Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३१ मार्च २००९
क्रीडा

दक्षिण आफ्रिकेने दुसरा ट्वेन्टी-२० सामनाही जिंकला
सेंच्युरीयन, ३० मार्च/ वृत्तसंस्था

कसोटी मालिकेत पराभूत झालेल्या यजमान दक्षिण आफ्रिकेच्या संघाने दोन ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाला २-० अशी धूळ चारून त्या पराभवाची परतफेड केली आहे. दक्षिण आफ्रिकेचे १५७ धावांचे माफक आव्हान ऑस्ट्रेलियाला पेलता आले नाही आणि त्यांना दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यांतही १७ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. दक्षिण आफ्रिकेतर्फे पदार्पण करणाऱ्या वॅन डर मव्‍‌र्हने ४८ धावांची खेळी साकारीत गेल्या सामन्यात स्फोटक फलंदाजी करणाऱ्या माईक हसीला तंबूत धाडले आणि संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. मर्वलाच सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

बच गए..
गंभीर आणि लक्ष्मणचे शतक
नेपियर, ३० मार्च / पीटीआय
अनुभवी व्हीव्हीएस लक्ष्मणने केलेल्या नाबाद १२४ धावांच्या खेळीनंतर पॅव्हेलियनमध्ये हरभजनसिंगने त्याच्या या खेळीला नमस्कार करून पराभवातून संघ बचावल्याचा आनंद साजरा केला. हरभजनची हीच प्रतिक्रिया आज तमाम भारतीयांची होती. पहिल्या डावात गडगडलेला पाहुणा भारतीय संघ सामना वाचवू शकणार नाही, असे ठाम मत अनेकांनी व्यक्त केले होते, पण लक्ष्मणने भारतीय संघ चमत्कार करून दाखविल, असा पक्का विश्वास प्रकट केला होता.

कसोटी गमाविण्याची भीती वाटत नव्हती -सेहवाग
नेपीयर, ३० मार्च / पी. टी. आय.

न्यूझीलंडने भारतावर ‘फॉलोऑन’ लादला त्या वेळी पराभव ‘आ’वासून समोर उभा ठाकला होता; पण बदली कर्णधार वीरेन्द्र सेहवाग किंवा त्याच्या संघ सहकाऱ्यांना मात्र आपण ही कसोटी हरू, अशी अजिबात भीती वाटत नव्हती. पहिल्या डावात आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करण्यात भारतीय फलंदाज अपयशी ठरल्याने न्यूझीलंडला ३१४ धावांची मोठी आघाडी मिळाली होती; पण भारतीय संघाची जबरदस्त फलंदाजीची फळी पाहता अडीच दिवस फलंदाजी करून सामना वाचवू शकतो, असा विश्वास संघाला होता.

मियामी टेनिस : फेडरर, सेरेना, व्हिनस यांची आगेकूच तर साफिना स्पर्धेबाहेर
मियामी, ३० मार्च/ पीटीआय

महिलांमध्ये अमेरिकेच्या सेरेना आणि व्हिनस या व्हिल्यम्स भगिनींनी तर पुरूषांमध्ये दुसऱ्या मानांकित रॉजर फेडररने मियामी टेनिस मास्टर्स स्पर्धेमध्ये आगेकूच केली आहे. तर महिलांमध्ये दुसऱ्या मांनांकित दिनारा साफिनाला स्पर्धेबाहेर पडावे लागले आहे. ऑस्ट्रेलियन ओपनची विजेती ठरलेल्या सेरेना विल्यम्सने आपली विजयी घौडदौड मियामी ओपनमध्येही कायम ठेवली असून तिने या स्पर्धेत चीनच्या पेंग शुआईचा ७-५, ६-२ असा पराभव करून पुढची फेरी गाठली आहे.

