Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३१ मार्च २००९

निवडणुकीवर बहिष्काराचे नक्षलवाद्यांचे आवाहन
१० एप्रिलला गडचिरोली, चंद्रपूर व गोंदिया बंद

चंद्रपूर, ३० मार्च/ प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन नक्षलवाद्यांनी केले असून पोलिसांनी निरपराध आदिवासींवरील अत्याचाराच्या निषेधार्थ १० एप्रिलला गडचिरोली, चंद्रपूर व गोंदिया बंदचे आवाहन केले आहे. नक्षलवाद्यांच्या सीपीआय माओवादी संघटनेच्यावतीने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करणारी पत्रके आज गडचिरोली व चंद्रपूर जिल्हय़ात ठिकठिकाणी आढळून आली. आलापल्ली ते सिरोंचा मार्गावर उमानूर जवळ सुमारे एक किलोमीटरच्या परिसरात रस्त्यावर तसेच काही फलकांवर नक्षलवाद्यांनी लिहिलेला मजकूर आढळून आला.

राहुल गांधींची सभा वर्धेत ठरल्याने ‘निष्ठावंत’ अचंबित
वर्धा, ३० मार्च / प्रतिनिधी

निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पहिल्याच दौऱ्यात विदर्भातील एकमेव प्रचारसभा खासदार राहुल गांधी यांनी वर्धेतील उमेदवार दत्ता मेघे यांना दिल्याने राजकीय वर्तुळ कमालीचे स्तंभित झाले आहे. चाळीस वर्षांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ असल्याचा दावा करणाऱ्यांचा, चार महिन्यांपूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश क रून लोकसभेची उमेदवारी पटकावणाऱ्या दत्ता मेघेंना जाहीर विरोध होता. मेघेंची पाठराखण करणाऱ्या विलासराव देशमुख यांच्यापेक्षा पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आमच्या पाठीशी असल्याचे व आमचीच उमेदवारी पक्की असल्याचे स्पर्धेतील मेघे विरोधक सांगत.

भाजपच्या मतांमध्ये सातत्याने वाढ
चंद्रपूर, ३० मार्च / प्रतिनिधी

एकेकाळी काँग्रेसचा गड राहिलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे मताधिक्य सरासरी ३० टक्क्यांनी वाढले आहे. आजवरच्या लोकसभा निवडणुकांमध्ये तब्बल बारा वेळा काँग्रेसच्या बाजूने कौल देणारा हा बालेकिल्ला भाजपने १९८४ पासून पोखरायला सुरुवात केली. १९८४ च्या निवडणुकीत केवळ ६० हजार मते घेणाऱ्या भाजपची झेप २००४ साली ३ लाख ६६ हजार मतांवर गेली. याउलट १९९८ च्या निवडणुकीत साडेचार लाख मते घेणाऱ्या काँग्रेसने २००४ मध्ये केवळ ३ लाख ६ हजार मते घेतली. याचा अर्थ भाजपच्या मतांची टक्केवारी सातत्याने वाढत आहे.

महिला व तरुणांची भावना गवळींना साथ
यवतमाळ, ३० मार्च / वार्ताहर

काँग्रेसची उमेदवारी भाजपातून निष्कासित होऊन काँग्रेसमध्ये आलेल्या हरिभाऊ राठोड यांना मिळाली आहे. मात्र, काँग्रेस नेत्यांनीच त्यांच्या प्रचारचक्राची गती थांबविली आहे. याउलट महिला आणि युवक वर्ग मोठय़ा प्रमाणात सेना उमेदवार भावना गवळींच्या विजयाचे श्रेय बनणार असल्याचा दावा सेना नेते करीत आहेत. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी हरिभाऊंना ‘दमाने घ्या’, असा सल्ला दिला आहे. याच गोष्टीचा फायदा घेऊन सेनेच्या भावना गवळींनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच प्रचाराचा धडाका सुरू केला.

