Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९

काँग्रेसविरुद्धच्या थेट लढतीत भाजपला
फटका बसल्यास तिसऱ्या आघाडीचे नुकसान

नवी दिल्ली, १ एप्रिल/खास प्रतिनिधी

यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला फटका बसला तर काँग्रेसला फायदा होऊन तिसऱ्या व चौथ्या आघाडीचे केंद्रात सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न उधळले जाईल. काँग्रेस आणि भाजप यांच्यात सुमारे दीडशे जागांवर होत असलेल्या सरळ लढतींमध्ये काँग्रेसचे पारडे जड झाले तर केंद्रात सत्तेवर दावा सांगता येणार नाही, या शक्यतेमुळे सध्या पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहणाऱ्या तिसऱ्या व चौथ्या आघाडीतील नेत्यांची झोप उडाली आहे. केंद्रात गैरकाँग्रेस आणि गैरभाजप आघाडीची सत्ता यावी म्हणून तिसऱ्या व चौथ्या आघाडीने मोर्चेबांधणी केली आहे.

‘भ्रष्ट’ नीरा यादवांची भाजपात ‘एन्ट्री’
राजनाथ-जेटली वाद चिघळणार?

नवी दिल्ली, १ एप्रिल / पी.टी.आय.

उत्तर प्रदेशातील सर्वात भ्रष्ट सनदी अधिकारी म्हणून बदनाम झालेल्या निवृत्त आयएएस अधिकारी नीरा यादव यांनी भाजपात प्रवेश केल्याने पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह आणि ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांच्यात नव्य वादाची ठिणगी पडली आहे. काही दिवसांपूर्वीच उद्योगपती सुधांशू मित्तल यांची ईशान्येकडील राज्यांचे सह समन्वयक म्हणून नियुक्ती केल्यामुळे तणावपूर्ण असलेले राजनाथ- अरुण जेटली संबंध अद्याप सामान्य झालेले नाहीत. या तणावात आता नीरा यादव यांच्या भाजपप्रवेशाची भर पडली आहे. त्यामुळे उभय नेते हा वाद कुठवर ताणून धरतात याची चिंता भाजप नेत्यांना पडली आहे.

कोल्हापुरातून मंडलिक अपक्ष लढणार
कोल्हापूर, १ एप्रिल / विशेष प्रतिनिधी

दक्षिण महाराष्ट्राच्या राजकारणात गेले महिनाभर ताणल्या गेलेल्या उत्कं ठेला बुधवारी पूर्णविराम मिळाला. जिल्ह्य़ातील ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा आपला निर्णय जाहीर केला. उद्या गुरुवारी सकाळी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून त्यांच्या उमेदवारीला डावे पुरोगामी पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि क्रांती सेना यांनी पाठिंबा व्यक्त केल्याने कोल्हापूरच्या तिरंगी लढतीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

महाराष्ट्र भाजपच्या निवडणूक खर्चात ७० टक्के कपात
संदीप प्रधान
मुंबई, १ एप्रिल

महाराष्ट्र भाजपच्या निवडणूक खर्चात सुमारे ७० टक्के कपात करण्यात आल्याने या लोकसभा निवडणुकीत प्रदेश शाखेने स्वतंत्र जाहिराती द्याव्या किंवा कसे याबाबत पक्षात चर्वितचर्वण सुरू आहे. याचबरोबर मतदारसंघांत पोस्टर्स लावावी की, नाही याबाबतही अनिश्चितता निर्माण झाली आहे. तथापि केंद्रीय नेते व महाराष्ट्रातील काही नेते यांच्या प्रचार दौऱ्याकरिता तीन हेलिकॉप्टर्स पक्षाने भाडेतत्त्वावर घेतली आहेत. मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी केंद्रात भाजपप्रणीत रालोआ सरकार सत्तेवर होते.

भुजबळांचे भावनिक आवाहन अन् आर. आर. आबांचे प्रशस्तीपत्र
नाशिक, १ एप्रिल / प्रतिनिधी

विरोधकांनी ‘एसएमएस’च्या माध्यमातून चालविलेल्या जातीयवादी आणि विखारी प्रचाराविरोधात उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केलेले भावनिक आवाहन.. आजवर पडद्याआड असलेल्या समीर भुजबळ यांच्या कार्याचा प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील यांनी केलेला जाहीर गौरव.. हा घटनाक्रम आज नाशिकच्या राजकीय वातावरणात लक्षवेधी ठरला. निमित्त होते, नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे अर्ज भरल्यानंतर आयोजित सभेचे.

