Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३१ मार्च २००९
राज्य

राजकीय वणवा !
जयप्रकाश पवार
नाशिक, ३० मार्च

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे रणशिंग वाजल्यानंतर विविध राजकीय पक्षांनी कंबर कसत तयारी सुरु केली असताना याच पक्षांच्या ज्या स्थानिक मनसबदारांना पक्षाने साधे विचारातही घेतले नाही अशी मंडळी आपापल्या समर्थकांकरवी ठिकठिकाणी गोंधळ घालू लागले आहेत. कडक उन्हाळा अन् त्यातच निवडणुकीचे तप्त वातावरण, यामुळे सध्या उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या लोकसभेच्या मतदार संघामध्ये राजकीय वणवा पेटल्यागत एकूण वातावरण तयार झाले आहे.

ए. टी. पवारांचा रौद्रावतार अन् भुजबळांचे सामंजस्य!
नाशिक, ३० मार्च / प्रतिनिधी

मितभाषी आणि मनमिळावू अशी प्रतिमा असलेल्या आणि राज्य मंत्रिमंडळात आजवर विविध पदे भूषविलेल्या आमदार ए. टी. पवार यांचा रौद्रावतार पाहून उपमुख्यमंत्री छगन भुजबळांसह कळवण येथे आयोजित राष्ट्रवादीच्या मेळाव्याप्रसंगी उपस्थित मंडळींवर अवाक् होण्याची वेळ आली. मेळाव्यादरम्यान व्यासपीठावरील ध्वनीक्षेपकाचा ताबा घेत आमदार पवार यांनी, ‘आपण तब्बल ४० वर्षे राजकारणात आहोत, आदिवासी असलो तरी उच्चशिक्षित आहोत, सातत्यानं निवडूनही येत आहोत, मग आपल्याला खासदारकीचे तिकीट का नाकारण्यात आले..’

डॉ. भा. ल. भोळे यांना महर्षी शिंदे पुरस्कार
सातारा, ३० मार्च / प्रतिनिधी

रा. ना. चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमीचे उपाध्यक्ष डॉ. भास्कर लक्ष्मण भोळे (नागपूर) यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती प्रतिष्ठानचे विश्वस्त प्रा. रवींद्र चव्हाण, शरच्चंद्र चव्हाण, सतीश कुलकर्णी व प्रा. संभाजीराव पाटणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दुर्मिळ जातीच्या दोन हरणांची शिकार चौघे जेरबंद
वडगाव मावळ, ३० मार्च / वार्ताहर

दुर्मिळ जातीच्या दोन हरणाची बेकायदेशीर शिकार केल्याप्रकरणी कोथुर्णे(ता.मावळ) येथील ग्रामस्थांनी आज पहाटे चार शिकाऱ्यांना मुद्देमालासह पकडले. लक्ष्मण बबन हिलम (३४), गणेश राम हिलम (१८), भगवान रामचंद्र पवार (३०), दत्ता बबन हिलम (२० सर्व रा. दिवड, ता. मावळ, जि.पुणे)अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

कोकणातील जमिनी वाचविणे अत्यावश्यक - गीते
अलिबाग, ३० मार्च/ प्रतिनिधी

कोकणात मुळात आता जमीन शिल्लक नाही, जी आहे ती वाचविणे अत्यावश्यक आह़े या समस्येबाबत माझी भूमिका शेतकऱ्यांच्या बाजूचीच राहील़ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय जसा सरकारने घेतला, तसाच निर्णय कोकणातील मच्छिमारांचे सर्वेक्षण करुन त्यांच्या बाबतीत घेण्यात यावा अशी लेखी मागणी करुन त्याचा पाठपुरावा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याकडे केला होता़ परंतु त्यांनी ती बाब राज्य शासनाकडे असल्याचे सांगून केंद्रीय स्तरावर निर्णय घेतला नाही़

