Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३१ मार्च २००९
भावताल
(सविस्तर वृत्त)

गोदावरीचे उद्ध्वस्त रूप

 

आमच्या पैठण गावाला सातवाहन काळापासून (इ.स. पूर्व ३००) संत ज्ञानेश्वर, एकनाथांचा काळ ते आजच्या नाथसागरापर्यंत विविधांगी इतिहासाची परंपरा आहे. या नगरीचे अस्तित्व दक्षिणगंगा गोदावरी नदीमुळेच आहे. पण हजारो वर्षांपासून आपल्या लेकरांना जगवत पुढे जाणाऱ्या या पवित्र गोदामाईचे आजचे स्वरूप बघितले की मानवी करंटेपणाची कीव येते, संताप येतो. आठवणीतील गोदावरी स्वच्छ-निर्मळ, भरभरून देणारी होती. दुथडी भरून वाहणारी गोदामाई, पैठणसारख्या तीर्थक्षेत्री असणाऱ्या नयनमनोहर घाटांमधून अवखळपणे वाहणारी नदी म्हणजे एक वैभवच! नदीचा किनारा वाळूने गच्च भरून होता. जणू गावची छोटी चौपाटीच! संध्याकाळचा फेरफटका, गप्पा, राजकीय सभा याच हक्काच्या ठिकाणी म्हणजे नदीचे वाळवंट, मग संयुक्त महाराष्ट्र चळवळ असो कि गोवा मुक्तिसंग्राम किंवा निजाम राजवटीविरुद्धचा उठाव यांना लागणारी कार्यकर्त्यांची कुमक येथून जायची. अनेक वक्त्यांच्या सभा-चळवळी या वाळवंटाने पाहिल्या. पैठणच्या संत एकनाथांच्या यात्रेसाठी पूर्वी या वाळवंटात हजारो वारकरी उतरायचे. हरिनामाचे वाळवंट दुमदुमून जायचे. तेथील वाळूचा कण न् कण रोमांचित व्हायचा. वारकरी या वाळूत झरा खोदायचे. त्यातील पाण्यानेच तृप्त व्हायचे.. पण आज वाळवंट हा शब्दच लोक विसरून गेले आहेत. नदीपात्रात आज आहे ते मातीचे ढिगारे आणि गाळाचे डबके, उघडे बोडके वाळवंट पाहून आलेल्या काटय़ाकुपाऱ्या, अमर्याद वाढलेल्या वेडय़ा बाभळी! निसर्गत: वाहणाऱ्या या गोदावरीला मानवी आक्रमणाचा पहिला फटका बसला- पैठणला झालेल्या जायकवाडी धरणाचा (नाथसागर सरोवर)! त्याद्वारे आपण तिचा प्रवाह थांबवला. तो पाण्याचा प्रवाह थांबवला नाही, तर मानवी जीवनाचा प्रवाह थांबवला, कुठलीही नैसर्गिक अनुकूलता नसताना व पैठण परिसर धरणयोग्य नसताना शासनाने आडमुठय़ा धोरणाने हजारो एकर सुपीक, उत्तम गाळाची अशी जमीन या धरणात गेली. लाखो विस्थापित झाले. जमीनदार, शेतकरी वेठबिगार झाले. गोदावरी नदीच्या किनाऱ्याने रुजणारी एक संस्कृतीच नष्ट झाली. दरवर्षी पावसाळय़ात मोठा सुपीक गाळ गोदावरी घेऊन येई. त्यामुळे गंगाथडीचे किनारे दिवसेंदिवस सुपीक होत जात. ती प्रक्रियाच खंडित झाली. शेतीची धूप वाढली आणि शेतीचे अस्तित्वच धोक्यात आले. जमीन खळगट या प्रकारात मोडू लागली आणि वेडय़ा बाभळीचे व गाजरगवताचे अमाप पीक येऊ लागले. प्रत्यक्ष पैठण शहराला वळसा घालून जाणाऱ्या नदीचे आजचे स्वरूप पाण्याच्या डबक्यासारखे झाले आहे. यात भर म्हणजे अवघ्या शहराची घाण, मैला, सगळे सांडपाणी जसेच्या तसे कुठलीही प्रक्रिया न करता सरळ सरळ नदीत सोडले जाते. ते काळे, दरुगधीयुक्त, नरकपाणी नदी सडवण्यासाठी अक्षरश: झेपा घेते.
