Leading International Marathi News Daily
बुधवार, १ एप्रिल २००९

मुन्नाभाईची नेतागिरी कोर्टाला अमान्य
नवी दिल्ली, ३१ मार्च/खास प्रतिनिधी
‘मुन्नाभाई’ संजय दत्तची रुपेरी पडद्यावरची यशस्वी ‘गांधीगिरी’ आज प्रत्यक्षात निष्प्रभ ठरली. लोकसभा निवडणूक लढण्यासाठी संजय दत्तने केलेल्या याचिकेला आज सर्वोच्च न्यायालयाने ‘मान्यता’ नाकारली. लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या लखनौ मतदारसंघात तळ ठोकून बसलेल्या संजय दत्तची याचिका फेटाळून समाजवादी पार्टीच्या मनसुब्यांना आज सर्वोच्च न्यायालयाने जबरदस्त धक्का दिला. मुंबईत १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेदरम्यान बेकायदेशीर शस्त्रास्त्रे बाळगल्याबद्दल संजय दत्तला टाडा न्यायालयाने सुनावलेली सहा वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास आज सरन्यायाधीश के. जी. बालकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली न्या. पी. सताशिवन आणि न्या. आर. एम. लोघ यांच्या पीठाने नकार दिला.

गोविंदाच्या जागी संजय निरुपम;
गुरुदास कामत वायव्य मुंबईतून
नवी दिल्ली, ३१ मार्च/खास प्रतिनिधी
गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेल्या रस्सीखेचीनंतर आज रात्री काँग्रेसने राज्यातील पाच लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली. वायव्य मुंबईतून खासदार गुरुदास कामत यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर उत्तर मुंबईतून माजी खासदार संजय निरुपम लढणार आहेत. सांगलीत विद्यमान खासदार प्रतीक पाटील यांनाच कायम राखण्यात आले आहे. औरंगाबादमध्ये उत्तमसिंह पवार यांना तिकीट देण्यात आले आहे, तर जालना मतदारसंघातून आमदार डॉ. कल्याण काळे यांना रिंगणात उतरविण्यात आले आहे.

पवारांकडे स्वत:चे वाहन नाही; तर शिंदेंकडे जुनी फियाट
सोलापूर, ३१ मार्च/प्रतिनिधी

केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कौटुंबिक मालमत्ता जवळ जवळ सारखीच म्हणजे ८ कोटी ७० लाखांपर्यंत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र पवार व त्यांच्या कुटुंबीयांकडे एकही वाहन नसल्याची नोंद करण्यात आली आहे. पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करताना स्वत:सह पत्नी प्रतिभा पवार आणि हिंदू अविभक्त कुटुंब यांची एकूण मालमत्ता ८ कोटी ७० लाख ७३ हजार ८१२ इतकी दाखविली आहे.

चिथावणीखोर विरोधकांना जागा दाखवा - राहुल गांधी
नांदेड, ३१ मार्च/वार्ताहर

निवडणुकीच्या तोंडावर देशात ‘वाटणी’ची चिथावणीखोर भाषा करणाऱ्या विरोधकांना त्यांची जागा दाखवून गरिबांच्या हितासाठी विविध योजना राबविणाऱ्या काँग्रेसच्या मागे आपली शक्ती उभी करा, असे आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस व खासदार राहुल गांधी यांनी आज केले. लोकसभेच्या नांदेड मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आमदार भास्करराव पाटील-खतगावकर यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत श्री. गांधी बोलत होते. मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, उमेदवार भास्करराव पाटील, माजी खासदार गंगाधरराव कुंटूरकर या वेळी उपस्थित होते.

शरद पवारांविरुद्ध सत्प्रवृत्तांचे उमेदवारही रिंगणात
अजित गोगटे
मुंबई, ३१ मार्च

लोकसभा निवडणुकीतील दोन्ही सत्ताकांक्षी आघाडय़ांमधील घटकपक्षांमध्ये आपसात संशयाचे दाट धुके पसरविण्यास कारणीभूत ठरलेल्या ‘मराठी पंतप्रधान हवा’ या प्रचाराचा केंद्रिबदू असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना त्यांनी ‘सुरक्षित’ म्हणून निवडलेल्या माढा या मतदारसंघात मुख्य राजकीय प्रतिस्पध्र्याखेरीज समाजातील सत्प्रवृत्तींचे प्रतिनिधी म्हणून िरगणात उतरलेल्या उमेदवारांशीही सामना करावा लागणार आहे.

पत्रकार व्यंकटेश चपळगावकर यांचे अपघाती निधन
पुणे, ३१ मार्च / प्रतिनिधी

‘स्टार माझा’ या वृत्तवाहिनीचे पुणे ब्यूरो चीफ व्यंकटेश पद्माकर चपळगावकर (वय ३८) यांचे काल रात्री अपघाती निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी रुपा व परम आणि वीर ही दोन मुले असा परिवार आहे. सोलापूर जिल्ह्य़ातील माढा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार होते. त्याचे वृत्तांकन करण्यासाठी चपळगावकर आपल्या सहकाऱ्यांसमवेत काल सायंकाळी सोलापूरला निघाले होते. सोलापूरच्या अलीकडे मोहोळजवळ सावळेश्वर वाडी येथे रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांची मोटार पुलावरून खाली कोसळली. त्यामध्ये चपळगावकर जागीच मरण पावले, तर मोटारीचे चालक विजय सोपान ऊर्फ बाळासाहेब कांबळे (वय २६) व कॅमेरामन राजेश जयराम बिडकर (वय २४) हे गंभीर जखमी झाले. उपचार सुरू असताना कांबळे यांचे निधन झाले. बिडकर यांच्यावर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. हसतमुख व्यक्तिमत्त्व, उमदा स्वभाव, न कंटाळता सातत्याने काम करण्याची वृत्ती यामुळे पत्रकारिताच नव्हे तर अनेक क्षेत्रातही ते लोकप्रिय होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच केवळ पत्रकारिताच नव्हे तर अनेक क्षेत्रातील व्यक्तींनी हळहळ व्यक्त केली. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष धनंजय जाधव यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

