Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३१ मार्च २००९

दिवस कमळाचे : सारसबागेच्या तळ्यातील कमळे फुलली आहेत. ही कमळे मतदानातही फुलणार का, अशी चर्चा सारसबागेला भेट देणारे नागरिक करीत आहेत.

गाडी छोटी; आघाडी मोठी!
सुनील कडूसकर, पुणे, ३० मार्च

‘नॅनो’ म्हणजे स्वप्नपूर्ती आहे, याच दृष्टीने सर्वसामान्य ग्राहक त्याकडे पाहात आहे! वाहनांच्या जगात अनेक नवलाईच्या घटना घडत असतात; पण ‘नॅनो’ ने सर्वाना ज्याप्रकारे आकृष्ट करून घेतले, ते थक्क करणारे आहे. ‘नॅनो’ सारखी छोटी गाडी आजच्या धावपळीच्या मोठय़ा स्पर्धेत अजिबात मागे पडणार नाही, असा विश्वास तज्ज्ञांपासून सर्वजण व्यक्त करीत आहेत.

पालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे हजारो डायऱ्या ‘बाद’
पुणे, ३० मार्च / प्रतिनिधी

महापालिकेच्या नियोजनशून्य कारभाराचा आणखी एक नमुना नव्याने प्रकाशात आला असून आठशे ते हजार अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक बदलल्यामुळे महापालिकेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अकराहजार डायऱ्या ‘बाद’ झाल्या आहेत. पुणे महापालिकेतर्फे दूरध्वनी क्रमांकांची सूची छोटय़ा व मोठय़ा आकारातील डायरीच्या स्वरूपात प्रसिद्ध केली जाते. महापालिका निवडणुकांनंतर २००७ साली अशी डायरी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर दोन वर्षांनंतर; गेल्या महिन्यात नवी डायरी प्रसिद्ध करण्यात आली. महापालिकेच्या सर्व नगरसेवकांचा, शिक्षण मंडळ सदस्यांचा, अन्य समित्यांच्या सदस्यांचा निवासस्थान व कार्यालयाचा दूरध्वनी आणि त्यांचा मोबाईल क्रमांक या डायरीत दिला जातो.

दुर्मीळ जातीच्या दोन हरणांची शिकार; चौघे जेरबंद
वडगाव मावळ, ३० मार्च / वार्ताहर

दुर्मीळ जातीच्या दोन हरणाची बेकायदेशीर शिकार केल्याप्रकरणी कोथुर्णे(ता.मावळ) येथील ग्रामस्थांनी आज पहाटे चार शिकाऱ्यांना मुद्देमालासह पकडले. लक्ष्मण बबन हिलम (वय ३४), गणेश राम हिलम (वय १८), भगवान रामचंद्र पवार (वय ३०), दत्ता बबन हिलम (वय २० सर्व रा. दिवड, ता. मावळ, जि.पुणे)अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

निवडणूक आणि क्रिकेट..
निवडणूक आणि क्रिकेटचे सामने एकत्र आल्याने निवडणुकीतील घडामोडींना क्रिकेटमधील उपमा देण्याचा मोह कार्यकर्त्यांना न झाला, तरच नवल होते. शिरूर शहरात झालेल्या आदिवासींच्या मेळाव्यात एक वक्ता म्हणाला, ‘‘काही जण आम्हाला गल्लीत क्रिकेट खेळणारे समजतात, मात्र आमच्या खेळाची तुम्हाला जाणीव नाही. गल्लीतील हे खेळाडू भल्याभल्यांच्या विकेट काढू शकतात. लोकसभेची निवडणूक झाली की कळेल कोणाची विकेट पडली ते. विकेट काढण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे, हे लक्षात ठेवा.’’ आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आदिवासी नेत्याच्या या वक्तव्यास उपस्थित आदिवासी बांधवांनी जोरदार टाळ्या वाजवून दाद दिली.

