Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९

पारसी कॉलनी असे म्हटले की, शांत आणि हिरवागार परिसर असेच चित्र आपल्या नजरेसमोर येते. मग ती पारसी कॉलनी कुठचीही असो. दादर, अंधेरी किंवा मग अगदी लालबागचीही. मुळात हा समाज शांतताप्रिय आणि निसर्गावर भरभरून प्रेम करणारा आहे. त्यामुळे कोणत्याही पारसी कॉलनीत पाऊल टाकले की, आपण अगदी वेगळ्या ठिकाणी आल्याची प्रचीती येते. या खेपेस निमित्त होते ते दादर- माटुंग्याच्या पारसी कॉलनीतील वसंतोत्सवाचे! दादरच्या पारसी कॉलनीत भर उन्हाळ्यात टळटळीत दुपारी फेरफटका मारला तरी गारवा जाणवल्याशिवाय राहात नाही. फाइव्ह गार्डनचा हा परिसर तर त्यासाठी प्रसिद्धच आहे. या पाच उद्यानांच्या परिसरामध्ये सोनमोहोर, रेन ट्री अर्थात पर्जन्यवृक्ष त्यांच्या डेरेदार विस्तारासह पसरलेले दिसतात. अनेक मार्गांवर रस्त्यांच्या दुतर्फा लावण्यात आलेल्या या वृक्षांमुळे रस्त्यांवर सावलीचे छत्र पाहायला मिळते.. त्यामुळे भर उन्हाळ्यातला हा फेरफटकाही अनेकदा मनाला गारवा देऊन जातो.
पण पारसी कॉलनीचा हा फेरफटका खरा सुरू होतो तो किंग्ज सर्कल परिसरात. किंग्ज सर्कल स्थानकाहून उतरल्यानंतर आपण दादरच्या दिशेने चालू लागतो. अरोराजवळचा पूल येताच. रस्ता पार करून पलीकडच्या बाजूस गेल्यानंतर अगदी समोर रस्त्याच्या कडेला दोन मोठे अजस्त्र वृक्ष आपल्या नजरेस पडतात. सुरुवातीस पाहिल्यानंतर कदाचित करंज असल्याचा भास होण्याचीही शक्यता आहे. कारण याची पालवीही अगदी करंजासारखीच पोपटी रंगाची असते. शिवाय इतर जुन पानेही करंजाच्याच पानांसारखी हिरवीशार दिसतात. मात्र याचा अजस्त्रपणा काही वेगळाच आहे. त्याच्या खोडाचा घेरही दोन-तीन जणांना हातात हात घालून पकडावा लागेल असा आहे. सोबत असलेले डॉ. चंद्रकांत लट्टू मग यातून आपली सोडवणूक करतात. या महाकाय वृक्षाचे नाव अंदमान पडौक. त्याचे शास्त्रीय नाव टेरोकार्पस इंडिकस. हा महाकाय वृक्ष १०० फूटही वाढतो. ऐन वसंतात त्याला नवी पालवी फुटते. ती पोपटी रंगाची असल्याने करंजाप्रमाणे भासमान होतो. त्याच्या कळ्यांचे आणि पावसाचे एक अनोखे नाते आहे. त्याच्या कळ्या बऱ्याच दिवस आलेल्या दिसतात, पण फुलत मात्र नाहीत. पावसाची चाहूल लागताच म्हणजे उद्या पडणार असे स्पष्ट होताच त्या फुलतात, असे मत अनेक निरीक्षकांनी नोंदविले आहे. पिवळ्या रंगाची येणारी फुले फार काळ मात्र टिकत नाहीत. एक किंवा फार तर दोन दिवसच हा बहर टिकतो. त्याच्या गाभ्याचे लाकूड लाल रंगाचे असते. त्यामुळे त्याला रेडवूड असेही म्हणतात. त्याचा वापर बव्हंशी फर्निचरसाठी केला जातो. तोंड येण्यासारखे उष्म्याचे विकार किंवा काही पोटाच्या विकारांमध्येही या झाडाचा वापर केला जातो. या ठिकाणी हे दोन महाकाय वृक्ष अगदी बाजूबाजूला फूटपाथवर पाहायला मिळतात. असाच आणखी एक वृक्ष राणीच्या बागेत तर दुसरा कुलाब्याच्या बॅण्ड स्टॅण्डसमोरच आहे. हा महाकाय वृक्ष पाहणे हा देखील एक सोहळाच ठरतो!
