Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३१ मार्च २००९
भावताल

‘अर्थ अवर’चा अर्थ!
पर्यावरणाच्या रक्षणासाठी गेल्या शनिवारी (२८ मार्च) जगभरातील काही शहरांनी एका तासासाठी वीज बंद ठेवली. ऑस्ट्रेलियातील सिडनीपासून अमेरिकेतील लॉस एंजेलिसपर्यंत आणि युरोपात लंडन-रोमपासून आशिया खंडात हाँगकाँग-सिंगापूपर्यंत काही जागरूक नागरिकांनी याच कारणासाठी वीज बंद ठेवली. विजेवर चालणारी जास्तीत जास्त उपकरणेसुद्धा या वेळात बंद ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. भारतातही दिल्ली, मुंबईसारख्या शहरांमधील काहीजण त्यात सहभागी झाले. ‘अॅन अर्थ अवर’ या नावाने पर्यावरणासाठी साजरा केला जाणारा हा एक तास! अशाप्रकारे अर्थ आवर साजरा करण्याचे हे तिसरे वर्ष. विश्व वन्यजीव निधी (डब्ल्यूडब्ल्यूएफ) या पर्यावरणप्रेमी संस्थेच्या सिडनी शाखेने २००७ साली या उपक्रमाला सुरुवात केली आणि आता जगभर त्याचे लोण पसरले.

गोदावरीचे उद्ध्वस्त रूप
आमच्या पैठण गावाला सातवाहन काळापासून (इ.स. पूर्व ३००) संत ज्ञानेश्वर, एकनाथांचा काळ ते आजच्या नाथसागरापर्यंत विविधांगी इतिहासाची परंपरा आहे. या नगरीचे अस्तित्व दक्षिणगंगा गोदावरी नदीमुळेच आहे. पण हजारो वर्षांपासून आपल्या लेकरांना जगवत पुढे जाणाऱ्या या पवित्र गोदामाईचे आजचे स्वरूप बघितले की मानवी करंटेपणाची कीव येते, संताप येतो. आठवणीतील गोदावरी स्वच्छ-निर्मळ, भरभरून देणारी होती. दुथडी भरून वाहणारी गोदामाई, पैठणसारख्या तीर्थक्षेत्री असणाऱ्या नयनमनोहर घाटांमधून अवखळपणे वाहणारी नदी म्हणजे एक वैभवच! नदीचा किनारा वाळूने गच्च भरून होता. जणू गावची छोटी चौपाटीच! संध्याकाळचा फेरफटका, गप्पा, राजकीय सभा याच हक्काच्या ठिकाणी म्हणजे नदीचे वाळवंट, मग संयुक्त महाराष्ट्र चळवळ असो कि गोवा मुक्तिसंग्राम किंवा निजाम राजवटीविरुद्धचा उठाव यांना लागणारी कार्यकर्त्यांची कुमक येथून जायची. अनेक वक्त्यांच्या सभा-चळवळी या वाळवंटाने पाहिल्या. पैठणच्या संत एकनाथांच्या यात्रेसाठी पूर्वी या वाळवंटात हजारो वारकरी उतरायचे.

