Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९

सांगलीत जयंत पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वाचे लक्ष
सांगली, १ एप्रिल / गणेश जोशी

सांगली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसची उमेदवारी मंगळवारी विद्यमान खासदार प्रतीक पाटील यांना निश्चित झाल्यानंतर विकास महाआघाडीचे कर्तेकरविते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गृहमंत्री जयंत पाटील यांची आष्टा (ता. वाळवा) येथील एका फॉर्म हाऊसवर भेट घेऊन आशीर्वाद घेतले. जयंतरावांनी दिलेला शब्द पाळला, तर प्रतीक पाटील यांना ही निवडणूक अत्यंत सोपी ठरणार आहे, याविषयी कोणाचेही दुमत असायचे कारण नाही. परंतु वसंतदादा घराण्याला राजकारणातून संपविण्यासाठी जयंतरावांची ‘ओठात एक व पोटात एक’ अशी भूमिका असेल, तर मात्र ही निवडणूक ‘काटे की टक्कर’ ठरणार आहे.

कोल्हापूर, हातकणंगलेत राष्ट्रवादीचे शक्तिप्रदर्शन
कोल्हापूर, १ एप्रिल / प्रतिनिधी

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून संभाजीराजे छत्रपती आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून श्रीमती निवेदिता माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून आज दुपारी शक्तिप्रदर्शन करत वाजत गाजत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस आणि आर.पी.आय आठवले गटाचे पदाधिकारी उपस्थित होते. गांधी मैदान येथून सुरू झालेल्या रॅलीमध्ये सुमारे २० हजार कार्यकर्ते सहभागी झाले होते. तत्पूर्वी गांधी मैदान येथे झालेल्या जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना विक्रमी मताधिक्क्य़ाने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

दोन सराईत गुन्हेगारांचा व्हॅनमधून पलायनाचा प्रयत्न; पाठलागाने अटक
कोल्हापूर, १ एप्रिल / प्रतिनिधी

रस्त्यावरून एकटय़ा दुकटय़ा महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसका मारून पळवून नेणाऱ्या आणि अशाच गुन्ह्य़ांमध्ये सध्या कळंबा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या तिघांपैकी दोघा सराईत गुन्हेगारांनी आज सायंकाळी धावत्या पोलीस व्हॅनमधून बाहेर उडय़ा टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी आणि नागरिकांनी या दोघाही सराईत गुन्हेगारांना पाठलाग करून पकडले. हा थरारक प्रकार कळंबा रोडवरील नंगीवली चौकात घडला.या प्रकरणी या दोघा सराईत गुन्हेगारांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात कायदेशीर रखवालीतून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

संधीचे रूपांतर विजयात करू- प्रतीक पाटील
सांगली, १ एप्रिल / प्रतिनिधी

महाराष्ट्राचे कर्तेकरविते ज्येष्ठ नेते वसंतदादा पाटील यांचा राजकीय खंबीरपणा व निष्ठा या बळावरच सांगली लोकसभा मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळाली आहे. गेल्या तीन वर्षांत केलेल्या कामाची दखल घेऊन काँग्रेसने दिलेल्या या संधीचे आपण विजयात रूपांतर करू, असा विश्वास काँग्रेसचे उमेदवार खासदार प्रतीक पाटील यांनी व्यक्त केला.

वाजवा रे टाळ्या..
कोणत्याही सभेत टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला तर बोलणाऱ्या वक्तयास उत्साह (किंवा चेव) येतो. हमखास टाळ्या मिळवून देणारे वक्तव्य केले तरी समोरच्या प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या नाहीत, तर बोलणाऱ्यांची आणि व्यासपीठावर असणाऱ्यांची पंचाईत होते, प्रचारामध्ये अस्वस्थता येते. शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिरूर परिसरात एका प्रमुख उमेदवाराच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात प्रथम तालुका पातळीवरील वक्त्यांना बोलण्याची संधी देण्यात आली, नंतर जिल्हा पातळीवरील वक्ते बोलू लागले.

पक्षश्रेष्ठींचा निर्णय मान्य- विश्वजित
सांगली/ विटा, १ एप्रिल / प्रतिनिधी

उमेदवारी मिळो अथवा न मिळो. सांगली जिल्ह्य़ातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मी बांधिल आहे. दुष्काळी भागातील जनतेचे प्रश्न व विशेष करून पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मी जीवाचे रान करणार आहे. महसूलमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी काँग्रेसकडून जी अपेक्षा व्यक्त केली, ते त्यांचे व्यक्तिगत मत नसून जिल्ह्य़ातील तमाम काँग्रेसजनांची भावनाच त्यांनी व्यक्त केली आहे. काँग्रेस जो निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य असेल, असे मत काँग्रेसचे युवा नेते विश्वजित कदम यांनी व्यक्त केले. सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांची मते आजमावून घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत विश्वजित कदम बोलत होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रतापशेठ साळुंखे होते. याप्रसंगी आमदार अ‍ॅड. सदाशिवराव पाटील यांनीही मार्गदर्शन केले. या बैठकीत शहर काँग्रेसचे अध्यक्ष दत्तोपंत चोथे, युवक नेते आनंदराव पाटील, सुहास पाटील, संजय पवार, सुभाष सुर्वे, डॉ. विजय मुळीक, संभाजीराव देशमुख, ज्येष्ठ नेते हरिभाऊ खुजट व रामरावदादा पाटील यांच्यासह अनेकांची भाषणे झाली. यावेळी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. मच्छिंद्र कदम यांनी सूत्रसंचालन, तर अभिजित शिंदे यांनी आभार मानले.

पक्ष उमेदवारीचे अर्ज शनिवापर्यंत आवश्यक
सांगली, १ एप्रिल / प्रतिनिधी

सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांनी आपापल्या राजकीय पक्षाचे ए व बी फॉर्म नामनिर्देशन पत्र सादर करण्याच्या अंतिम दिवशी म्हणजे ४ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करणे निवडणूक आयोगाने बंधनकारक केले आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली असून नामनिर्देशन पत्र दाखल करतानाच उमेदवारांनी पक्षाचे ए व बी फॉर्म दाखल करावेत. नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळी ए व बी फॉर्म सादर केला नसल्यास उशिरात उशिरा ४ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत दाखल करणे गरजेचे आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशन पत्र सादर करण्याच्या आजच्या चौथ्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही. आज पाच व्यक्तींनी ११ अर्ज नेले. अशाप्रकारे आजअखेर ३४ जणांनी ७६ अर्ज नेले आहेत.