पारसी कॉलनीत पोहोचल्यानंतर आपली सुरुवात होते ती, शिरीषाच्या कुळातील अल्बिझिया रिकार्डीआना या वृक्षापासून. एफ. डी. अल्बिझिया या १८ व्या शतकातील निसर्गअभ्यासकाचे नाव या झाडाला मिळाले आहे. बारिक पान आणि पांढरी फुले हा त्याचा खास परिचय. आपल्याकडे ही झाडे तशी कमी संख्येने आहेत. इथे रस्त्याचे नाव लिहिलेल्या पाटीला खेटूनच हा वृक्ष उभा आहे. प्रथमच दर्शनी पटकन कळणार नाही. पण इथे पिंपळही असल्याने प्रथम िपपळाची पाने नजरेस पडतात. नंतर लक्षात येते की, या अल्बिझियावर बसलेल्या एखाद्या पक्षाच्या विष्ठेतूनच पिंपळ रुजून आला आहे. वरच्या बाजूस मात्र केवळ अल्बिजियाचाच विस्तार पाहायला मिळतो. समोर पूर्वेकडे तोंड केल्यानंतर फाइव्ह गार्डनचा पालिकेचा बोर्ड दिसतो. मंचेरजी जोशी पांच उद्यान.. या परिसरात कुठेही नदर फिरवली तरी रेन ट्री, सोनमोहोर, काशिद असे वृक्ष विस्तारलेले दिसतात. अनेक ठिकाणी जांभळाची झाडेही भरपूर आहेत. एका उद्यानाच्या बाजूला टबेबुया आहे. फेब्रुवारी- मार्चमध्ये फिकट गुलाबी जांभळसर रंगाची फुले दिसतात. पानगळ झाल्याप्रमाणे वृक्ष आणि त्याच्या वरच्या बाजूस फुलांचे गुच्छ असे दृश्य लांबून दिसते. पश्चिम द्रुतगती महामार्गावर अनेक ठिकाणी फुललेले टबेबुया या मोसमात दिसतात. मात्र अनेकांना लक्षात राहिला आहे तो आकाराने मोठा आणि विस्तारही अधिक असलेला टाटा मूलभूत संशोधन संस्थेतील टबेबुया.
टबेबुयाच्या बाजूलाच आहे तो बहावा. बहावा असे म्हटले की, आपण पिवळी फुलझुंबरे शोधू लागतो. पण हा बहावा आता कुठे फुलायला लागला आहे. झाडावर जुन्या गेल्यावर्षीच्या शेंगा तशाच पाहायला मिळतात. त्याच्याच बाजूला आता बहाव्याच्या कळ्यांची झुंबरे उलटी लटकलेली दिसतात. बहराला आताच सुरुवात झाली आहे. बहाव्याचे शास्त्रीय नाव इंडियन लॅबर्नम. हा वृक्ष मध्यम आकाराचा पानगळी वृक्ष आहे. एप्रिल-मेमध्ये पानगळ झाल्यानंतर पूर्ण वृक्ष फुलांच्या झुंबरांनी बहरलेला दिसतो. फुलांचे घोस मधमाशा आणि फुलपाखरांना आकर्षित करतात. त्यांच्याच मार्फत त्याचे परागण होते. त्यातही कॉमन इमिग्रंट आणि कॉमन ग्रास यलो ही दोन फुलपाखरे या फुलांच्या घोसाशेजारी विशेषत्वाने पाहायला मिळतात. जिजामाता उद्यानात तर पांढरा बहावाही सुरुवातीस पाहायला मिळतो.
पारसी कॉलनी ही सुनियोजित कॉलनी आहे. त्यामुळे आज मुंबईत कुठेही पाहायला न मिळणारे प्रशस्त फूटपाथ इथे दिसतात. १९ व्या शतकाच्या सुरुवातीसच ही पारसी कॉलनी अस्तित्वात आली. मंजेरची जोशी यांनीच त्याचा आराखडा तयार केला आणि ही पाच उद्यानेही अस्तित्वात आली. त्यावेळेस याच उद्यानांमध्ये पलीकडच्या तमीळ कॉलनी आणि हिंदू कॉलनीतील मंडळी एकत्र येवून संगीतद सभेच्या कार्यक्रमांचे आयोजन करायचे. वृक्षराजी हा तर अगदी पूर्वीपासूनच इथला परिचय राहिला आहे. इथे अग्यारीच्या दिशेने जाणारा मार्ग तर वसंतोत्सवाची अनेक रुपे आपल्यासमोर उलगडत जातो. उद्यानाकडून आपण या पारसी अग्यारीच्या दिशेने चालू लागतो आणि समोरचा वृक्ष पाहून थेट मुंबई विद्यापीठासमोर ओव्हल मैदानाच्या टोकावर उभा असलेला महोगनी आठवतो. हा त्याचाच भाऊ. स्वीटेनिया महोगनी किंवा मायक्रोफायला हे त्याचे शास्त्रीय नाव. जिरार्ड वॉन स्वीटेन या डच वनस्पतीशास्त्रज्ञाचे नाव त्याला मिळाले. कडुनिंबाच्या कुळातील हा वृक्षही ६० फूट किंवा त्यापेक्षाही अधिक वाढतो. हा निष्पर्ण झालेला कधीच दिसत नाही. कधीही पाहा हिरवागार दिसणारा असा हा वृक्ष खाऱ्या हवेत चांगली वाढतो. याची फुले आकाराने लहान आणि हिरवट पांढरी असतात. हिरवा रंग प्रमुख असल्याने ती पटकन नजरेस पडत नाहीत.