तेलगू रणधुमाळीत मराठी टक्का!
देवेंद्र गावंडे, चंद्रपूर, ३० मार्च

लगतच्या आंध्रप्रदेशात काँग्रेसच्या विरोधात स्थापन झालेल्या महाआघाडीने पेद्दापल्ली लोकसभा मतदारसंघातून एक मराठी भाषक तरुण कंत्राटदार श्रीनिवास गोमासे यांना उमेदवारी दिली आहे. मराठी तरुणाला तेलगू अस्मितेचे हे आव्हान कितपत पेलते, हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. श्रीनिवास गोमासे यांचा जन्म आंध्रप्रदेशातील गुडूर या गावचा. हे गाव महाराष्ट्र राज्याचे शेवटचे टोक असलेल्या सिरोंचापासून अगदी जवळ आहे. गोमासे यांचे बहुतेक नातेवाईक सिरोंचा तालुक्यात राहतात.

पोलिसांवर हल्ला; ११ दरोडेखोरांना अटक
अकोला, ३० मार्च/प्रतिनिधी

कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला करणाऱ्या ४५ दरोडेखोरांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून ११ दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्य़ातील मालठाणा येथे शनिवारी रात्री ही घटना घडली होती. मूर्तीजापूर तालुक्यातील सोनेरी शिवारातील ६० हजारांच्या दरोडय़ाचे धागेदोरे बुलढाणा जिल्ह्य़ातील मालठाणा येथील पारधी समाजाच्या वस्तीशी जुळत असल्याची माहिती अकोला पोलिसांना मिळाली होती. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा आणि मूर्तीजापूर पोलिसांचे पथक दरोडेखोरांना पकडण्यासाठी शनिवारी रात्री मालठाणा येथे पोहोचले होते. दरोडेखोरांना पकडण्यापूर्वीच त्यांच्यावर चहूबाजूंनी दरोडेखोरांनी हल्ला केला होता. दरोडेखोरांनी केलेल्या दगडफेकीत १२ पोलीस जखमी झाले होते, त्यापैकी दोघांना जास्त मारला होता. याप्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी दरोडेखोरांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये संकेत भोसले, जुगल भोसले, सागर भोसले, जुगनू भोसले, राहूल भोसले, वंदू पवार, सुकन्या पवार, कामिनी भोसले, ज्योती भोसले, राजकन्या पवार, चंदा पवार यांचा समावेश आहे. या घटनेतील मुख्य सूत्रधार दीपक पवार पसार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

तुमसर तालुक्यात सात हजारावर मतदार ओळखपत्रांपासून वंचित
तुमसर, ३० मार्च / वार्ताहर

तुमसर तालुक्यातील सात हजारावर मतदार ओळखपत्रांसाठी तहसील कार्यालयात पायपीट करीत आहेत. परंतु, त्यांना समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याचे सांगण्यात आले. निवडणूक ओळखपत्र तयार करून देण्याचे कंत्राट गोंदिया येथील हरीश बजाज यांना आहे. परंतु, ते समाधानकारक काम करत नसल्यामुळे मतदारांच्या तक्रारी वाढल्या आहेत. कंत्राटदार बजाज यांना तीन पत्रे देऊनही त्यांनी त्यांच्या कामात सुधारणा केली नाही व मतदारांना ओळखपत्रे पुरवण्याच्या कामी हयगय चालवली असल्याचे तहसील निवडणूक कार्यालयात समजले. कंत्राटदार बजाज यांच्या असमाधानकारक कामाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात आले असले तरी जिल्हा निवडणूक कार्यालय गप्प बसले आहे. नवीन ओळखपत्र तयार करणे, ओळखपत्रात दुरुस्ती, चुकीच्या फोटोत फेरफार करणे यासारखी सुमारे ७ हजार मतदारांची कामे खोळंबून पडली आहेत. मतदानापूर्वी या सर्वाना ओळखपत्रे मिळणे आवश्यक आहे. उत्तरे नीट मिळत नाहीत, कंत्राटदार लक्ष देत नाही, अशा स्थितीत ७ हजार मतदार मतदानापासून वंचित राहू शकतात. उमेदवार प्रचारात आहेत, तर अधिकारी लक्ष देत नाहीत. वरिष्ठांनी दुर्लक्ष केले. तेथे आलेल्या एका मतदाराने शेवटी उपोषणाला बसण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आता ओळखपत्रासाठी उपोषण किंवा आंदोलन करण्याची गरज आहे काय, असे मतदार विचारत आहेत.