कोकणचा हापूस हवामानाच्या दुष्टचक्रात!
जितेंद्र पराडकर

कोकण व भातशेती यांचे जसे अतूट नाते आहे, तद्वत आंबा व कोकण यांचे आहे. हापूस आंब्याला पोषक असणारे वातावरण कोकणात असल्याने येथे हापूसची लागवड मोठय़ा प्रमाणावर करण्यात आली आहे. हापूसच्या माध्यमातून एका हंगामात वर्षभराची आर्थिक घडी बसविण्याचे शेतकरी व बागायतदारांचे नियोजन प्रत्येक वर्षी खराब हवामान व अवेळी पडणाऱ्या पावसामुळे बिघडू लागले आहे. परिणामी, छोटय़ा बागायतदारांपुढे दरवर्षी नुकसानातून बाहेर कसे यायचे, असा प्रश्न उभा राहात आहे.

निसर्गाच्या लहरीपणावर मात करणार ‘फळांचा राजा’
धीरज वाटेकर
चिपळूण, ३० मार्च

कोकणची अर्थव्यवस्था सांभाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे पीक म्हणून आंब्याकडे पाहिले जात असले तरी निसर्गाचा लहरीपणा आणि विस्कळीत उत्पादन पद्धती यामुळे या विषयात कोकणला अभूतपूर्व यश अद्यापही प्राप्त झालेले नाही. आंबा उत्पादनातील अडचणींचा शास्त्रीय अभ्यास करून आंबा विषयतज्ज्ञ विजय जोगळेकर यांनी विकसित केलेल्या ‘डिफ्यूजर’ तंत्रज्ञानामुळे आंब्याची अर्थव्यवस्था पालटणार आहे.

अमरीश पटेल समर्थकांकडून शक्तिप्रदर्शनाची तयारी
धुळे, ३० मार्च / वार्ताहर

अंतर्गत मतभेदांनी कळस गाठल्यामुळे संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनलेल्या धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी व रिपाइं आघाडीचे उमेदवार अमरीश पटेल हे १ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आ. रोहिदास पाटील समर्थकांच्या नाराजीच्या पाश्र्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी पटेल समर्थकांकडून भव्य शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे.

‘विनामूल्य व्हीलचेअर-अपंगांचे मनोबल उंचावणारी ठरावी’
खोपोली, ३० मार्च/वार्ताहर
अपंग बांधव व भगिनींना विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आलेल्या व्हीलचेअरचा विनियोग पालकांनी आपल्या अपंग पाल्याला प्रेरणा-प्रोत्साहन देणारा ठरेल, त्यांचे मनोबल उंचावणारा ठरेल, अशा पद्धतीने करावा. व्हीलचेअरची देखभाल-दुरुस्ती जाणीवपूर्वक करावी, असा विनंतीवजा सल्ला के.टी.एस.पी. मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण तावडे यांनी दिला.

सोलापुरात जूनमध्ये पहिले आंबेडकरी साहित्य संमेलन
सोलापूर, ३० मार्च/ प्रतिनिधी
सोलापुरात येत्या जूनमध्ये पहिले अखिल भारतीय आंबेडकरी वैचारिक साहित्य संमेलन होणार असून त्याची पूर्वतयारी केली जात आहे. आंबेडकरी चळवळीने कृतीतून दलित समाजावरील अन्यायाला वाचा फोडली. त्यामुळे आंबेडकरी चळवळ हेच खरे साहित्य संमेलन असल्याचे संबोधले जात आहे. या संदर्भात प्रा. डॉ. अशोक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनाच्या संयोजन समितीची बैठक भाई छन्नुसिंग चंदेले समाजसेवा महाविद्यालयात झाली. हे संमेलन १३ व १४ जून रोजी घेण्याचे ठरविण्यात आल्याचे प्रा. डॉ. गायकवाड यांनी सांगितले. या बैठकीस दलितमित्र सि.गु. सोनकांबळे, आर. ई. ताकपेरे, सिद्धार्थ गायकवाड, अशोक वाघमारे, संजय रणदिवे, महेंद्र माने, गौतम क्षीरसागर, नेमचंद घोडके आदी उपस्थित होते.