‘कार्यक्षम’ प्राध्यापकांच्या जाहीर सत्काराची मागणी
पुणे, ३० मार्च / खास प्रतिनिधी

एका दिवसात ६२४ उत्तरपत्रिका तपासणाऱ्या पुणे विद्यापीठातील ‘कार्यक्षम’ प्राध्यापकांचा जाहीर सत्कार करण्याचा निर्णय विद्यापीठ विकास मंचाने घेतला आहे. केंद्रीय मूल्यमापन केंद्रामध्ये (कॅप) उत्तरपत्रिका तपासणीच्या कामात होणाऱ्या ढिलाईची लक्तरे काल अधिसभेच्या बैठकीत वेशीवर टांगण्यात आली. त्याचे विद्यापीठ वर्तुळामध्ये तीव्र पडसाद उमटले. या पाश्र्वभूमीवर विद्यापीठ विकास मंचतर्फे विद्यापीठाला उपहासात्मक निवेदन दिले आहे. एका दिवसामध्ये तीनशे, पाचशे आणि सहाशेपेक्षा अधिक उत्तरपत्रिका तपासणाऱ्या ‘कार्यक्षम’ प्राध्यापकांचे जाहीर सत्कार करण्याचे नियोजन मंचने केले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) नियमबाह्य़ कृत्य करणाऱ्या प्राध्यापकांवर कडक कारवाईची मागणी केली. या संदर्भात कुलगुरू, महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक, मुख्य परीक्षा नियंत्रक आदींना निवेदन सादर करण्यात आले आहे.

शिरोळे यांच्या पदयात्रेला नागरिकांचा प्रतिसाद
पुणे, ३० मार्च/प्रतिनिधी

भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार अनिल शिरोळे यांच्या कसबा विधानसभा मतदारसंघातील पदयात्रेला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. भाजप शहराध्यक्ष आमदार गिरीश बापट यांच्या हस्ते केसरी वाडय़ातील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. या वेळी बापट यांच्यासह अशोक ऐनपुरे, विजय मारटकर, शुभदा जोशी आदी नगरसेवक व युतीचे कार्यकर्ते उपस्थित होते. शहराच्या मध्य भागातील वाहतुकीची समस्या, अर्धवट बांधकामे व वाडय़ांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देणार असल्याचे शिरोळे यांनी पदयात्रेच्या समारोपप्रसंगी सांगितले. शिरोळे १ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

कामातील हलगर्जीपणाबद्दल माजी अधिकाऱ्यांना अटक
पुणे, ३० मार्च / प्रतिनिधी

कामात हलगर्जीपणा केल्यामुळे १९९४-९७ या कालावधीत सरकारचे साठ लाख रुपयांचे नुकसान केल्याच्या आरोपावरून अल्पबचत केंद्रातील दोन माजी अधिकाऱ्यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज अटक केली. त्यानंतर काही वेळातच त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. सुशीला बाळकृष्ण चाफळकर (वय ७०, रा. धनकवडी) आणि सुनीता सोनारीकर (वय ६२, रा. बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. बंडगार्डन पोलीस ठाण्यात २००२मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

‘उमेद परिवार’ च्या वतीने बुधवारी विविध गुणदर्शन
पुणे, ३० मार्च/प्रतिनिधी

‘उमेद परिवार’ ही मतिमंद-बहुविकलांग मुंलांच्या पालकांची संस्था येत्या १ एप्रिल रोजी १९ वा वर्धापनदिन साजरा करणार आहे. या वर्धापनदिनानिमित्त बालगंधर्व रंगमंदिरामध्ये मुलांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सकाळी ९ ते २ या वेळात होणार आहे. यात पुण्यातील एकूण २८ शाळा व ३१४ विद्यार्थी सहभागी होणार आहेत. बी. जी. शिर्के ग्रुपचे वरिष्ठ मुख्य अधिकारी रावसाहेब बी. सूर्यवंशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.