गोव्याची दुसरी बाजू!
गोव्यातील राहणीमानाचा खर्च स्थानिकांना परवडणार नाही एवढा महागडा आहे. हे राहणीमान परवडावे, म्हणून इथला घरटी एक तरी माणूस परदेशात नोकरी करतो. जमिनीच्या किमती प्रचंड आहेत आणि स्थानिकांचा विरोध नजरेआड करून; प्रसंगी उद्योग, खाणी, पर्यटन प्रकल्पांसाठी जमिनी बळकावण्याचे प्रमाणही मोठे आहे. एकीकडे खाणकामामुळे घटणारा शेतजमिनीचा दर्जा; तर दुसरीकडे जमिनींवर सरकारकडून, पर्यटन व्यावसायिकांकडून सातत्याने येणारा दबाव अशा दुहेरी कात्रीत गोवावासीय सापडले आहेत.
गोवा म्हणजे रंगीबेरंगी पर्यटकांच्या गर्दीने फुललेले समुद्रकिनारे, मासेखाऊंना मेजवानी आणि स्वस्त दारू एवढेच समीकरण बहुसंख्यांना ठाऊक असते. फारतर पर्यटनातून गोव्याचा विकास झाला हा (गैर)समज आणि देशातील लोहखनिजाच्या एकूण निर्यातीपैकी ५० टक्के एकटय़ा गोव्यातून निर्यात केले जाते, इतपत सामान्यज्ञान जनमानसात आढळते. पण ‘अस्सल’ गोवेकरांशी संवाद साधला; तर पर्यटन आणि खाणकामातून उद्भवलेल्या पर्यावरणीय, सामाजिक समस्यांची तीव्रता लक्षात येते. अशा समस्या देशभरात आहेत; पण गोव्याचे वेगळेपण म्हणजे इथल्या जनतेला या समस्यांचे आकलन आहे. त्यातूनच गोव्यातील पर्यावरण चळवळीने गेल्या दशकभरात जोर धरला आहे.
सह्याद्रीचा घाटमाथा ते अरबी समुद्र अशा वैशिष्टय़पूर्ण भौगोलिक रचनेमुळे गोव्यात सदाहरित वनांपासून ते सागरी किनाऱ्याशी संबंधित विविध प्रकारच्या परिसंस्था एकमेकांजवळ उत्क्रांत झाल्या. या परिसंस्था वेगवेगळ्या भासल्या तरी त्यांचे स्वास्थ परस्परांवर अवलंबून असते. निसर्ग आणि त्यावर आधारलेल्या पारंपरिक जीवनशैलीचा एकसंध विचार न करता आखलेल्या धोरणांतर्गत अंदाधुंद बांधकामे-खाणकाम केल्याने गोव्याचे पर्यावरण आणि पर्यायाने स्थानिक जनजीवन धोक्यात आले आहे. जमिनीचा कस आणि वापर यावर खाणकामाचा मोठा दुष्परिणाम दिसून येतो. प्रत्यक्ष खाणीच्या परिसरात खोदल्यामुळे जमीन स्थानिकांच्या वापरायोग्य राहात नाही. खनिज काढून घेतल्यावर उरलेले सेंद्रिय घटकविरहित ढिगारे टाकल्याने निकृष्ट झालेली जमीन, तिची पावसाच्या माऱ्याने होणारी धूप; तसेच पावसाबरोबर वाहून जाणारे ढिगारे सखल भागातील शेतजमिनीत साचल्याने पडीक झालेली जमीन असे सर्व प्रकारचे दुष्परिणाम गोव्यातील विविध भागांत दिसून येतात. डोंगराळ भागातील वनस्पतींचे व मृदेचे आच्छादन गेल्यामुळे जमिनींची पाणी धरून ठेवण्याची क्षमता घटते. परिणामी, गोव्यातील भूजलपातळीही झपाटय़ाने खालावत आहे. एके काळी भरपूर पाणी असलेल्या या प्रदेशात आता पाणीटंचाईची तीव्र समस्या आहे. अर्थात, पर्यटक म्हणून जाणारी मंडळी प्रामुख्याने किनारी भागातच फिरत असल्याने गोव्याची ही बाजू त्यांच्यासमोर येतच नाही. पर्यटकाने पैसे मोजले की त्यांच्या गरजा भागविण्यासाठी व्यावसायिक तत्पर असतात; अशा वेळी स्थानिकांचे नैसर्गिक स्रोत ओरबाडून पर्यटकांच्या गरजा भागविल्या जातात. उन्हाळ्याच्या दिवसात गोव्यातील अनेक गावांमधून बोअरवेलने पाणी उपसून हॉटेलांकडे वळवले जाते. ही गावे मात्र तहानलेलीच राहतात. देशी-विदेशी पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या समुद्रकिनाऱ्यांवर तारांकित हॉटेल-रिसॉर्टपासून ते झावळ्यांनी तात्पुरते आडोसे करून उभारलेल्या झोपडीवजा हॉटेलांचा सुळसुळाट आहे. पर्यटकांना आवश्यक सुविधा पुरविताना घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापनाच्या पुरेशा सोयींअभावी परिसरात प्रदूषणाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याचबरोबर, स्थानिक आणि पर्यटक यांच्यातील सामाजिक, सांस्कृतिक फरकांमुळे उद्भवलेल्या समस्या आहेत. थोडक्यात, पर्यटनातून उद्भवणाऱ्या सर्व प्रकारच्या समस्या इथे आहेत.
या सगळ्यात दिलाशाची बाब अशी, की गोवेकर आता जागरूक आणि संघटित होत आहेत. चुकीची धोरणे, त्यांचे परिसंस्थांवर व स्थानिक जीवनशैलीवर होणारे दुष्परिणाम यातील परस्परसंबंध त्यांनी समजून घेतला आहे. त्यातूनच इथली पर्यावरण चळवळ जोर धरत आहे. आज गोव्यातील कोणत्याही गावात गेले; तर एक तरी हिरवा शिलेदार त्याच्या हक्काचे नैसर्गिक स्रोत लुटू पाहणाऱ्या सरकारी यंत्रणेविरोधात उभा ठाकलेला दिसेल. ‘माहिती अधिकारा’सह उपलब्ध कायद्याच्या चौकटीचा सुयोग्य वापर आणि हक्कासाठी लढण्याची चिकाटी अशा पायावर ही चळवळ उभी आहे. मात्र, विकासाची जबर किंमत मोजून गोव्याने हे पर्यावरणीय शहाणपण मिळविले आहे. जीवघेणा, किमती विकास नको असेल तर; देशातील इतर भागांनी गोव्याकडून ‘पुढच्यास ठेच..’चा धडा आजच घ्यायला हवा.
reshma.jathar@gmail.com