Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
अग्रलेख

डाव्यांचे डाव, तिसऱ्यांना पेच!

 

काँग्रेस पक्षाने ‘आम आदमी’ हा आपला आहे, असे निवडणुकीपुरते का होईना मान्य केले आहे, भारतीय जनता पक्षाने पुन्हा धर्माधतेशीच आपली ओळख पक्की केली आहे. डाव्यांनी राजकारणापुरते का असेना, सरकारमध्येही आपण दाखल होऊ शकतो, असे स्पष्ट केले आहे. डाव्यांच्या पवित्र्यातील हा बदल आहे, असे म्हणावे लागेल. वस्तुत: मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रकाश करात यांनी भारत-अमेरिका अणुऊर्जा करारानंतर काँग्रेस पक्षाच्या विरोधात जी भूमिका घेतली होती, ती सोडून दिलेली नाही. वैचारिक आणि नैतिक अहंकार जपण्याची त्या पक्षाची परंपरा तशीही कायम आहे. म्हणूनच त्यात किंचितच फरक असेल तर तो स्वत: सत्तेत सहभागी होण्याविषयीचा आहे. अजूनही ते केंद्रात भाजपेतर आणि काँग्रेसेतर सरकार सत्तेवर यावे, या मताचे प्रतिपादन करत आहेत. बदल एवढाच की १९९६ मध्ये केलेल्या चुकीची पुनरावृत्ती करायची त्यांची तयारी नाही. म्हणजे वेळ पडली तर आपण सरकारमध्ये सहभागी होऊ आणि तशीच आवश्यकता निर्माण झाली तर सरकारचे नेतृत्व करायलाही मार्क्‍सवादी कम्युनिस्ट मागेपुढे पाहणार नाहीत, असे प्रकाश करातांचे म्हणणे आहे. त्यांच्या या डावपेचात्मक माघारीचे स्वागत करायला हरकत नाही. डाव्यांच्या हातात असणारी राज्ये पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि केरळ या तीन राज्यांमध्ये मिळून लोकसभेच्या ६४ जागा आहेत आणि डाव्यांना संपूर्ण देशात चौदाव्या लोकसभेत मिळालेल्या जागांची संख्या होती ६१. म्हणजे काही झाले तरी डावे आहे त्या ताकदीत फार मोठी वाढ करू शकत नाहीत. २००४ च्या निवडणुकीत या ६१ पैकी ५४ सदस्य काँग्रेसचाच पराभव करून निवडून आले आहेत. त्यांचे साठच्या आसपास आणि तिसऱ्यांचे दीडशेच्या आसपास सदस्य लोकसभेवर निवडून येतील, असे गृहीत धरले तर आघाडी सरकार बनवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जादूच्या आकडय़ापाशी ते पोहोचू शकतात. या निवडणुकीत डावे आणि तिसरे किती संघटितपणे ताकद लावू शकतात यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. तिसरे आहेत कुठे, त्यांची ताकद केवढी, आदी प्रचारी प्रश्नांकडे त्यासाठी दुर्लक्ष करणे चांगले. डाव्यांची ताकद केरळमध्ये काहीशी घटण्याची शक्यता असली तरी पश्चिम बंगालमध्ये ती कमी होईल, अशी शक्यता दिसत नाही. करात यांनी असे म्हटले आहे की तशीच वेळ पडली तर पंतप्रधानपद डाव्यांकडे येऊ द्यायला त्यांचा विरोध नाही. बरोबर १३ वर्षांपूर्वी ज्योती बसूंना पंतप्रधानपद स्वीकारू द्यायला मार्क्‍सवाद्यांनी विशेषत: त्या पक्षाचे तेव्हाचे सरचिटणीस हरकिशनसिंग सुरजीत यांनी केलेला (आणि करात यांनीही) विरोध चुकीचा होता, असे मानण्याइतपत डाव्यांना उपरती झाली असेल तर ती वाईट नाही. बरोबर वर्षभरापूर्वी पश्चिम बंगालचे मार्क्‍सवादी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी कोईमतूरच्या अठराव्या अधिवेशनात बोलताना आपल्याला औद्योगिकीकरणाविषयीच्या स्वत:च्या अनुभवावर न बोलता काँग्रेस पक्षाच्या अपयशाविषयी बोलायची सूचना करण्यात आल्याचे म्हटले होते. त्या वेळी बुद्धदेवांचा चेहरा प्रगत औद्योगिक धोरणाशी जोडला गेला होता. त्यांना तेव्हाही कुणी ‘भांडवलदारांचे हस्तक’ म्हणून शिवी दिली नव्हती आणि आज ते तसे नाहीत, याविषयी बहुतेकांची खात्री आहे. तथापि भाजपमध्येच फक्त झापडबाजांनी राहिले पाहिजे, असा काही नियम नसल्याने मार्क्‍सवाद्यांमधल्या काहींनी तशा झापडे आपल्या डोळ्यांवर बसवून घेतली. