Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
लोकमानस

शालेय पातळीवरची कॉपीही गांभीर्याने हाताळावी
दहावी-बारावीच्या परीक्षा उरकल्यानंतर आता प्राथमिक, माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. बोर्डाच्या परीक्षाकाळात कॉपीसारख्या गैरप्रकाराची जेवढी चर्चा केली जाते, तेवढी शालेय पातळीवरच्या कॉपीसंदर्भात होत नाही. बोर्डाच्या परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा असला तरी याचा पाया शालेय शिक्षणातूनच घातला जातो हे विसरता कामा नये.

 


बोर्डाच्या परीक्षेत कॉपी करणारा विद्यार्थी हा शालेय परीक्षांपासूनच कॉपी करत आलेला असतो. केवळ ग्रामीण भागातच नव्हे तर शहरातील शाळांमधूनदेखील शालेय परीक्षा फारशा गांभीर्याने घेतल्या जात नाहीत. त्या केवळ एक शैक्षणिक सोपस्कार ठरतात. शालेय परीक्षांचा आवश्यक दर्जा न राखणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या कॉपीप्रवृत्तीस खतपाणी घालणेच होय. फक्त बोर्डाच्या परीक्षाकाळातच विद्यार्थ्यांवर कडक बंधने घातल्याने त्याच्या मनात बोर्डाच्या परीक्षापद्धतीबाबत अढी निर्माण होते. म्हणूनच लहान वयातच, ‘कॉपी करून परीक्षेत चांगल्या टक्केवारीने उत्तीर्ण होणे हे गैर आहे,’ असे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविणे आवश्यक आहे.
त्यासाठी शैक्षणिक वर्षांतील कुठलीही एक परीक्षा पर्यवेक्षकाशिवाय व पाठय़पुस्तकासहित घेऊन विद्यार्थ्यांला दोन्ही प्रकारातील फरक प्रात्यक्षिकांसह लक्षात आणून द्यावा. परीक्षेत कॉपी करून जास्त गुण मिळू शकतील; पण त्याने ज्ञानात भर पडणार नाही, हे विद्यार्थ्यांना समजणे गरजेचे आहे. यासाठी शाळेतील शिक्षक व पालक यांनी आपल्या पाल्यांची मानसिकता घडवायला हवी.
बोर्डाच्या परीक्षेत शिक्षक / पर्यवेक्षक यांच्यावर होणारी दुर्दैवी कारवाई भविष्यात टाळावयाची असेल, तर शालेय पातळीवरच अधिक प्रामाणिकपणे प्रयत्न व्हायला हवेत.
सुधीर दाणी, बेलापूर, नवी मुंबई

‘नॅनो’चा आनंद क्षणिक ठरू नये
‘नॅनो’ गाडी बाजारात अवतीर्ण झाली आणि सगळीकडे तिचे ‘जय हो! जय हो..’ च्या थाटात स्वागत झाले. टाटांचे स्वप्न पूर्ण झाले, असेही म्हटले गेले. भारतात सर्वात मोठय़ा प्रमाणात असलेल्या मध्यमवर्गासाठी ही टाटांची अद्वितीय भेट आहे याबद्दल त्यांचे अभिनंदन! पण या नॅनोच्या आगमनाबरोबर संभाव्य अडचणींचाही साकल्याने विचार करण्याची गरज आहे. त्यातील प्रमुख म्हणजे वाहतूक समस्या!
आज शहरांमध्ये जागोजागी वाहतूक कोंडी होतेच आहे. नॅनोची किंमत पाहता मध्यमवर्ग मोठय़ा प्रमाणात दुचाकी सोडून या नॅनोकडे आकर्षित होणार आहे. सध्याचे रस्ते वाढत्या वाहनसंख्येला अपुरे पडणार आहेत. वाहतूक समस्या उपस्थित होऊ नये म्हणून वेळीच खबरदारी घेणे गरजेचे ठरणार आहे. काही वर्षांपूर्वी मध्यमवर्गीयांसाठी बाजारात मारुती कार आली होती. पण ती मागे पडली. आता नॅनोचा जमाना आहे. ती समाजातील ‘नॅनो उत्पन्न’ असलेल्या घटकांच्या आवाक्याबाहेर जाऊ नये, याची दक्षता उत्पादकांनी घ्यावी. नॅनोची विक्री उत्पन्नाचा दाखला बघून करावी. मध्यमवर्गाला यात प्राधान्य देण्यात यावे. प्रत्येक कुटुंबात चारचाकी वाहनांची संख्या किती हा निकषही नॅनो-विक्रीत असावा. मध्यमवर्गाचे कार खरेदीचे स्वप्न प्रत्यक्षात आणणारी ही नॅनो ‘दिवास्वप्न’ ठरू नये, ही अपेक्षा!
प्रसाद अग्निहोत्री, वाशी

