Leading International Marathi News Daily
बुधवार, १ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

शरद पवारांविरुद्ध सत्प्रवृत्तांचे उमेदवारही रिंगणात
अजित गोगटे
मुंबई, ३१ मार्च

 

लोकसभा निवडणुकीतील दोन्ही सत्ताकांक्षी आघाडय़ांमधील घटकपक्षांमध्ये आपसात संशयाचे दाट धुके पसरविण्यास कारणीभूत ठरलेल्या ‘मराठी पंतप्रधान हवा’ या प्रचाराचा केंद्रिबदू असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना त्यांनी ‘सुरक्षित’ म्हणून निवडलेल्या माढा या मतदारसंघात मुख्य राजकीय प्रतिस्पध्र्याखेरीज समाजातील सत्प्रवृत्तींचे प्रतिनिधी म्हणून िरगणात उतरलेल्या उमेदवारांशीही सामना करावा लागणार आहे. वैद्यकीय व्यवसाय व समाजसेवेच्या माध्यमातून गेल्या ३० वर्षांत जवळपास सहा लाख लोकांशी जवळीक निर्माण झाल्याचा दावा करणारे फलटणचे नामवंत वैद्यकीय व्यावसायिक डॉ. माधवराव पोळ यांनीही ‘आदर्श समाजाच्या निर्मितीचे उद्दिष्ट समोर ठेवून’ स्वत: शरद पवारांच्या पाठोपाठ आज सोलापूर येथे माढा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी अर्ज भरला. स्वत: अभियांत्रिकी पदवीधर असूनही गेली १८ वर्षे घरदार सोडून समाजसेवा करणारे महादेव जानकर यांनीही ‘राष्ट्रीय समाज पक्षा’तर्फे उमेदवारी अर्ज भरला आहे. आपण केलेल्या समाजसेवेच्या आधारे समाजातील सत्प्रवृत्तींना आपण मतदानासाठी एक तगडा पर्याय उपलब्ध करून देऊ, असा या दोघांनाही आत्मविश्वास आहे.
तसे पाहता माढा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी या दोघांनीही बरीच आधी सुरू केली होती. जेव्हा ही तयारी सुरु होती तेव्हा शरद पवार माढामधून निवडणूक लढविणार याची दोघांनाही पुसटशी कल्पनाही नव्हती. त्यामुळे पवार यांनी बारामती हा आपला पारंपरिक मतदारसंघ कन्येला देऊन माढाची निवड केल्याने डॉ. पोळ व जानकर ‘भावी पंतप्रधानांविरुद्ध’(?) लढण्याचे धाडस करीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
डॉ. पोळ ‘अपक्ष’ उमेदवार असले तरी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रणेते श्री श्री रविशंकर व आपल्या योगप्रचारामुळे घरोघरी पोहोचलेले बाबा रामदेव यांच्या आशीर्वादरूपी आदेशावरून ते निवडणूक रिंगणात उतरले आहेत, हे सर्व संबंधितांना माहित आहे. जानकर यांनी गेली १८ वर्षे घरदार सोडून धनगर, माळी आणि रामोशी या समाजांसाठी भरघोस समाजसेवा केली आहे. त्या समाजाच्या पाठिंब्यावरच ते उभे राहिले आहेत. त्यामुळे राजकीय धुळवडीतही घराघरातील सत्प्रवृत्त, भक्तीमार्गी व आध्यात्मिक व्यक्तींना पक्षीय राजकारणाबाहेर जाऊन आपला लोकसभा प्रतिनिधी निवडण्याची संधी यामुळे मिळणार आहे. प्रत्यक्षात याचा निवडणूक निकालावर किती प्रभाव पडेल हे आत्ताच सांगणे कठीण असले तरी या दोघांची उमेदवारी पवारांना डोकेदुखी होऊ शकेल, असे अनेकांना वाटते.
डॉ. पोळ यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले : कोणाला दुखावण्यासाठी किंवा कोणाचा पराभव करण्यासाठी किंवा कोणाची मते खाण्यासाठी मी निवडणूक रिंगणात उतरलेलो नाही. माझी उमेदवारी दोन महिन्यांपूर्वीच निश्चित झाली होती. लोकांच्या मुलभूत गरजा व निर्भय जीवनासाठी मी रिंगणात उतरलो आहे. गेल्या ३० वर्षांच्या वैद्यकीय व्यवसायात समाजाची सद्यस्थिती चिंताजनक परिस्थिती मी जवळून अनुभवली आहे. दया, करुणा, प्रेम व जिव्हाळा या ऱ्हास होत असलेल्या मानवी मुल्यांची पुन्हा रुजवणूक व्हावी, यासाठी माझा प्रयत्न आहे. या मुल्यांवर आधारित समाजनिर्मितीबरोबरच सर्वसामान्यांच्या समस्या, शेतकऱ्यांची दु:खे व त्यांच्या प्रश्नांना आपण प्राधान्य देऊ, असे ते म्हणाले.
डॉ. पोळ यांच्या उमेदवारीने त्यांच्या कुटुंबातही मोठी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. खरे तर पोळ कुटुंब पक्के राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक. त्यांचे एक बंधू सदाशिवराव पवार हे राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य होते. त्यामुळे पवार माढातून लढणार हे स्पष्ट झाल्यावर डॉक्टरांनी आपला विचार सोडून द्यावा यासाठी त्यांचे मन वळविण्याचाही प्रयत्न झाला. परंतु गुरुदेवांची आज्ञा शिरसावंद्य मानून त्यांनी आपला विचार कायम ठेवला. आपल्या उमेदवारीवरून कुटुंबातील व्यक्ती दुरावल्या जाव्यात यासाठी यंत्रणा काम करीत असल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. समाजसेवेचे व्रत घेऊन ज्या परिवारात वावरतो ते अनुयायीच माझ्या प्रचाराचे साधन असेल. माझे सहकारी मित्र व कार्यकर्ते यांच्या माध्यमातून मी प्रचार यंत्रणा राबविणार आहे, असे डॉ. पोळ सांगतात. तर जानकर यांनी ज्या समाजासाठी काम केले त्याच समाजाने त्यांना निवडणुकीसाठी निधी उभा करून दिला आहे. प्रचारासाठी मोटारही याच समाजवर्गाने वर्गणी काढून त्यांना घेऊन दिली आहे.