरिकेतील लॉस एंजेलिसपर्यंत आणि युरोपात लंडन-रोमपासून आशिया खंडात हाँगकाँग-सिंगापूपर्यंत काही जागरूक नागरिकांनी याच कारणासाठी वीज बंद ठेवली. विजेवर चालणारी जास्तीत जास्त उपकरणेसुद्धा या वेळात बंद ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. भारतातही दिल्ली, मुंबईसारख्या शहरांमधील काहीजण त्यात सहभागी झाले. ‘अॅन अर्थ अवर’ या नावाने पर्यावरणासाठी साजरा केला जाणारा हा एक तास! अशाप्रकारे अर्थ आवर साजरा करण्याचे हे तिसरे वर्ष. विश्व वन्यजीव निधी (डब्ल्यूडब्ल्यूएफ) या पर्यावरणप्रेमी संस्थेच्या सिडनी शाखेने २००७ साली या उपक्रमाला सुरुवात केली आणि आता जगभर त्याचे लोण पसरले. सिडनीमध्ये ३१ मार्च २००७ रोजी रात्री साडेआठ ते साडेनऊ या काळात पहिल्यांदा असा अर्थ अवर साजरा झाला. त्यात सुमारे २२ लाख लोक आणि २१०० व्यवसाय सहभागी झाले. या एका तासात इतक्या मोठय़ा संख्येने उद्योग, व्यवसाय व घरगुती विजेची उपकरणे बंद राहिल्याने मोठय़ा प्रमाणात वीजबचत झाली. अशी बचत करून पर्यावरणीय ऱ्हास, विशेषत: जागतिक तापमानवाढीची गती काही प्रमाणात रोखण्याचे उद्दिष्ट घेण्यात आले आहे. वातावरणात सोडले जाणारे कार्बन वायू ही जगातील मोठी समस्या बनली आहे. हेच वायू जागतिक तापमानवाढ घडवून आणण्यास हातभार लावत आहेत. वीजनिर्मितीसाठी तब्बल ४० टक्के कार्बन वायू वातावरणात सोडले जातात. त्यामुळे काही काळ वीज बंद ठेवून जागतिक तापमानवाढीचा वेग कमी करण्याचा हा एक प्रयत्न!
भारतातील काहीजण त्यात सहभागी व्हावेत हीसुद्धा सकारात्मक बाब म्हणायला हवी. पण असे असले तरी या निमित्ताने अनेक मुद्दे उपस्थित होतात. मुळात असा उपक्रम आपल्या देशात साजरा करण्याने विशेष फरक पडणार नाही. आपल्याकडे विजेची टंचाई असल्याने वर्षांतून एक तास दिवे बंद ठेवून असा अर्थ आवर साजरा करण्याची गरज नाही. कारण आपण दररोज असा सक्तीचा अवर (नव्हे अनेक अवर्स) साजरा करत असतो. त्यामुळे वर्षांतून अशी एक तास वीज बंद ठेवणे म्हणजे ‘दर्या में खसखस’! शिवाय ही बाब आपल्यासाठी अन्यायकारकच म्हणावी लागेल. महाराष्ट्रातील वीजनिर्मितीचे चित्रसुद्धा असेच विदारक आहे. संपूर्ण राज्याचा विचार केला तर सुमारे पाच हजार मेगाव्ॉट इतकी वीजटंचाई आहे. त्याचा परिणाम म्हणून शहरे आणि ग्रामीण भागांमध्ये कित्येक तास वीजकपात करावी लागते. मुंबई, पुण्यासारखी मोजकी भाग्यवान शहरे वगळता इतर शहरांमध्ये वीजकपात १२-१३ तासांपर्यंत जाते. गावांमध्ये तर ती १४ ते १६ तास इतकी जास्त असते. उन्हाळा सुरू झालेला असताना तर त्याची झळ अधिकच सोसावी लागत आहे. म्हणून असे सक्तीचे ‘अर्थ अवर्स’ असताना आपल्यासाठी वर्षांतून एक तास स्वत:हून वीज बंद ठेवणे अर्थहीन ठरते. ज्यांच्याकडे वर्षभर अखंडित वीज उपलब्ध आहे, तिथे या ‘अर्थ अवर’ला काही अर्थ उरतो.
हे वास्तव असले तरीसुद्धा या उपक्रमाला आपणही नैतिक पाठिंबा द्यायला हवा. त्याद्वारे आपण पर्यावरणरक्षणाच्या जागतिक प्रयत्नांमध्ये सहभागी असल्याचे दाखवून देता येईल. त्यामुळे दिल्ली-मुंबईमध्ये झालेले प्रयत्नांकडे सकारात्मकदृष्टय़ा पाहायला हवे. यात सहभागी होणाऱ्यांनीसुद्धा केवळ एका तासापुरते नव्हे तर नेहमीच वीजबचतीचे व ऊर्जाबचतीचे प्रयत्न करायला हवेत. हीच काळाची गरज आहे. ती जागतिक समूदायालासाठी लागू पडते. पर्यावरणाचे व जागतिक तापमानवाढीचे आजचे प्रश्न पाहता ऊर्जाबचत केवळ प्रातिनिधिक स्वरूपात करून चालणार नाही. ती आपल्या जीवनशैलीचाच भाग बनायला हवी. असे झाले तरच आजचे प्रश्न सुटण्याची आशा करता येईल. अन्यथा, वर्षभर वाट्टेल तशी वीज वापरून (आणि वाया घालवून) फक्त एका तासासाठी वीज वाचविण्याचा उपक्रम राबविणे हे नाटकच ठरेल. त्यामुळे दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या पद्धतीने वीजेची कशी बचत करता येईल, याचा विचार करून तो आचरणातही आणण्याची आवश्यकता आहे. आताच्या काळात साध्या-सोप्या पद्धतींनी वीज वाचविणे शक्य आहे. ही जबाबदारी सर्वानीच उचलायला हवी. विशेषत: विकसित देशांमधील नागरिकांनी त्यातील महत्त्वाचा वाटा उचलणे आवश्यक आहे. वातावरणात सोडल्या जाणाऱ्या कार्बन वायूंचे प्रमाण कमी करण्याचे बंधन घालणारा ‘क्योटो करार’ सध्या अस्तित्वात आहे. त्यानुसार विकसित देशांकडून सोडल्या जाणाऱ्या कार्बन वायूंचे प्रमाण १९९० सालच्या तुलनेत ५.२ टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट घेण्यात आले आहे. मात्र या प्रयत्नांमध्ये सध्या तरी अपयशच आलेले आहे. हा करार झाल्यानंतरही कार्बन वायूंचे प्रमाण कमी होण्याऐवजी ते १४ टक्क्यांनी वाढले आहे. या परिस्थितीत अर्थ अवर म्हणजेच वीजबचतीचे (ऊर्जाबजतीचे) तत्त्व अंगात भिनणे अधिकच आवश्यक ठरते. याकडे गांभीर्याने लक्ष दिल्याशिवाय अर्थ अवर हा अर्थहीनच ठरेल!
abhighorpade@rediffmail.com