गाठ आहे मंत्र्याशी..!
‘‘ब्रिजलालभाऊ, मी तर आता रिंगणाबाहेर फेकला गेलो; आता ‘त्यांच्या’शी तुम्हाला एकटय़ालाच लढायचे आहे. सांभाळा, गाठ आहे मंत्र्याशी!’’ एक राष्ट्रीय कीर्तनकार ज्येष्ठ पत्रकार, जळगावच्या ‘जनशक्ती’चे दैनिकाचे संपादक ब्रिजलाल पाटील यांना सांगत होता. माझ्या अर्जात खोडाखोड करून तो अवैध ठरविण्यात सत्ताधाऱ्यांचाच हात आहे, असे तो राष्ट्रीय कीर्तनकार जाहीर सभांमधून सांगत होता; परंतु त्याच्या आरोपाला विजय नवल पाटील यांनी किंवा इतरही कोणी उत्तर दिले नाही.

वाघोबा आणि कोल्होबा
वाघोबा- झाली बाबा एकदाची लोकशाही स्थापन.
कोल्होबा- आता तुम्ही या जंगलाचे अधिकृत राजे झाला आहात! अभिनंदन.
वाघोबा- अभिनंदन वगैरे ठिक आहे हो, पण मला एक चिंता खाते आहे.
कोल्होबा- काय म्हणताय? एरवी तुम्ही सगळ्यांना खाता आणि आज ही चिंता तुम्हाला खाते आहे?
वाघोबा- हो ना! ‘काय खावं’ याची चिंता मला खाते आहे.

शेखर सुमनचे मी स्वागत करतो - शत्रुघ्न
पाटणा, १ एप्रिल / पीटीआय

खामोश.. शेखरभाय लडेगा.. हमें कुछ फरक नहीं पडता.. ही वाक्ये आहेत दस्तुरखुद्द शत्रुघ्न सिन्हा यांची. पाटणा साहेब लोकसभा मतदारसंघात शत्रुघ्न सिन्हा यांच्याविरोधात छोटय़ा पडद्यावरील स्टार शेखर सुमन यांना उभे करण्यासाठी काँग्रेसने जोरदार फिल्डिंग लावली आहे. पण या वृत्ताबाबत विचारले असता शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, सक्रिय राजकारणात शेखर प्रवेश करू इच्छित असेल तर मी त्याचे स्वागत करतो. शेखर यांच्याशी माझे चांगले वैयक्तिक संबंध आहेत. तो दूरचित्रवाणीवरील लोकप्रिय कलावंत आहे. माझ्याविरोधात जर तो उभा राहू इच्छित असेल तर मीही सामना करण्यासाठी सज्ज आहे, असे शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले.
यावेळी शेखर सुमन यांना सल्ला द्यायला शत्रुघ्न सिन्हा विसरले नाहीत. ते म्हणाले की, राजकीय कारकीर्द आपण कुठून आणि का सुरू करतोय याचा गांभीर्याने अभ्यास करायला हवा. पूर्वानुभव पाहता अनेक चित्रपट कलावंतांची लोकप्रियता ‘कॅश’ करण्यासाठी राजकीय पक्षांकडून वापरले जाते आणि नंतर त्यांना योग्य वागणूक मिळत नाही. त्यामुळे कुणीही राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी योग्य चाचपणी करावी.

फर्नाडिस यांचा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज
मुझफ्फरपूर, १ एप्रिल / पीटीआय

बिहारमध्ये जनता दलने (संयुक्त) तिकीट नाकारल्यानंतर आता जॉर्ज फर्नाडिस यांनी बंडखोरीचा मार्ग पत्करला आहे. मुझफ्फरपूर येथील जागेसाठी आता फर्नाडिस यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे निमंत्रक फर्नाडिस यांनी आज मुझफ्फरपूरचे जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी बिपिन कुमार यांच्याकडे आपला अर्ज भरला. त्यांच्यासोबत माजी केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री दिग्विजय सिंग, माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा, जनता दलचे (संयुक्त) उपाध्यक्ष रामजीवन सिंग आणि माजी राज्यमंत्री गणेश प्रसाद यादव होते. काल फर्नाडिस यांनी आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले. परंतु त्यांनी आपल्या पक्षाचे नाही मात्र गुलदस्त्यात ठेवले होते. जनता की अदालत में फैसला होगा, अशी प्रतिक्रिया फर्नाडिस यांनी व्यक्त केली. प्रकृतीचे कारण देऊन तिकीट नाकारणारे जनता दलचे (संयुक्त) अध्यक्ष शरद यादव आणि बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्यावर फर्नाडिस यांनी कडाडून टीका केली. १९७७ मध्ये फर्नाडिस मुझफ्फरपूर येथून प्रथमच तुरुंगातून निवडून आले.