पाकिस्तानचे खेळाडू आयसीएलमधून करारमुक्त
कराची, ३० मार्च/ पीटीआय

आंतरराष्ट्रिय क्रिकेट परिषदेसहीत बऱ्याच देशांच्या क्रिकेट मंडळांनी बहिष्कार घातलेल्या इंडियन क्रिकेट लीगने (आयसीएल) पाकिस्तानच्या सर्व खेळाडूंना करारमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीएल या सर्व खेळाडूंना ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देणार असून त्यांच्यासाठी आता राष्ट्रिय संघाचे दरवाजे खुले झाले आहेत. आयसीएलने पाकिस्तानी खेळाडूंना करारमुक्त करायचे ठरविले असून सध्या उर्वरीत मानधन देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या महासंचालकपदी मियॉंदाद
इस्लामाबाद, ३० मार्च/पीटीआय

ज्येष्ठ क्रिकेटपटू व माजी राष्ट्रीय प्रशिक्षक जावेद मियॉंदाद यांची पुन्हा पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मंडळाचे अध्यक्ष इजाज बट्ट यांनी आज येथे ही माहिती दिली. मियॉंदाद यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्यानंतर त्यांनी पुन्हा हे पद स्वीकारण्यास मान्यता दिली असल्याचे बट्ट यांनी सांगितले. मियॉंदाद यांनी जानेवारीत या पदाचा राजीनामा दिला होता. मानधनाबाबत मतभेद झाल्यामुळे आपण हे पद सोडले होते या वृत्ताचे खंडन करीत मियॉंदाद म्हणाले, मानधनाच्या कारणास्तव मी हे पद सोडले नव्हते. मला जी जबाबदारी सोपविण्यात आली होती, त्याबाबत मी समाधानी नव्हतो. पाकिस्तानला क्रिकेटमध्ये पुन्हा गौरवशाली स्थान मिळवून देणे हेच माझे प्रमुख ध्येय असून मी मानधनाचा गांभीर्याने विचार केलेला नाही. देशात पुन्हा आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करण्यासाठी योग्य वातावरण निर्माण करणे व स्थानिक क्रिकेटला अधिक स्पर्धात्मक दर्जा मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मियॉंदाद यांना किती मानधन दिले जाणार आहे हे सांगण्यास नकार देत बट्ट म्हणाले, ही मंडळाची खासगी बाब आहे. ते पुन्हा काम करण्यास तयार झाले हीच आमच्यासाठी महत्वाची व समाधानाची गोष्ट आहे.

फॉलोऑनचा निर्णय योग्यच - व्हेटोरी
नेपियर, ३० मार्च / पीटीआय

भारतीय संघाला पहिल्या डावात झटपट गुंडाळल्यानंतर फॉलोऑन देण्याचा निर्णय चुकीचा नव्हता असे न्यूझीलंडचा कर्णधार डॅनियल व्हेटोरीने सामन्यानंतर बोलताना सांगितले.
आपल्या निर्णयाचे समर्थन करताना व्हेटोरी म्हणाला की, आम्ही दुसऱ्या डावात सेहवागची महत्त्वाची विकेट मिळविली. पण त्यानंतर मात्र भारतीयांनी सावध फलंदाजी केली. जर भारताचे दोन-तीन फलंदाज झटपट बाद करता आले असते तर निकाल आमच्या बाजूनेही लागला असता. गंभीरला बाद केले तेव्हा आम्हाला चांगली संधी चालून आली होती. पण युवराज व लक्ष्मण यांनी टिच्चून फलंदाजी करून आमच्या हातून विजयाची संधी हिरावून घेतली.

धोनीची उद्या फिटनेस चाचणी
नेपियर, ३० मार्च / पीटीआय

पाठीच्या दुखण्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीला मुकलेला भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी येत्या बुधवारी फिटनेस चाचणीला सामोरा जाणार आहे. या चाचणीनंतर तो तिसऱ्या कसोटीत खेळू शकेल अथवा नाही, हे स्पष्ट होईल. वीरेंद्र सेहवागला यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आल्यावर आपल्याला याबाबत काहीही माहिती नाही, मात्र तो फिटनेस चाचणी देणार आहे असे सेहवाग म्हणाला. दुसऱ्या कसोटीपूर्वी धोनी संघाच्या सरावात सामील झाला होता, पण पाठदुखीमुळे त्याने सरावातून माघार घेतली. त्याच दिवशी सेहवागकडे कर्णधारपदाची सूत्रे सोपविण्यात येतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. नाणेफेकीपूर्वी काही तास आधी सेहवागवर नेतृत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली.