मोटार सायकल अपघातात दोन युवक ठार
वाडा, ३० मार्च/वार्ताहर

तालुक्यातील केळीचा पाडा येथील संदेश पाटील (१९) व अंबिस्ते येथील उमेश सावंत (२४) हे दोन तरूण आपापल्या मोटारसायकलने खानिवली येथे जात असताना एकाच वेळी ट्रकने दिलेल्या धडकेत जागीच ठार झाले. कुडूस-कंचाड राज्यमार्गावरील साईडपट्टीचे काम गेले अनेक वर्ष न केल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले आहेत. तसेच अनेक ठिकाणी मोऱ्यांचे पाईप टाकण्यात आलेले, परंतु संरक्षक भिंत बांधण्यात आलेली नाही. रस्त्यालगतच्या संरक्षण भिंत नसलेल्या मोरीमध्ये भरधाव ट्रक पडल्याने व याच वेळेला ट्रक समोरून व ट्रकच्या मागून आलेले हे दोन मोटरसायकवरील युवक ट्रकखाली सापडून जागीच ठार झाले.

कोल्हापूरला वळवाने झोडपले
कोल्हापूर, ३० मार्च / प्रतिनिधी

मार्च महिन्यातील सर्वाधिक उष्णतेच्या झळा लागल्यामुळे हैराण झालेल्या करवीरवासीयांना सायंकाळी मात्र जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसाने दिलासा दिला. दीड तासाहून अधिक काळ कमीअधिक प्रमाणात झालेल्या पावसामुळे रात्री हवेमध्ये थंडावा निर्माण झाला होता. शहराबरोबरच आसपासच्या परिसरातही वळवाच्या पावसाने हजेरी लावली. मार्चमध्ये पडलेल्या या पहिल्याच वळिवाच्या पावसामध्ये चिंब भिजण्याचा आनंद बालगोपाळांसह अनेकांनी लुटला. इचलकरंजी शहरात हलकासा पाऊस झाला. मात्र जोरदार वाऱ्यामुळे गावभाग परिसरातील आंबी गल्ली येथील काही घरांवरील पत्रे उडून गेले. मार्च महिन्यात होळीमध्ये पावसाची एखादी तरी हलकी सर येऊन जाते असा आजवरचा अनुभव आहे. यंदा मात्र होळीच्या दिवशी पावसाचा शिडकावा झाला नाही. होळीपासून आजअखेर वळिवाच्या पावसाच्या प्रतीक्षेत करवीरवासीय होते.

संस्कृत भाषा सभेतर्फे विशेष अभ्यास वर्ग
नाशिक, ३० मार्च / प्रतिनिधी
येथील संस्कृत भाषा सभेचे संस्थापक डॉ. वि. म. तथा अण्णासाहेब गोगटे यांच्या जन्मशताब्दीवर्षांनिमित्त दोन विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रकाश सराफ यांनी दिली. संस्कृत अभ्यास वर्ग व संस्कृत शिक्षण प्रशिक्षण वर्ग हे दोन विशेष उपक्रम यंदा राबविण्यात येणार असून अभ्यास वर्गामध्ये प्रवेश घेण्यासाठी किमान १२ वर्षे वयोमर्यादा असणे गरजेचे आहे. या वर्गातंर्गत संस्कृत सुभाषित, स्तोत्र, कथा व प्राथमिक व्याकरण (आवश्यकतेनुसार इंग्रजी माध्यम) ची माहिती देण्यात येणार आहे. संस्कृत प्रशिक्षण वर्गामध्ये संस्कृत अध्यापन करण्यास इच्छुक अशा व्यक्तींना प्रवेश दिला जाईल. इच्छुकांचे वय २० वर्षांपेक्षा अधिक अपेक्षित असून कोणत्याही विषयाच्या शालेय शिक्षकांना या उपक्रमासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. या वर्गासाठी आठवी ते दहावीची संपूर्ण संस्कृतची पाठय़पुस्तके, निबंधरचना, प्राथमिक व्याकरणावर आधारित अभ्यासक्रम राहील. दोन्ही वर्ग २० ते २५ एप्रिल या कालावधीत सुरू होतील. प्रशिक्षण वर्गासाठी दीड महिन्याचा कालावधी असून इच्छुक प्रशिक्षणार्थीनी अधिक माहितीसाठी डॉ प्रकाश सराफ (०२५३-२५७०२०३), सुभाष सूर्यवंशी (९४२३९७१५०४), तेजश्री वेदविख्यात (०२५३-२५९१४४८) आणि सभेच्या कार्यदर्शिनी सरिता देशमुख (०२५३-२३६४००४) यांच्याशी संपर्क साधावा. अधिकाधिक संस्कृतप्रेमींनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन संस्कृत भाषा सभेतर्फे करण्यात आले आहे.