सिनेताऱ्यांचे राजकीय क्षेत्राला उपयुक्त योगदान
रांची, १ एप्रिल / पीटीआय

चित्रपट तारे आपल्या राजकीय कारकीर्दीत उपयुक्त योगदान देऊ शकतात, असे मत भाजपाच्या निवडणूक प्रचारक हेमा मालिनी यांनी व्यक्त केले आहे. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. टी. रामा राव, माजी केंद्रीयमंत्री सुनील दत्त आणि भाजपचे विनोद खन्ना या सर्व चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींनी लक्षणीय योगदान दिले आहे,असे हेमा मालिनी यावेळी म्हणाल्या. संजय दत्तच्या संदर्भात न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा मान राखलाच गेला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.चित्रपटसृष्टीतील अनेक व्यक्तींनी राजकीय पटावर चांगली चांगली कामगिरी दाखविली आहे. एकेकाळी राजकारणात रस असलेले अमिताभ बच्चन आता फक्त चित्रपटातच काम करीत आहेत, असे हेमा मालिनी यांनी सांगितले. ७०च्या दशकात भारतीय चित्रपटसृष्टीवर ‘ड्रीम गर्ल’ अशी आपली अभिजात छाप उमटविणारी हेमा मालिनी दोन मुलींसह खासदारकीही भूषवित आहे. परंतु आपले पहिले प्रेम मात्र नृत्य आणि अभिनय असल्याचे यावेळी तिने सांगितले.

मनसेचे औरंगाबाद, भिवंडी व कल्याणचे उमेदवार जाहीर
मुंबई, १ एप्रिल/ खास प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने औरंगाबादसाठी सुभाष पाटील, भिवंडीतून डी. के. म्हात्रे तर कल्याण लोकसभेसाठी वैशाली दरेकर यांची उमेदवारी आज जाहीर केली. औरंगाबाद येथे शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे व काँग्रेसतर्फे उत्तमसिंग पवार हे निवडणूक रिंगणात असून मनसेच्या सुभाष पाटील यांच्या निवडणूक प्रचाराकडे पक्षाकडून विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. युतीच्या जागावाटपात भिवंडीची जागा भाजपकडे गेली असली तरी तेथे अद्यापि उमेदवार जाहीर झालेला नाही. याठिकाणी भाजपतर्फे जगन्नाथ पाटील यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता असून कुणबी व मुस्लिम मतदारांचे प्राबल्य असलेल्या या मतदारसंघात मनसेने डी. के. म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. सेनेने भाजपकडून कल्याण लोकसभा मतदारसंघ हिसकावून घेतल्यामुळे भाजपात तीव्र नाराजी असताना शिवसेनेने ठाणे लोकसभा मतदारसंघात विजयी झालेले आनंद परांजपे यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत डावखरे यांच्यापुढे कडवे आव्हान निर्माण झाले आहे. वैशाली दरेकर यांची उमेदवारी आज जाहीर केल्यामुळे महिलांची मते मोठय़ा प्रमाणात मनसेला मिळतील, अशी अपेक्षा मनसेकडून व्यक्त करण्यात येत आहे.

दत्ताभाऊंवर साहेबांची वक्री नजर!
नवी दिल्ली, १ एप्रिल/खास प्रतिनिधी

मागच्या वर्षी याच महिन्यात दत्ताभाऊंना भाजपकडून मिळणारे राज्यसभेचे तिकीट शेवटच्या क्षणी हुकविल्यानंतरही साहेबांच्या मनातील राग शमलेला नाही. यंदा काँग्रेसकडून वर्धेत लोकसभा निवडणूक लढविणारे दत्ता मेघेंवर साहेबांची वक्री नजर पडणारच, असे राष्ट्रवादीच्या गोटात छातीठोकपणे बोलले जात आहे. ज्यांना शरद पवार ठाऊक आहेत, त्यांना वर्धेत दत्ताभाऊंचे काय होणार हे सांगायलाच नको, असे राष्ट्रवादीतील सूत्रांचे म्हणणे आहे. दत्ताभाऊंनी साहेबांना अंधारात ठेवून भाजपकडून राज्यसभेचे तिकीट खिशात घातले होते. पण त्यांची उमेदवारी जाहीर व्हायला काही मिनिटे शिल्लक असताना साहेबांनी त्यांचा पत्ता कापला. अर्थात, एवढय़ाने साहेबांचे समाधान झालेले नाही, असे त्यांचे निकटस्थ सांगतात. दत्ताभाऊंनी काही काळ विश्रांती घेऊन काँग्रेसचा रस्ता धरला. हा नवा अपराधही साहेबांना आवडला नाही. आपला खास समर्थक काँग्रेसच्या गोटात सामील व्हावा, याचा राग साहेबांच्या मनात आहे. दत्ताभाऊंना तिकीटच मिळू यासाठी त्यांनी आपल्या पद्धतीने बरेच प्रयत्न केल्याचे म्हटले जाते. तरीही दत्ताभाऊंनी काँग्रेसचे तिकीट मिळविलेच. त्यामुळे विदर्भात दत्ताभाऊ साहेबांच्या रडारवर पहिल्या नंबरवर असल्याचे सांगण्यात येत आहे.