Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३१ मार्च २००९
विविध

मनमोहनसिंग-ओबामा यांच्या गुरुवारी होणाऱ्या भेटीकडे साऱ्यांचे लक्ष
नवी दिल्ली, ३० मार्च/वृत्तसंस्था

जी-२० देशांच्या बैठकीच्या पाश्र्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा व पंतप्रधान मनमोहनसिंग यांची लंडन येथे येत्या गुरुवारी प्रथमच भेट होणार आहे. अमेरिकेचे आर्थिक धोरण, तसेच अफगाणिस्तान व पाकिस्तानसंदर्भातील अमेरिकेचे धोरण या मुद्दय़ांवर ओबामा-मनमोहनसिंग भेटीत प्रामुख्याने चर्चा होईल, असे सांगण्यात आले. भारतात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर विद्यमान सरकारचे प्रमुख म्हणून पंतप्रधान मनमोहनसिंग यांची एखाद्या राष्ट्रप्रमुखाशी होणारी ही शेवटची भेट आहे.

नेपाळच्या शाही हत्याकांडाचे मूळ फसलेल्या शस्त्रास्त्र सौद्यात?
काठमांडू, ३० मार्च/पी.टी.आय.
गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या आणि भारताशी सौहार्दाचे संबंध असणाऱ्या नेपाळच्या राजघराण्यात २००१ साली भीषण हत्याकांड घडले. राजपुत्र दीपेन्द्र याने दारुच्या नशेत हे हत्याकांड केल्याचे अधिकृतपणे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात शस्त्रास्त्रांच्या खरेदीचा फसलेला सौदा यामागे असावा, असा आरोप नेपाळचे माजी नरेश राजे ज्ञानेंद्र यांचा पुत्र पारस याने केला आहे. या हत्याकांडाच्या वेळी दीपेन्द्रने मद्यपान केलेले नव्हते, असेही पारसने म्हटले आहे.

राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचा दुरूपयोग वरुणसह देशालाही घातक- मनेका गांधी
बरेली, (उत्तर प्रदेश), ३० मार्च/ पीटीआय

वरुण गांधीवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांर्तगत कारवाई करणे म्हणजे या गंभीर स्वरूपाच्या कायद्याचा दुरूपयोग करण्यासारखे असून, अशी कृती वरुणसह देशासाठी घातक ठरू शकते. या कायद्यांतर्गत कारवाई करून सरकारने वरुणसह देशावरही अन्याय केला असल्याचे भाजपच्या खासदार मनेका गांधी यांनी बरेली येथे वरुणची न्यायालयीन कोठडीत भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे. मनेका गांधी म्हणाल्या की, वरुणसंबंधीची ही लढाई आपण न्यायालयाबरोबरच जनतेच्या दरबारातही लढणार आहोत. कॉंग्रेस आणि बहुजन समाज पक्षात मतांसाठी संघर्ष सुरू आहे. कारण केंद्रात कॉंग्रेसचे सरकार; तर उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाची सत्ता आहे. वरुणने झाल्या घटनांबद्दल शांततेने शरणागती पत्करली होती. परंतु त्यानंतर वरिष्ठाच्या दबावाखाली येऊन प्रशासनाने त्याच्यावर विनाकारण कारवाई केल्याचा आरोप त्यांनी केला. शनिवारी दुपारी १ वाजून २५ मिनिटांनी त्याने शरणागती पत्करली आणि त्याच्याविरुद्ध दुपारी ३ वाजता खटले दाखल करण्यात आले.हे खटले केवळ वरुणवरच नाही तर त्याच्याबरोबर उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांवरही दाखल करण्यात आले आहेत, असेही त्या म्हणाल्या.
म. प्र. व छत्तीसगडमध्ये वरुणला प्रचारासाठी बोलावणार नाही - स्वराज
भोपाळ - मध्य प्रदेशातील निवडणूक प्रचारात वरुण गांधींना भाजप सहभागी करून घेणार नाही, असे भाजपच्या म. प्र., झारखंड, छत्तीसगड लोकसभा निवडणूकप्रमुख सुषमा स्वराज यांनी आज येथे सांगितले.भाजपच्या मध्य प्रदेश, झारखंड व छत्तीसगड या तीन राज्यांच्या लोकसभा निवडणूक प्रचारासंदर्भात या राज्यांच्या नेत्यांशी आणि पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची एक बैठक काल रात्री पार पडली. या तिन्ही राज्यांतून वरुण गांधी यांना निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याची मागणी नाही आणि मतांचे ध्रुवीकरण टाळण्याच्या दृष्टीने प्रचारातही त्यांना सहभागी करून घेण्यास कोणी राजी नसल्याचे या बैठकीत स्पष्ट झाल्याचे स्वराज म्हणाल्या.

‘वरूणची राजकीय प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न’
चेन्नई, ३० मार्च/पीटीआय

भाजपचे नेते वरुण गांधी यांच्या अटकेचा निषेध करून विश्व हिंदू परिषदेने आज म्हटले आहे, की एका धडाडीच्या तरुण नेतृत्वाची राजकीय प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष एस. वेदान्तम यांनी या संदर्भात म्हटले आहे, की वरुण गांधी हे सुशिक्षित व विचारी नेते आहेत. त्यांच्या भाषणाची प्रत आपण पाहिली आहे. त्यांच्या भाषणाची म्हणून जी प्रत दाखविली जाते ते भाषण त्यांचे नाही. त्यांचे राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांना बदनाम करण्यासाठी हा खेळ रचला गेला आहे. जो पक्ष हिंदूंचे हितरक्षण करील त्या पक्षाला पाठिंबा देण्याचे आदेश विहिंपने जनतेला दिले आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाला म्हणून विहिंपचा पाठिंबा असणार नाही, असेही विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष एस. वेदान्तम त्यांनी आज वार्ताहरांना सांगितले.