Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३१ मार्च २००९

पालिका व पोलिसांमध्ये पुन्हा तू-तू मैं मैं
ठाणे/प्रतिनिधी :
नौपाडा पोलिसांनी थेट पथपद आणि रस्त्यावरच वाहनतळ सुरू केल्यामुळे वाहतूक कोंडीबरोबरच नागरिकांनाही तेथून जाताना त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात पालिकेने पाठवलेल्या पत्रावर आम्हला वाहनतळासाठी पालिकेने जागा दिली तरच तेथून वाहने हलवू अशी आडमुठी भूमिका पोलिसांनी घेतली आहे. तर पोलिसांना जागा देणे ही पालिकेची जबाबदारी नाही, वाहने हलवली नाहीत तर कारवाई करू अशी रोखठोक भूमिका पालिकेने घेतली आहे. सॅटिस प्रकल्पाच्या कंत्राटदाराला पोलिसांनी अटक केल्यानंतर पालिका व पोलिसांची नुकतीच जुंपली होती. त्याचीच पुनरावृत्ती या प्रकरणातही होण्याची चिन्हे आहेत. नौपाडा विभागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल बनत आहे.

एमएमआरडीएच्या निधीचा गैरवापर
बांधकाम विभागाच्या जागेवर ५० लाखांचे अनधिकृत स्वच्छतागृह

सोपान बोंगाणे

मुंबई महानगर क्षेत्रातील सार्वजनिक सुविधांसाठी देण्यात येणारा निधी कोणतेही नियम व शासनाचे आदेश न पाळता मनमानी पद्धतीने खर्च करण्यात येत असल्याचे प्रकरण अंबरनाथ शहरात उघडकीला आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंबरनाथ-बदलापूर या रस्त्याच्या जागेवर अतिक्रमण करून त्यावर सार्वजनिक शौचालय बांधण्याच्या नावाखाली तब्बल ५० लाख रुपयांचा बेकायदेशीर चुराडा केला जात असून, नगरपालिकेला यासंदर्भात नोटीस बजावूनही काम थांबविले जात नसल्याचा आक्षेप घेतला जात आहे.

डोंबिवलीतील रहिवासी वायू प्रदूषणाने हैराण
आंदोलनाचा इशारा, डोंबिवली/प्रतिनिधी

डोंबिवली एमआयडीसी परिसरात गेले १० महिन्यांपासून रात्रीच्या वेळेत डोके भणभणणाऱ्या रसायनांची दुर्गंधी येत असल्याने या भागातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. अनेकांना या रासायिक दुर्गंधीमुळे आजार जडले आहेत. शाळकरी विद्यार्थ्यांना प्रदूषणाचा त्रास होत आहे. वारंवार तक्रारी करूनही त्याची दखल घेण्यात येत नसल्याने ‘मिलापनगर रेसिडेन्ट वेल्फेअर असोसिशन’ आणि ‘सुदर्शननगर निवासी संघा’ने येत्या १५ दिवसांत या वायू प्रदूषणाचा बंदोबस्त करण्यात आला नाहीतर जनआंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिला आहे. या भागातील रहिवाशांनी सांगितले, परदेशात ज्या वस्तू बनविण्यास बंदी आहे, त्या वस्तूंचे उत्पादन करण्याची हमी एमआयडीसीतील काही कंपन्यांनी घेतली असल्याची माहिती मिळत आहे. या उत्पादनामुळे कंपनी मालकाला दामदुप्पट रक्कम मिळत आहे.

संधिसाधूंमुळे इस्लामची विशालता झाकोळली - मुकादम
ठाणे/प्रतिनिधी :
जगात जेथे जेथे ज्ञान आहे, तेथे तेथे जाऊन ते ज्ञान मिळवा, असा आदेश महंमद पैगंबराने कुराणाच्या माध्यमातून मुस्लिम समाजाला दिला आहे, परंतु दुर्दैवाने इस्लामची ज्ञानोपासना बाजूला पडली आणि काही संधीसाधू लोकांनी समाजाला अन्य मार्गाने भरकटवण्याचा प्रयत्न केला. त्यातून इस्लाम धर्माची विशालता झाकोळली गेली, असे रोखठोक प्रतिपादन मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते व विचारवंत अब्दुल कादर मुकादम यांनी ठाण्यात बोलताना केले.