वसंता जिनिंगच्या कामगारांची वेतनवाढीची मागणी
यवतमाळ, ३० मार्च / वार्ताहर

राळेगावच्या वसंत सहकारी जिनिंग प्रेसिंग संस्थेत कामगारांची आर्थिक पिळवणूक करण्यात येत असल्याची तक्रार शिवसेनेचे जिल्हा कार्यालय सचिव प्रमोद जाठे यांनी कामगार अधिकारी जयस्वाल यांच्याकडे केली आहे. महिला कामगारांना त्वरित न्याय मिळवून देण्याची मागणीही त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. वसंत सहकारी जिनिंग प्रेसिंग संस्थेत हंगामी कामगार आहेत. संस्थेने गेल्या चार- पाच हंगामातील शासनाकडून ठरविण्यात आलेली अजूनपर्यंत हंगामी महिला कामगारांना दिलेली नाही. अनेकवेळा संस्थेला या वेतनवाढीसंबंधी विनंती अर्ज, निवेदने दिली गेली; परंतु संस्थेने महिला कामगारांना उडवाउडवीची उत्तरे देऊन वेतनवाढीस टाळाटाळ केली. अखेर त्रस्त कामगारांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली जिल्हा कामगार कार्यालयात धडक देऊन अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. याप्रसंगी शिवसेनेचे प्रमोद जाठे, मालु मडावी, सत्यभामा जुमनाके, शांता उईके, बेबी होले, इंदू टेकाम, सुनीता खिरटकर, कैलाश अवसरमल, पुष्पा ठाकरे, मंदा कालान्द्रे, नंदा कोल्हे, सुशीला कावळे, दिलीप मोरे, सुमन शिवरकर, दुर्गा भालेराव, सुशीला कावळे, माया आवारी, कविता काळे, लता कोमटे, सुमन कोदाने, कविता काळे, कमल कुंभारे उपस्थित होत्या, अशी माहिती सेनेचे दिलीप मोरे यांनी दिली.

चंद्रपूर, बल्लारपूर रेल्वेस्थानकाच्या विकासाची मागणी
बल्लारपूर, ३० मार्च / वार्ताहर

चंद्रपूर व बल्लारपूर रेल्वेस्थानकावरील गैरसोयी दूर करून या स्थानकांचा विकास करण्याची मागणी विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य श्रीनिवास सुंचूवार यांनी केली आहे. श्रीनिवास सुंचूवार यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक मुद्गल यांच्याशी याबाबत चर्चा करून मागण्यांचे निवेदन सादर केले. या दोन्ही रेल्वेस्थानकावरील स्वच्छतेचे कंत्राट फेब्रुवारी ०९ मध्ये समाप्त झाल्याने फलाटांवर अस्वच्छता दिसत आहे. रेल्वे प्रवाशांच्या आरोग्यास यामुळे धोका निर्माण झाला आहे. गोरखपूर-यशवंतपूर व यशवंतपूर-गोरखपूर, चेन्नई-वाराणसी व वापसी रेल्वेगाडी यांना बल्लारपूर रेल्वेस्थानकावर २० मिनिटांचा थांबा असूनही आरक्षण तिकीट मात्र चंद्रपूरवरूनच प्राप्त होते. बल्लारपूर हे ‘अ’ श्रेणीचे रेल्वेस्थानक असल्याने तेथून देखील हे आरक्षण प्राप्त व्हावे, बल्लारपूर रेल्वेस्थानकावरील महिला व पुरुषांचे उच्चश्रेणी व द्वितीय श्रेणी प्रतीक्षालयांचे विस्तारीकरण करावे. शौचालये व प्रसाधनगृहांची निर्मिती करावी, आंध्रप्रदेश एक्स्प्रेसला चंद्रपूर रेल्वेस्थानकावर आरक्षणाची सुविधा मिळावी, आदी मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. लवकरच या समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन रेल्वे व्यवस्थापकांनी दिल्याचा दावा सुंचूवार यांनी केला आहे.