महोगनी पाहून आपण पुढे रुस्तम फराम्ना अग्यारीच्या चौकात पोहोचतो आणि मग तिथेच वसंतोत्सवाचा महत्त्वाचा अंक सुरू होतो. अग्यारीच्या बरोब्बर समोरच्या फूटपाथवर मोठय़ा आकारातील सोनमोहर ऐन बहरात आहे. त्यामुळे सोनेरी रंगाची झळाळीच त्या वृक्षाला प्राप्त झालेली दिसते. पूर्णपणे फुललेला सोनमोहोर पाहातच राहावा एवढा सुंदर दिसतो. या साऱ््याची मजा वाढते ती पारसी कॉलनीतील बिल्िडग्जच्या विशिष्ट अशा रचनेमुळे. काही ठिकाणी त्या एखाद्या महालाप्रमाणे दिसतात. तर काही ठिकाणी त्या छोटेखानी पण टुमदार आहेत. जुन्या जमान्यातील असे आर्किटेक्चर आपल्याला फारसे पाहायला मिळत नाही. ती जुनी घरे आणि बंगले या वसंतोत्सवाला एक वेगळेच परिमाण देतात.. अग्यारीला लागून क्लायनोव्हियाचा पूर्ण अ‍ॅव्हेन्यूच पाहायला मिळतो. क्लायनोव्हियाची झाडे दुतर्फा आहेत. लहान आकारातील गुलाबी छटा असलेला पाच फुलांचा गुच्छ असे त्याच्या बहाराचे रूप असते. परागण झाल्यावर फळांत रूपांतर होते तेव्हा हिरवी पोपटी रंगाच्या चांदण्यांचे आकार प्रथम दिसतात. अनेकदा बाराही महिने या झाडाला फुले येतात. क्लाईन हॉफ या डच डॉक्टरचे नाव या झाडाला मिळाले. त्याच्या खोडाच्याच एका भागाचा वापर दोरखंड करण्यासाठीही केला जातो.
या अग्यारीच्याच दाराशी उभा आहे तो बेरिया कॉर्डिओफोलिआ. त्याच्या पानांचा आकार खालच्या बाजूस हृदयाच्या आकाराप्रमाणे असल्याने त्याला कार्डिओफोलिया असे नाव मिळाले आहे. याची फुलेही आकर्षक असतात. सध्या काही ठिकाणी वाळलेली फुले गुच्छांनी पाहायला मिळतात. तिथून आपण खारेघाट मार्गाने पुढे सरकतो तेव्हा खालच्या बाजूस लाल भडक किंवा केशरी भडक रंगांच्या मोठय़ा आकारातील फुलांचा सडा पडलेला दिसतो आणि मग लक्षात येते बाजूलाच स्पॅथोडिया असणार.. वरती लक्ष जाते तोच भडक रंगाची मोठय़ा आकारातील ही फुले पाहायला मिळतात. पश्चिम रेल्वेने माटुंगा स्टेशन सोडले की, दादरकडे जाताना पूर्वेस यार्डामध्ये सध्या पूर्णपणे फुललेला स्पॅथोडिया पाहायला मिळतो. खारेघाट लेन काही वर्षांंपूर्वी चर्चेत आली होती ती तेथील आफ्रिकन सॉसेज ट्रीमुळे झालेल्या वादाने. येथे आफ्रिकन सॉसेज ट्री मोठय़ा संख्य़ेने रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाहायला मिळतात. त्यांची फळे दुधी सारख्या आकाराची असतात. काहीजण त्याला आफ्रिकन दुधी असेही मजेत म्हणतात. ही फळे खाली पडून काहीजण जखमी झाल्याची त्याचप्रमाणे गाडय़ांचे टप खराब झाल्याची आवई उटली आणि काहीजण थेट झाडाच्या मूळावर उठले. त्याला विरोध करणाऱ्यांमध्ये डॉ. लट्टूही होते. ते म्हणाले की, झाडाची फळे पडल्याने कोणी जखमी झाल्याची अशी कोणतीही आकडेवारी तेव्हा या झाडांना विरोध करणाऱ्यांकडे नव्हती. अगदीच त्रास होत असेल तर फळे लागल्यानंतर ती काढून टाकावीत हा उपाय आहे. झाडे कापणे हा उपाय नव्हे.. अखेरीस ती झाडे टिकली. इथेच ६०८ क्रमांकाच्या बिल्डिंगचे आवार पाहाणे हा अनोखा अनुभव आहे. इथे एकाच आवारात झाडांचे वैविध्य पाहायला मिळते. मोठा कदंब वृक्ष समोरच दिसतो. त्याच्यावर मिरीचा वेल चढविण्यात आला आहे. पुटिया नावाचे चाफ्यासारखे दुर्मिळ झाडही आहे. सध्या ते बहरात आहे. थंबर्जिआ लिविसही आहे. डिलेनिया सुफ्रुटीकोजाही आहे. बाजूलाच सीतेची वेणीही आहे. हे सारे एकाच अंगणात. हे अंगण हाच वनस्पतीतज्ज्ञांसाठी एक चांगला शोध असतो. फक्त डॉ. लट्टूंसारखी शोधक नजर आपल्यासोबत असावी लागते. पारशी कॉलनीतून आपण बाहेर पडतो.. पण हा वसंतोत्सव मात्र मनात दीर्घकाळ रेंगाळत राहतो.. केवळ रेंगाळतो एवढेच नव्हे तर आपल्याला जगण्याची ऊर्जा आणि ऊर्मीही देत राहातो!