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी तर काँग्रेस पक्षाच्या ‘आक्रमक भांडवलदारधार्जिण्या’ आणि ‘विशेष आर्थिक विभागा’विषयीच्या धोरणावर टीका करण्यास त्यांना सांगण्यात आले आणि त्यांनी ती केली. आता एकदम वेगळ्याच धोरणाचे सूतोवाच करातांनी केले आहे. सत्तेवर जाऊ, पण याचा अर्थ पंतप्रधानपद मिळवूच असे नाही, असे सांगताना त्यांनी आपल्या पक्षाच्या १९९६ च्या धोरणाचेही एक प्रकारे समर्थन केले आहे. तेव्हाचा आपल्या पक्षाचा तो निर्णय हा डावपेचाच्या भूमिकेतूनच होता, असे ते म्हणाले आहेत. त्यावेळचा त्यांच्या पक्षाचा डाव एवढाच होता, की बसूंना पंतप्रधानपद मिळता कामा नये. आता मात्र ते काँग्रेसेतर आणि भाजपेतर सरकार आपल्या पाठिंब्यावर केंद्रात येऊ शकते, असे मानायला तयार झाले आहेत, असे हे तिसऱ्यांचे (किंवा चौथ्यांचेसुद्धा) सरकार आलेच, तर ते पडू नये, यासाठी त्यांचा हा नवा पेच आहे. या सरकारला जर काँग्रेसच्या पाठिंब्यावर अवलंबून राहावे लागले तर हे सरकार स्थिर राहूच शकणार नाही, असा त्यांचा होरा आहे. चंद्रशेखर, एच. डी. देवेगौडा किंवा आय. के. गुजराल यांच्या सरकारांचे जे काही घडले, ते करातांच्या डोळ्यासमोर आहे. हे तिन्ही पंतप्रधान अतिशय कमकुवत होते आणि त्यांची स्वत:ची पक्षीय ताकद तोळामासा होती. काँग्रेस पक्षाची तेव्हाची अवस्था आता एवढी वाईट नक्कीच नव्हती. केंद्रात असणारे संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार केवळ आपल्यामुळे उभे होते, असा दावा करातांना करता आला असता पण तो त्यांनी केलेला नाही. गेल्या वर्षी जुलैमध्ये झालेल्या शक्तिपरीक्षेत डाव्यांचा हा भ्रमाचा भोपळाही फुटला आहे. डावे बाहेर पडूनही सरकार तगले आणि डावे हे धोरणात्मकतेत भाजपसारख्या हिंदुत्ववादी उजव्यांच्या अधिक जवळ जाऊ शकतात, हेच स्पष्ट झाले. दोघांनी मतदानात एकमेकांशी सहकार्य केले. करातांनी मात्र ताज्या मुलाखतीत आपल्याला अशाप्रकारे सरकार वारंवार अस्थिर करायला आवडत नाही, असे म्हटले आहे. समजा डॉ. मनमोहनसिंग यांचे सरकार तेव्हाच्या विश्वासदर्शक ठरावावर पडले असते, तर डाव्यांनी आपल्या डावपेचांचेच ते यश असल्याचे सांगून बडेजाव मारला असता की नाही? करातांची पंधरा दिवसांपूर्वीची भूमिकाही आज कायम नाही, असा निष्कर्ष काढला जाऊ शकतो, कारण याआधीच्या एका मुलाखतीत काँग्रेसबरोबरही आपण राजकारण करायला तयार आहोत, असे ते म्हणाले आहेत. त्या वेळी तिसऱ्या आघाडीला काँग्रेसने पाठिंबा दिला तर आपण तो त्याज्य मानणार नाही, असे म्हणाले होते. सरकार आपले, पाठिंबा त्यांचा, असा आविर्भाव उभा करणार हे काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार टिकू शकणार नाही, असे आता सांगत आहेत. ‘राजकीय अस्पृश्यते’चेच म्हणाल, तर डाव्यांनी आणि भाजपने एकत्र येऊन विश्वनाथ प्रताप सिंगांना राज्याभिषेक घडवल्याचा इतिहास आहे. काँग्रेस पक्षाकडून डाव्यांवर टीका झाली तर भाजपवाले छातीचा कोट करून डाव्यांची तरफदारी करायचे आणि भाजपच्या समर्थनार्थ डावे विषयांतर करूनही ‘त्यांना कशाला बोल लावता’ म्हणून काँग्रेसचा उद्धार करायचे. विश्वनाथ प्रताप सिंगांच्याच कारकीर्दीत जेव्हा त्यांनी ‘मंडल’चा आश्रय घेऊन आपला पाया वाढवायचा मार्ग चोखाळला तेव्हा लालकृष्ण अडवाणींनी कमंडलू काढून त्यातले पाणी शिंपून आपल्यासाठी जमीन मोकळी करायचा प्रयत्न केला. बिहारच्या मुख्यमंत्रिपदी असणाऱ्या लालूप्रसाद यादवांनी धर्माधतेची पायाभरणी करणाऱ्या अडवाणींना अटक करायचे धाडस केले नसते तर देशात तेव्हाच जागोजाग हिंस्र नंगानाच झाला असता. पुढे तो १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळाला. त्या वेळी तर सोमनाथ ते अयोध्या ही अडवाणींची रथयात्रा निघाली नसती तर डावे आणि उजवे किती वाहवत गेले असते हे आता सांगता येणे अवघड आहे. सांगायचा मुद्दा हा, की डाव्यांचे जेव्हा काँग्रेस विरोधासाठी वाट्टेल ते धोरण असते, तेव्हा त्याचा उल्लेख ते डावपेचात्मक म्हणून करतात. इतरांच्या तशा तऱ्हेच्या धोरणाला ते धरसोडीचे ठरवून मोकळे होत असतात. थोडक्यात डाव काँग्रेसला, पेच स्वपक्षीयांना आणि तिसऱ्यांना, असा काहीसा हा मामला आहे. निवडणुकीच्या निकालानंतर ‘अण्णा द्रमुक’च्या जयललिता बदलू शकतात, त्यांचे नवे सहकारी ‘पट्टली मक्कल कच्छी’ बदलू शकतात, कदाचित मायावती आणि त्यांचा बहुजन समाज पक्ष हेही बदलतील, तेव्हा डावे काय करतील?