नाइट रायडरचा कर्णधार व संघाची दक्षिण आफ्रिकेत घोषणा
कोलकाता, ३० मार्च / पीटीआय

इंडियन प्रीमियर लीगमधील कोलकाता नाइट रायडर्स संघाच्या कर्णधारपदावरून निर्माण झालेल्या वादानंतर लोकक्षोभ टाळण्यासाठी या संघाचा कर्णधार तसेच संघाची घोषणा दक्षिण आफ्रिकेत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.इडन गार्डन स्टेडियमवर झालेल्या सहा दिवसांच्या सराव शिबिरानंतर संघाचे संचालक जॉन बुकॅनन यांनी संघाचा कर्णधार व संघ घोषित करण्यास नकार दर्शविला. या संघात २४ खेळाडू असतील, असे बुकॅनन यांनी जाहीर केले आहे, पण संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉय भट्टाचार्य यांच्या मते २९ खेळाडूंचा संघ असेल.कर्णधाराची घोषणा दक्षिण आफ्रिकेत होणार असली तरी सौरव गांगुलीकडे कर्णधारपद सोपवावे की नाही, याबद्दल अजूनही मतभेद कायम आहेत.

बुद्धिबळ : विक्रमादित्य कांबळे चेस मास्टर
मुंबई, ३० मार्च / क्री. प्र.

विक्रमादित्य कांबळे अस्तित्व संस्कार प्रबोधिनी आयोजित चेस मास्टर झपट बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपदाचा मान मिळविला. नवव्या फेरीअखेर विक्रमादित्य आणि अमरदीप बारटक्के या दोघांचीही गुणसंख्या समसमान म्हणजे ७.५ एवढी झाली; पण प्रोग्रेसिव्ह स्कोअरवर विक्रमादित्यने बाजी मारली. आठव्या फेरीत अमरदीपने विक्रमादित्यला पराभवाचा धक्का दिला होता. मात्र शेवटच्या फेरीत अमरदीपने पंकज जोशीविरुद्धची लढत एकही चाल न खेळता बरोबरीत सोडवून अर्धा गुण घेण्यात धन्यता मानली व त्याचा हाच निर्णय अखेर चुकीचा ठरला. कारण विक्रमादित्यने अंतिम फेरीत प्रसाद घाटेला हरवून एक गुण वसूल केला आणि विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. सदर स्पर्धेत सौम्यरंजन मिश्रा, पंकज जोशी आणि सागर शहा यांना अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. विजेत्या विक्रमादित्यला सदानंद चव्हाण स्मृती चषकासह पाच हजार रुपयांचे रोख पारितोषिक, अमरदीपला सदाशिव वरवडेकर चषक व तीन हजार रुपये रोख तर सौम्यरंजन मिश्राला मोतीराम कासले स्मृती चषक व दोन हजार रुपये रोख पुरस्कार देण्यात आला. ग्रॅन्डमास्टर प्रवीण ठिपसे व द्वारकानाथ संझगिरी यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. आदित्य सिंग (१६ वर्षांखालील), रोहित जाधव (१४ वर्षांखालील), नचिकेत धोन्नार (१२ वर्षांखालील), सुंदर नेमिश (१० वर्षांखालील) हे मुलांमध्ये तर एकिशा बसू, विश्वा शहा, श्रुती जाधव, ध्वनी टांक, अशना माखिजा यांनी मुलींच्या गटांत विजेतेपदाचा मान मिळविला.