स्तुत्य मोहीम
‘ग्लोबल वॉर्मिग’च्या विळख्यातून वसुंधरेची सुटका करण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी दिवे बंद करून ‘अर्थ अवर’ पाळण्याचे केलेले आवाहन हीे एक स्तुत्य मोहीम होती. परंतु ती सर्वव्यापी होणे गरजेचे आहे. या संदर्भात महाराष्ट्र शासन (पर्यावरण) सचिव वलसा आर. नायर-सिंग यांनी सुचविलेल्या शासकीय कृतिशील योजना अमलात याव्यात.
जागरूक, संवेदनशील नागरिक, ध्वनिप्रदूषणविरोधी ‘ग्रीन बिल्डिंग’ना मालमत्ताकरात सवलती देण्यास सुचविणाऱ्या शासकीय उपक्रमांची माहिती सर्वासाठी महत्त्वाची ठरेल. म्हणूनच ‘अर्थ अवर’ला शासकीय पातळीवरूनही पाठिंबा मिळायला हवा.
राम अहिवले, कांदिवली, मुंबई

किमान खारीचा वाटा उचला
संपूर्ण जगातील पर्यावरणप्रेमींनी २८ मार्च रोजी ‘अर्थ अवर’ पाळून जागृती मोहीम राबवली. ‘प्रत्येकाने स्वत:हून एक तास आपापल्या घरचा वीजपुरवठा बंद करून वीज वाचवावी,’ असे आवाहन या वेळी केले होते. मुंबईत अनेकांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला. पण काही ठिकाणी रहिवाशांनी, याबाबत आवाहन करणाऱ्यांना ‘तुम्ही अशी विनंती करू शकत नाही. इतकीच समाजसेवा करायची असेल तर तुम्ही स्वत:च्या घरातली वीज बंद करा’ अशी उलट उत्तरे देऊन आवाहनाची खिल्ली उडवली!
२६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्यात कित्येक महत्त्वाच्या व्यक्तींनी प्राणांची पर्वा न करता मुंबईचे रक्षण केले. आपल्यासाठी जवान सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा करतात. त्यांच्यामुळे आपण रात्री निवांत झोपू शकतो. मग जगासाठी आपण सामान्य एक तास वीज बंद ठेवून खारीचा वाटा उचलू शकत नाही का?
भावना मोर्ये, गोरेगाव, मुंबई

शिवसैनिकांचे अज्ञान की स्टंट?
२६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याच्या वकील म्हणून न्यायालयाने अ‍ॅड्. अंजली वाघमारे यांची नियुक्ती केल्यानंतर व त्यामुळेच वकीलपत्र घेण्यास अ‍ॅड्. अंजली वाघमारे तयार झाल्यानंतर त्यांना विरोध करत शिवसैनिकांनी अ‍ॅड्. वाघमारे यांच्या घरावर हल्ला केला. या प्रकरणातून शिवसैनिकांनी पुन्हा एकदा आपल्या अज्ञानाची प्रचीती दिली आहे.
आरोपीला जर स्वत:साठी वकील देता येत नसेल तर सदर आरोपीला न्यायालयाने वकील पुरवावा, असा कायदा आहे. कसाबला वकील मिळू न देणे म्हणजे कसाबला शिक्षा होण्यास विलंब करणे, हे शिवसैनिकांना माहीत नसावे. कसाबला फाशीची शिक्षा व्हावी, याविषयी दुमत नाही; पण मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींवर पुष्पवृष्टी करणारे देशप्रेमी कसे?
रजनीश कांबळे, वरळी

चुकीचा इतिहास सांगू नका!
‘गुढी पाडवा नवा-जुना’ हा वंदना जोशी-दुबे लेख (२७ मार्च) वाचला. त्यात ‘विक्रमादित्याने पैठणवर स्वारी केली आणि शालिवाहनाने विक्रमादित्याला नर्मदेपार पिटाळले’, असा चुकीचा उल्लेख केलेला आहे. भारतात प्राचीन काळापासून वायव्य सरहद्दीकडून परकीयांची आक्रमणे झाली. शक-कुशाणांचे जे आक्रमण झाले, त्यापैकी ‘शक’ टोळ्या दक्षिणेत आंध्रापर्यंत पसरल्या. त्यांच्याशी युद्ध करून शालिवाहन या पराक्रमी सातवाहन राजाने इ.स. ००७८ मध्ये म्हणजे १९३० वर्षांपूर्वी शक राजा नरपात याचा पराभव केला. (विक्रमादित्याचा नाही) शकांना नर्मदेपार पिटाळून दक्षिण भारत स्वतंत्र केला. त्यामुळे यंदा १९३१ शालिवाहन शक आहे. विक्रमादित्याने पैठणवर स्वारी केलेली नाही. विक्रमादित्याने नर्मदेतला सर्व प्रदेश शक-कुशाण आक्रमकांच्या तावडीतून सोडवला आणि शक-कुशाणांतक म्हणून त्याला भारतीयांनी गौरविले!
शालिवाहन आणि विक्रमादित्य दोन्ही भारतीय राजे होते. त्यांच्या यशोगाथेचे वंदना जोशींच्या लेखात विडंबन झाले. इतिहासाचा संदर्भ देताना लेखकांनी जरा अभ्यास केला तर बरे होईल. निदान नव्या पिढीपर्यंत चुकीचा संदेश तरी पोहोचणार नाही.
क्रांतिगीता महाबळ, दादर, मुंबई