सुखी जीवनासाठी समाजात चंदनासारखे झिजण्याची गरज - डॉ.शरयू शहा
डोंबिवली/प्रतिनिधी

कैलासचंद्र आणि पुष्पलता मेहता यांनी चंदनासारखे झिजून समाजसेवा केली. सुखी जीवनाची ही यशस्वी सूत्री आहे. सुखी जीवनातील स्वप्नांची शिखरे पादाक्रांत करायची असतील तर ऐन उमेदीत सेवाभावीवृत्तीने काम केले पाहिजे. या सेवाकार्यातून निरामय विश्व आणि आत्मिक समाधान मिळते, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका डॉ. शरयू शहा यांनी येथे केले. सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल प्रवीण दुधे यांना कै. कैलासचंद्र मेहता, मतिमंद मुलांसाठी काम करणाऱ्या ‘क्षितिज’ च्या संचालिका, माजी महापौर अनिता दळवी यांना कै. पुष्पलता मेहता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

पालिका मुख्यालयात कचरा टाकल्याप्रकरणी गुन्हे दाखल
ठाणे/प्रतिनिधी

ठाणे महापालिका मुख्यालयाच्या आवारात घनकचरा टाकल्याप्रकरणी शिक्षण मंडळ सदस्य अमित सैरय्या आणि हेमंत वाणी यांच्यासह राष्ट्रवादीच्या ६४ कार्यकर्त्यांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील घनकचरा पालिका उचलत नसल्याने अनेक भागांत कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादीने काल कचऱ्याने भरलेला ट्रक पालिका मुख्यालयाच्या आवारात मोकळा करून आंदोलन केले. याप्रकरणी पालिकेने आज नौपाडा पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. त्यानुसार नौपाडा पोलिसांनी शिक्षण मंडळ सदस्य हेमंत वाणी, अमित सरैय्या यांच्यासह राष्ट्रवादीच्या ६४ कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे, तर आता पोलिसांच्या बंदोबस्तात डायघर येथेही कचरा टाकण्याच्या हालचाली पालिकेने सुरू केल्या आहेत.

‘उन्नती आपल्या हाती’ पुस्तकाचे १० एप्रिलला प्रकाशन
कल्याण/वार्ताहर

महापालिकेच्या विकासकामांचे टेक्निकल ऑडिट केल्यास आर्थिक घोटाळा होणार नाही व कामाचा दर्जा सुधारेल, असा विश्वास कल्याण- डोंबिवली महापालिकेचे माजी शहर अभियंता हिरालाल ओसवाल यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. हिरालाल ओसवाल यांनी व्यावसायिक जीवनातील अनुभवातून जनतेचे प्रश्न सोडविणे कसे शक्य आहे, याविषयीचे अनुभव कथन करणारे ‘उन्नती आपल्या हाती’ हे पुस्तक लिहिले आहे. पुस्तकाचा प्रकाशन सोहळा १० एप्रिलला सकाळी साडेदहा वाजता आचार्य अत्रे रंगमंदिरात अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ‘लोकसत्ता’चे संपादक कुमार केतकर भूषवणार आहेत. या पुस्तकाची प्रस्तावना जलआयोगाचे माजी अध्यक्ष माधवराव चितळे यांनी लिहिली आहे .

टावरेंनी घेतल्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी
काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
बदलापूर/वार्ताहर

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुरेश टावरे रविवारी बदलापूर विधानसभा मतदारसंघात आले, पण काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना भेटण्याऐवजी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी भेटीगाठी घेतल्याने बदलापूरच्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. नव्याने स्थापन झालेल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये बदलापूर- मुरबाड विधानसभा मतदारसंघाचा समावेश करण्यात आला आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या सुरेश टावरे यांना आघाडीची उमेदवारी देण्यात आली. टावरे यांनी अद्यापि उमेदवारी अर्ज भरला नसला तरी विधानसभा मतदारसंघांना भेटी देऊन चाचपणी त्यांनी सुरू केली आहे. रविवारी दुपारपासून रात्रीपर्यंत टावरे यांनी बदलापुरात तळ ठोकला होता. या कालावधीत त्यांनी ब्लॉक काँग्रेस कार्यालयात येऊन ब्लॉक अध्यक्ष तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करणे टाळले. यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. बऱ्याच म्हणजे सुमारे १० वर्षांच्या कालावधीनंतर काँग्रेसचा पंजा निशाणी असलेला उमेदवार टावरे यांच्यामुळे पूर्वीच्या अंबरनाथ आणि आता नव्याने निर्माण झालेल्या मुरबाड विधानसभा मतदारसंघाला मिळाला आहे, असे असताना टावरे यांनी काँग्रेसच्याच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नाही आणि कायम सापत्नपणाची वागणूक देणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली, हे अयोग्य असून यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे माजी ब्लॉक अध्यक्ष आणि विद्यमान जिल्हा उपाध्यक्ष शंकर भोईर यांनी सांगितले.