हा मुंबईचा फुलोरा पाहायचा असेल तर मुंबई विद्यापीठाच्या बहिशाल शिक्षण विभागातर्फे चालविल्या जाणाऱ्या वृक्षसौंदर्याचा रसास्वाद या अभ्यासक्रमात सहभागी व्हावे लागेल. अधिक माहितीसाठी संपर्क (सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत) ६५९५२७६१ किंवा ६५२९६९६२. ल्ल
vinayakparab@gmail.com

आजपासून ‘जोडी जमली रे’चे नवे पर्व
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘जोडी जमली रे’ या विवाह जुळविण्याचा रिअ‍ॅलिटी शोचे नवे पर्व आज, गुरुवारपासून सुरू होत आहे. पहिल्या १२ स्पर्धकांनी अनुरूप जोडीदार शोधण्याचा प्रयत्न केला. आता सहा नवीन स्पर्धक ‘जोडी जमली रे’मध्ये सहभागी होणार आहेत.
दर गुरुवार, शुक्रवार, शनिवार रात्री १० वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर ‘जोडी जमली रे’ कार्यक्रम दाखविण्यात येतो. यात आजच्या एपिसोडपासून सागर भालेराव, अनुप लोखंडे आणि मनीष पामनकर हे सहभागी होत असून ते अर्चना माने, अनघा गायकवाड आणि गायत्री निकले या तीन मुलींना भेटतील. या सहा स्पर्धकांमध्ये ‘कम्पॅटिबिलिटी टेस्ट्स’ घेण्यात येतील. अनेक गमतीदार आणि धमाल अशा इंटरॅक्टिव्ह खेळांमधून ‘कम्पॅटिबिलिटी’ ठरविण्यात येईल.
कविता मेढेकर आणि अतुल परचुरे यांच्या खुमासदार सूत्रसंचालनाने लोकप्रिय ठरलेल्या या कार्यक्रमात गुरुवारच्या भागात वैवाहिक जोडीदार निवडण्यासाठी इंटरॅक्टिव्ह खेळांची ही अभिनव पद्धती चांगली की पारंपरिक ‘कांदे पोहे’ पद्धती चांगली यावर सगळे स्पर्धक चर्चा करतील. सुरुवातीला तिन्ही स्पर्धक मुलींचे डोळे बांधून त्यांना मुलांच्या सोबत ‘ब्लाईंड डेट’वर पाठविण्यात येईल. नंतर सूत्रसंचालक सगळ्या स्पर्धकांची ओळख करून देतील. तसेच स्पर्धकही आपापल्या प्रोफाइल्स सादर करतील.
अलीकडे विवाह जुळविण्यासाठी वेबसाइट्स खूप आहेत, त्यात तरुणांचा सहभागही प्रचंड असतो. त्यामुळेच ‘जोडी जमली रे’ या विवाह जुळविण्याच्या आगळ्यावेगळ्या रिअ‍ॅलिटी शोमध्येही उत्साहाने तरुण-तरुणी स्पर्धक म्हणून सहभागी होत आहेत. आता या नव्या सहा स्पर्धकांमधून कोणाकोणाच्या जोडय़ा जमतात आणि सर्वोत्तम जोडीचा किताब कोण पटकाविणार ते कार्यक्रम पाहिल्यावरच समजणार आहे.
प्रतिनिधी