Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३१ मार्च २००९
व्यक्तिवेध

‘विज्ञानपट म्हणून मूर्ख, अवास्तव कल्पना राबवणाऱ्या चित्रपटांचा मला उबग आला आहे. ‘विज्ञानपट’ हे ठोस वैज्ञानिक तत्त्वांच्या वास्तवावरच आधारलेले असायला हवेत.’ असे मत व्यक्त करीत हॉलीवूड अभिनेता डस्टिन हॉफमन एका नव्या मोहिमेचे नेतृत्व करतो आहे. हॉलिवूडमध्ये विज्ञान-काल्पनिकांची अक्षरश: दाटी झालेली आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. मानवी प्रगतीच्या इतिहासात विज्ञानाच्या साहाय्याने घडवता आलेल्या ‘चमत्कारां’मुळे शास्त्रज्ञांचाच उत्साह शतगुणित झाला असे नव्हे, तर

 

कल्पनाजीवी कलावंत-लेखकांनाही धुमारे फुटत गेले. वैज्ञानिक प्रयोगांचा टेकू दिला की, त्या कल्पना प्रेक्षकांना भारदस्त वाटू लागतात; खऱ्या वाटू लागतात; मग ते वैज्ञानिक प्रयोग हीदेखील कलावंताची कल्पना का असेना! कधी ही कल्पना अवकाशात भ्रमण करते, कधी पृथ्वीच्या गाभ्यात पोहोचते, कधी प्राणी आणि वनस्पतीसृष्टीला हवे ते आकार देते, तर कधी माणसालाच प्रयोगशाळेच्या साच्यात घालून अ-मानवी करून बाहेर काढते. मनोरंजक कथा सादर करायला डस्टिन हॉफमनची ना नाही; पण त्यासाठी विज्ञानाच्या नावावर होणारा खोटारडेपणा थांबला पाहिजे, असे त्याचे म्हणणे. जिथे वैज्ञानिक वास्तवाची बूज राखून कथा सांगितली जाते, तिथे त्याचा कोणताही आक्षेप नाही. उदाहरणार्थ स्पीलबर्गचा ‘ज्युरासिक पार्क!’ डीएनएचे स्पष्टीकरण देणारा हा विज्ञानपट आहे. या उलट माणसे जिथे यान थेट पृथ्वीच्या गाभ्यात नेतात, अशा ‘द कोअर’वर मात्र सडकून टीका करण्यात आलेली आहे. वॉशिंग्टनमधल्या नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसतर्फे ‘सायन्स अ‍ॅण्ड एण्टरटेनमेंट एक्स्चेंज’ नावाचा एक गट या विचाराचा पाठपुरावा करण्यासाठी स्थापन झालेला आहे आणि चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्यापूर्वी मॅक्सवेल हाऊस कॉफी कंपनीत केमिस्टची नोकरी करणारा, आजचा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अभिनेता डस्टिन हॉफमन या गटाचे नेतृत्व करतो आहे. स्वत: हॉफमनदेखील ‘स्फियर’ या विज्ञान- काल्पनिकेत यापूर्वी भूमिका केलेली आहे. १९८८ च्या ‘रेनमेन’ या चित्रपटात त्याने साकारलेल्या ऑटिस्टिक व्यक्तिरेखेला मानसशास्त्रीय आधार आहे. किंबहुना, गेली चार दशके हॉलिवूडमध्ये सक्रिय असलेल्या डस्टिन हॉफमनचा बोलबाला आहे तोच मुळी गुंतागुंतीच्या, साच्याबाहेरच्या व्यक्तिरेखा साकारणारा धाडसी अभिनेता म्हणून. (आणि दिग्दर्शकांच्या नाकीनऊ आणणारा अभिनेता म्हणूनही!) त्याचा जन्म लॉस एंजेलिसमधलाच. १९३७ चा. प्रथम त्याला डॉक्टर व्हायचे होते, पण मग तो अभिनयाकडे वळला. दरम्यानच्या काळात केमिस्टची नोकरी केली, टीव्हीवर, नाटकांतून कामे करत राहिला. ली स्ट्रासबर्गच्या ‘अ‍ॅक्टर्स स्टुडिओ’मध्ये त्याने प्रशिक्षण घेतले. ‘वेटिंग फॉर गोदो’, ‘द डम्बवेटर’ अशा प्रसिद्ध नाटकांतून तो चमकला. लोकप्रिय चित्रपट अभिनेता झाल्यानंतरही त्याने ‘डेथ ऑफ अ सेल्समन’ या नाटकात भूमिका केली. १९६७ मध्ये माइक निकोल्स दिग्दर्शित ‘ग्रॅज्युएट’मधल्या भूमिकेने हॉलिवूडमध्ये डस्टिन हॉफमनच्या आगमनाची द्वाही फिरवली. ‘ग्रॅज्युएट’मधल्या कॉलेज विद्यार्थ्यांच्या त्याच्या भूमिकेसाठी ऑस्कर नामांकन मिळाले आणि तरुण वर्गात लोकप्रियताही! ‘मिडनाइट काउबॉय’ने पुन्हा एकदा ऑस्कर नामांकन मिळवले. ‘पापिलॉन’मधला कैदी, ‘ऑल द प्रेसिडेंट्स मेन’मधला वार्ताहर कार्ल बर्नस्टीन गाजले. ‘क्रेमर व्हर्सस क्रेमर’ आणि ‘रेनमन’ या दोन चित्रपटांनी त्याला सवरेत्कृष्ट अभिनेत्याचे ऑस्कर पुरस्कार मिळवून दिले. हॉफमनच्या खात्यावर अत्यंत यशस्वी आणि अतिशय अपयशी असे दोन्ही प्रकारचे चित्रपट जमा आहेत. चित्रपटाने निराशा केली की तो मध्येच चित्रपटसृष्टीतून ‘ब्रेक’ घेऊन नाटकातून कामे करतो, टीव्ही कार्यक्रम करतो, ९० च्या दशकात सुरुवातीला असाच तो गायब झाला आणि मग १९९६ मध्ये पुन्हा ‘आउटब्रेक’, ‘मॅड सिटी’, स्फिअर’ वगैरे चित्रपटांतून झळकला. डस्टिन हॉफमन हा कसदार भूमिकांच्या शोधात असणारा अभिनेता आहे. म्हणूनच विज्ञानपटांसंबंधात त्याने हाती घेतलेल्या मोहिमेला वजन प्राप्त होते. ही मोहीम कितपत यशस्वी होते आणि हॉलिवूडमधल्या मूर्ख विज्ञान काल्पनिकांची गर्दी कुठवर हटते, ते पाहू!