राज्यातील विजेचे भारनियमन एक तासाने कमी होणार?
मुंबई, ३१ मार्च / प्रतिनिधी

दाभोळ प्रकल्पातील वीजनिर्मिती संचांच्या देखभालीबाबत जीई कंपनीने करार करण्याची तयारी दर्शविल्याने पुढील आठवडय़ापासून या प्रकल्पातून ३०० ते ३५० मेगावॅ़ट वीज उपलब्ध होऊन राज्यातील भारनियमन आणखी जवळपास एका तासाने कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सदर प्रकल्पातून राज्याला ६०० मेगाव्ॉट वीज मिळते. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून पहिले युनिट बंद पडल्याने राज्याच्या ग्रीडमध्ये ३२० मेगावॅ़ट विजेची कमतरता भासत होती. सदर संच बिघाड निर्माण झाल्याने वारंवार बंद पडत होते आणि त्याला विम्याचे संरक्षण नसल्याने त्यांची दुरुस्ती वेळेत होत नव्हती. या संदर्भात जीई कंपनीसोबत केंद्र आणि राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चर्चा केली.सदर संच वारंवार बंद पडत असल्याने आणि त्यांच्या दुरुस्तीसाठी ते सिंगापूरला पाठवावे लागत असल्याने त्यासाठी ५० ते २०० कोटी रुपये इतका खर्च येत असे. त्यामुळे त्याला विम्याचे संरक्षणही मिळत नव्हते. मात्र आता केंद्र आणि राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चर्चा केल्यानंतर जीई कंपनीने दुरुस्तीबाबतचा करार करण्याची तयारी दर्शविल्याने या संचांना विम्याचे संरक्षण मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे संचात बिघाड झाल्यास त्याची जबाबदारी जीई कंपनीला स्वीकारावी लागणार आहे. आता जीई कंपनी पुढील आठवडय़ात दुरुस्ती करार करणार असल्याने या संचातून ३०० ते ३५० मेगाव्ॉट वीज उपलब्ध होऊन राज्यातील विजेचे भारनियमन जवळपास एका तासाने कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात राज्यातील जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. सध्या राज्यात विजेची मागणी १५ हजार मेगावॅ़ट इतकी असून त्या तुलनेत उपलब्धता ११ हजार मेगावॅ़ट इतकी आहे.

अमेरिकेत भारतीय सॉफ्टवेअर तज्ज्ञाने केली आपल्या दोन मुलांसह पाच जणांची हत्या
सिलिकॉन व्हॅली, उदगमंडलम, ३१ मार्च/पीटीआय
मुळचा तामिळनाडूचा रहिवासी असलेल्या भारतीय सॉफ्टवेअर तज्ज्ञाने अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली येथे गेल्या २९ मार्च रोजी रात्री स्वत:ची दोन मुले व तीन नातेवाईकांचा बंदुकीतून गोळ्या झाडून खून केला. त्यात एका अर्भकाचाही समावेश आहे. देवराज असे या सॉफ्टवेअर तज्ज्ञाचे नाव असून त्याने आपल्या पत्नीवरही गोळ्या झाडल्या होत्या. ती गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. त्यानंतर देवराजने स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. देवराजने केलेल्या गोळीबारामध्ये त्याचा मेव्हणा अशोकन व अशोकनची पत्नी सुचित्रा व मुलगी अखिला हे तिघेही ठार झाले. अशोकन हे आपली बहिण सुचित्रा व मेव्हणा देवराज यांच्या सिलिकॉन व्हॅली येथील घरी वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहाण्यासाठी आले होते. यावेळी अशोकन यांनी घराच्या बांधकामाबाबत काढलेले कुत्सित उद्गार सहन न होऊन देवराजने अशोकन, त्याची पत्नी व मुलगी यांना ठार केले. त्यानंतर देवराजने स्वत:चा लहान मुलगा अखिल (वय अकरा महिने) व मुलगी स्नेहा (५ वर्षे) व पत्नी आभा यांच्यावरही गोळ्या झाडल्या. या गोळीबारात देवराजची दोन्ही मुले मरण पावली. देवराजची पत्नी आभा गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती चिंताजनक आहे. या भीषण घटनेत ठार झालेले सर्वजण हे तामिळनाडूतील निलगिरी जिल्ह्यातील उदगमंडलम येथील मुळ रहिवासी आहेत.

अपघातात २४ भाविक ठार
आनंदपूर साहिब, ३१ मार्च/पी.टी.आय.
हिमाचल प्रदेशात असणाऱ्या नैना देवी मंदिरातून दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांना घेऊन जाणाऱ्या ट्रकला येथील झाज्जिहार गावात पहाटे झालेल्या अपघातात २४ ठार, तर ७५ जण जखमी झाले. सर्व भाविक लुधियाना जिल्ह्यातील माचिवारा शहरातील नागरिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या ट्रकमध्ये महिला, मुलांसह एकूण १०५ भाविक होते. आगामी नवरात्र उत्त्सवाचा भाग म्हणून सोमवारी देवीचे दर्शन घेऊन हे भाविक परतत होते. भाविकांना घेऊन जाणारा ट्रक भरधाव वेगाने जात असताना त्याने दुसऱ्या एका ‘डबल डेकर’ ट्रकला दिलेल्या धडकेमुळे हा अपघात झाला. यात २१ जण जागीच ठार झाले.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.


प्रत्येक शुक्रवारी