‘दोनदाच निवडणूक लढविण्याचे बंधन असावे’
पुणे, ३० मार्च/प्रतिनिधी

लोकप्रतिनिधींना दोनपेक्षा अधिक वेळा निवडणुका लढविण्याची बंदी असावी आणि प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी उमेदवाराविषयी नापसंती दर्शविणारा पर्यायही मतदारांना उपलब्ध असावा याबाबत संसदेत कायदे होणे आवश्यक असून, आपण निवडून आल्यास हा कायदा करण्यासाठी जिवाचे रान करू, असे आश्वासन बहुजन समाज पक्षाचे उमेदवार डी. एस. कुलकर्णी यांनी आज पत्रकार परिषदेत दिले.कुलकर्णी म्हणाले की, राजकीय गुन्हेगारी वाढली असल्याने नागरिकांमध्ये मतदानाविषयी नाराजीचा सूर दिसत आहे. त्याचा परिणाम म्हणजे मतदानाचे प्रमाणही कमी होत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी ‘एकही उमेदवार पसंत नाही’ असा पर्यायही प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी मतदारांना उपलब्ध असावा.घटनेत तशी तरतूदही आहे. त्यामुळे हे कायदे करण्याला आपण प्राधान्य देणार असल्याचे कुलकर्णी म्हणाले.

आश्वासनांची खैरात करणार नाही झ्र् लांडे
िपपरी, ३० मार्च / प्रतिनिधी

नगरसेवक, महापौर आणि आमदारकीच्या माध्यमातून आपण अनेक समस्या मार्गी लावल्याचे सांगत शिरूर लोकसभेतील राष्ट्रवादीचे उमेदवार विलास लांडे यांनी आपण केवळ आश्वासनांची खैरात करून मते मागणार नाही, असे आज स्पष्ट केले. दिल्लीत शरद पवार यांची शक्ती वाढविण्यासाठी मतदारांनी आपल्याला संधी द्यावी, असेही ते म्हणाले. विलास लांडे यांनी आज तळवडे, रुपीनगर, ज्योतीबानगर, ओटास्कीम, त्रिवेणीनगर, निगडी गावठाण आदी भागातील मतदारांशी संपर्क साधला, तेव्हा ते तळवडे येथे बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत उपमहापौर शरद बोऱ्हाडे, नगरसेवक अजित गव्हाणे, महेश लांडगे, घनश्याम शेलार, दत्ता साने, शांताराम भालेकर, सिध्देश्वर बारणे, वसंत लोंढे, सुमन पवळे, माजी नगरसेवक पंडित गवळी, सुनील लोखंडे, अशोक पवार, माऊली लांडे, नंदू शिंदे, गोरख भालेकर, संतोष कवडे, विठ्ठल भालेकर आदी उपस्थित होते. सकाळी नऊ वाजता तळवडे येथून लांडे यांच्या पदयात्रेस सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी ज्योतीबानगर, ओटास्कीम, त्रिवेणीनगर, निगडी गावठाण आदी परिसरातील मतदारांशी संपर्क साधला. काही भागात त्यांनी उघडय़ा जीपवरून मतदारांना अभिवादन केले. प्रचारफेरीत ठिकठिकाणी महिलांचा तसेच तरुणांचा सहभाग मोठय़ा संख्येने होता.

समाजसेवेसाठी प्रशासकीय सेवा सर्वोत्तम मार्ग - राणे
पुणे, ३० मार्च / प्रतिनिधी

‘समाजासाठी काही करण्याची ज्यांची इच्छा आहे, त्यांना प्रशासकीय सेवा हा सर्वोत्तम मार्ग आहे’, असे उद्गार माजी सनदी अधिकारी वि. पा. राणे यांनी आपल्या ‘माझी प्रशासकीय वाटचाल’ या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी काढले. वि. पा. राणे लिखित ‘माझी प्रशासकीय वाटचाल’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ सनदी अधिकारी तसेच भूतपूर्व कॅबिनेट सेक्रेटरी बी. जी. देशमुख यांच्या हस्ते झाले. मी शासकीय सेवेत तेहतीस वर्षे काम केले आणि त्यानंतर वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटमध्ये अकरा वर्षे महासंचालक म्हणून काम केले. या प्रदीर्घ सेवेत जे अनुभव मला आले, ते वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच वासंती परांडेकर यांनी मला जो सक्रिय पाठिंबा दिला, त्याशिवाय हे आत्मकथन पूर्ण झाले नसते, असे राणे म्हणाले. या वेळी बी. जी. देशमुख यांनी एक शांत व्यक्तिमत्त्व असा राणे यांचा उल्लेख आपल्या भाषणात केला. जास्तीत जास्त तरुणांनी या सेवेत यावे, असे उद्गार प्रमुख पाहुणे अजित निंबाळकर यांनी काढले.
या वेळी डॉ. स्नेहल तावरे, वासंती परांडेकर, बी. जी. शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते.