नदीच्या यातना इथेच संपत नाहीत. तीर्थक्षेत्र म्हणजे अस्थी विसर्जनाची हक्काची जागा! मरणोत्तर कार्यविधीही इथेच होतात. या साचलेल्या पाण्यात हजारो किलो अस्थी विसर्जित होत असल्यामुळे सगळय़ा नदीचे पाणी कसे पिवळेधम्मक झाले आहे. अस्थीविसर्जना आधीचे क्रियाकर्मही नदीच्या पात्रातच! केशवपन, पिंडदान आणि इतर कितीतरी विधी.. सगळय़ा पात्रात फक्त केसच केस, जेवणावळीच्या उष्टय़ा पत्रावळी, मुक्कामी राहणाऱ्यांचे सगळे विधी नदीपात्रातच. हे सगळे थोडे म्हणून की काय? गावातल्या सगळय़ा गाई-म्हशी यांचे न्हाणे, धुणे, केस कापणेही पात्रातच चालू असते. याच्या वरच्या बाजूलाच जायकवाडी धरणाच्या पाण्यावर चालणारा वीजनिर्मिती प्रकल्प आहे. तिथे एकदा वीजनिर्मिती झालेले पाणी पुढे नदीपात्रात चार किलोमीटरवर बंधारा बांधून अडवले जाते. हे पाणी पंपाद्वारे परत धरणात खेचले जाते. संपूर्ण पात्रात चांगले आणि घाण पाणी अक्षरश: ढवळून ढवळून होते. जेव्हा सगळे पाणी ओढून घेतले जाते, तेव्हा नदीपात्राची अक्षरश: गटारगंगा होते. प्रचंड दरुगधी, कचऱ्याचा खच, उदास भकास पात्र तेवढे शिल्लक राहते. पैठण शहराच्या सीमेपलीकडे तर गोदामाईच्या करुण, छिन्नविच्छिन्न रूपाकडे पाहवतच नाही. या नदीकाठच्या गावांना एका नवीन रोगाची लागण झाली आणि हा रोगही असाध्य आहे. नुसता असाध्यच नाही तर पुढच्या अनेक पिढय़ा उद्ध्वस्त करणारा! हा रोग म्हणजे नदीपात्रातील वाळूचा उपसा. या वाळूउपशामुळे गोदाकाठच्या अनेक गावांचे अस्तित्व संपण्याची भीती आहे. याचे सोयरसुतक ना सरकारला आहे, ना नदीकाठच्या गावकऱ्यांना! वाळू माफियांचा पैशाचा माज-मुजोरी, त्यांनी निर्माण केलेली समांतर प्रशासन व्यवस्था, सरकारी अधिकाऱ्यांचे बोटचेपे (आर्थिक) धोरण, जनतेचे पर्यावरणविषयीचे अज्ञान, त्यांची बेपर्वा वृत्ती, उदासीनता या गोष्टी त्यांनाच संपविल्याशिवाय राहणार नाहीत. बेसुमार वाळू उपशाने नदीचे पात्र चक्क बदलूनच गेले आहे. ठिकठिकाणी अजस्र जेसीबीच्या साहाय्याने वाळू उपसा चित्र आज सामान्य झाले आहे. त्यात पैठणच्या गोदावरीची वाळू अतिशय प्रसिद्ध असल्याने मग काही पाहायलाच नको. या वाळू उपशाने जमिनीतील पाणीपातळी खोल तरी कुठपर्यंत जाणार? कोरडय़ा पडणाऱ्या विहिरी, उद्ध्वस्त होणारी बागायती शेती आणि या परिसराचे होणारे वाळवंट हेच पाहायला मिळते. याच नदीपात्रात एकेकाळी काळय़ाशार, मधुर टरबुजांची रेलचेल असायची. आता ते नामशेष झाले आहेत.
त्रिंबकेश्वरपासून बंगालच्या उपसागरापर्यंत खळाळत वाहणाऱ्या, पैठण गावाजवळून वाहत त्याला ओळख देणाऱ्या, तेथील जीवन-संस्कृती फुलवणाऱ्या गोदामाईचे ‘ते’ मनोहारी-देखणे रूप आता इतिहासजमा झाले आहे. आता समोर दिसते ते भयानक विदारक रूप! वाळूऐवजी मातीचे उघडे-बोडके पात्र, त्यात अस्ताव्यस्त उगवलेली काटेरी झुडपे, कधीतरी पाऊस पडल्यावर अवचित पात्रात येणारे पाणी, दोन्ही काठच्या कोरडय़ा विहिरी, वाळवंटी जमीन, ना पक्ष्यांचे गुंजारण, ना किलबिल, ना प्राण्यांचे हंबरणे, ना गाईगुरांचे हुंदडणे.. नदीप्रदूषण व वाळू उपसणे या गोष्टींना आळा घातला नाही, तर पुढच्या पिढीला वाहती नदी कुठे दाखवायची? म्हणूनच या संकटाचा धोका ओळखून सर्वसामान्यांना नदीरक्षणाची चळवळ सुरू करावी लागेल. नदीला वाचवावे लागेल आणि तेही अगदी लवकरच! जास्त उशीर झाला तर पुढे हातात काहीही राहणार नाही. पुढे असेल धोका- विस्थापनाचा, अंधाराचा आणि वाळवंटाचा..
जयवंत पाटील, नेरूळ (प.), नवी मुंबई