यंदाच्या निवडणुकीस वेगळे महत्त्व -प्रभू
चिपळूण, ३० मार्च/वार्ताहर

अलिकडच्या काळात घडलेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर यंदाच्या लोकसभा निवडणुकीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही निवडणूक देशाला वाचविण्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे सक्षम उमेदवाराला निवडून द्या, असे आवाहन रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा शिवसेनेचे उमेदवार खा. सुरेश प्रभू यांनी केले. ते म्हणाले, पाश्चिमात्य देशांमध्ये बंदर विकासाला प्राधान्य देण्यात येते. परंतु आपल्या देशात बंदरे प्रदूषित कशी होतील, याकडे लक्ष देण्यात येते. हे चित्र बदलण्यासाठी आपण बंदर विकासाला प्राधान्य देणार आहोत. बंदरांच्या विकासासाठी सागरमाला या समितीची स्थापना करण्यात आली आहे, परंतु याकडे केंद्र सरकारने पाऊल उचलले नाही. युतीच्या नेत्यांमधील बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी हे नेते प्रथम देशाचा विचार करतात. काही लोक मात्र स्वहिताचा विचार करतात, अशी टीका त्यांनी केली. ही निवडणूक निर्भयपणे पार पाडण्यासाठी आत्मविश्वासाने सामोरे जा, असे आवाहन प्रभू यांनी केले. व्यासपीठावर माजी आ. बापू खेडेकर, उपनेते दशरथ शिर्के, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, शशिकांत चव्हाण, तालुकाप्रमुख सदानंद चव्हाण, सचिन खरे, सचिन कदम, उपजिल्हाप्रमुख अप्पा खैर, महेश दीक्षित, विजय चितळे, दादा रेळेकर, नगरसेवक संतोष टाकळे यांच्यासह युतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

नागपुरात विक्रमी ४२ अंश तापमानाची नोंद
नागपूर, ३० मार्च / प्रतिनिधी

उन्हाचे चटके वाढतच असून २००४ नंतर आज नागपुरात मार्च महिन्यातील गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक म्हणजे ४२ अंश कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. हवामानात झपाटय़ाने होणाऱ्या बदलांचा अनुभव यंदा नागरिक घेत आहेत. मार्च महिन्याच्या आरंभी तापमानात झपाटय़ाने वाढ झाली व विदर्भाच्या अनेक भागात पारा ४० अंशांवर पोहोचला. मात्र पुन्हा हवामान बदलले आणि मार्चच्या मध्यात विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने तापमानात झपाटय़ाने घट होऊन पुढचा आठवडाभर नागरिकांना उन्हाचे चटके आणि उकाडय़ापासून दिलासा मिळाला. त्यानंतर मार्चच्या शेवटच्या आठवडय़ात पुन्हा पारा चढायला लागला व तापमान ३५ अंशांपर्यंत पोहोचले. गेल्या तीन दिवसात सकाळपासून कडक उन्हं तर, दुपारनंतर ढगाळलेले आकाश अशा लहरी हवामानाचा अनुभव नागरिक घेत आहेत. मात्र आज नागपुरात २००४ नंतर पहिल्यांदाच मार्च महिन्यातील सर्वाधिक म्हणजे ४२ अंश कमाल तापमानाची नोंद झाली.