काळे फासणाऱ्या तिघांना जामीन
पुणे, ३० मार्च/प्रतिनिधी

बहुजन समाज पक्षाच्या प्रदेश महासचिवाला काळे फासण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांचा जामीन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गिरीश देशपांडे यांनी आज मंजूर केला. पक्षाचे उमेदवार डी.एस. कुलकर्णी यांच्या काल रात्री दत्तवाडी भागामध्ये सुरू असलेल्या पदयात्रेदरम्यान कमलेश ओव्हाळ (वय ३३), श्याम भोसले (वय २९) आणि सुखदेव सोनवणे (वय ३१, तिघे रा. पर्वती) यांनी पक्षाचे महासचिव किरण अल्हाट यांच्या अंगावर काळा रंग टाकला. त्यानंतर दत्तवाडी पोलिसांनी तिघांनाही अटक केली होती. सोनवणे व ओव्हाळ या दोघांच्या वतीने अ‍ॅड. सागर नेवासे यांनी काम पहिले.

आढळरावांकडून विकास आराखडय़ाची
नुसती ओरड - अजित पवार
चाकण, ३० मार्च/वार्ताहर

विकास कामांच्या नावाखाली जाहीर केलेल्या विकास आराखडय़ाची ओरड करून खोटय़ा वल्गना करणाऱ्या खासदार शिवाजीराव आढळराव यांना येत्या निवडणुकीत जनताच जशास तसे उत्तर देईल असा टोला पालकमंत्री अजित पवार यांनी चाकण येथे मारला. येथील मीरा मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विलास लांडे यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात विरोधकांवर टीकेचा आसूड मारताना ते बोलत होते. यावेळी अर्थ व नियोजन मंत्री दिलीप वळसे पाटील, पक्ष निरीक्षक घनशाम शेलार, जिल्हाध्यक्ष वल्लभ बेनके, खेडचे आमदार दिलीप मोहिते, माजी आमदार राम कांडगे, मदन बाफना, जगन्नाथ शेवाळे, सूर्यकांत पलांडे, माजी खासदार अशोक मोहोळ व पक्षाचे पदाधिकारी, सर्व जि.प. सदस्य, पं. स. सदस्य उपस्थित होते. यावेळी अर्थमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, ‘‘भाजप हा भावनेवर राजकारण करणारा पक्ष असून गावोगावी रामाची मंदिरे असूनही निवडणुका जवळ आल्या की अयोध्येच्या राम मंदिराचा मुद्दा करतात आणि हिंदू विरुद्ध मुस्लिम व दलित विरुद्ध सवर्ण उमेदवार उभे करून समाजात तेढ वाढवतात.’’ तालुकाध्यक्ष शांताराम भोसले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

सुप्रिया सुळे आज अर्ज भरणार
बारामती, ३० मार्च/वार्ताहर

बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार, ३१ मार्च रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, अशी माहिती बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अ‍ॅड. सुभाष ढोले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. बुधवार, एक एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता बारामती तालुक्यातील ‘कन्हेरी’ याठिकाणी उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात येईल. याप्रसंगी पालकमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष वल्लभ बेनके हे प्रचाराला उपस्थित राहणार आहेत. कन्हेरीचा मारुती हे दैवत पवार कुटुंबीयांना आशीर्वाद रूपात आतापर्यंत यशस्वीच ठरलेा आहे, ती परंपरा आजही कायम ठेवण्यात आली आहे.