Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

सांगलीत जयंत पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वाचे लक्ष
सांगली, १ एप्रिल / गणेश जोशी

 

सांगली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसची उमेदवारी मंगळवारी विद्यमान खासदार प्रतीक पाटील यांना निश्चित झाल्यानंतर विकास महाआघाडीचे कर्तेकरविते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गृहमंत्री जयंत पाटील यांची आष्टा (ता. वाळवा) येथील एका फॉर्म हाऊसवर भेट घेऊन आशीर्वाद घेतले. जयंतरावांनी दिलेला शब्द पाळला, तर प्रतीक पाटील यांना ही निवडणूक अत्यंत सोपी ठरणार आहे, याविषयी कोणाचेही दुमत असायचे कारण नाही. परंतु वसंतदादा घराण्याला राजकारणातून संपविण्यासाठी जयंतरावांची ‘ओठात एक व पोटात एक’ अशी भूमिका असेल, तर मात्र ही निवडणूक ‘काटे की टक्कर’ ठरणार आहे.
काँग्रेसच्या उमेदवारीवरूनच पक्षात मतभेदांचे काहूर माजले. प्रत्येक निवडणुकीप्रमाणे महसूलमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी आपले बंधू मोहनराव व चिरंजीव विश्वजित यांच्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न केले. दिल्लीदरबारी पतंगरावांचा शब्द हा अखेरचा नसतो, हे पुन्हा स्पष्ट झाले व प्रतीक पाटील यांच्याकडे पुन्हा उमेदवारी आली. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी पतंगरावांची साथ नसताना आपण निवडणूक जिंकू शकता का, असा प्रश्न प्रतीक पाटील यांना विचारला होता. त्यावेळी चार वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत मोहनराव कदम यांना उमेदवारी नाकारल्यामुळे भिलवडी- वांगी विधानसभा मतदारसंघात पतंगरावांचे कट्टर समर्थक असलेल्या बंडखोर दिनकर पाटील यांना १५ हजाराचे मताधिक्क्य़ मिळाले असतानाही आपण ही निवडणूक जिंकली होती, असे त्यांनी दाखवून दिल्यानंतर प्रतीक पाटील यांना उमेदवारी मिळाली.
आता या निवडणुकीत काँग्रेसविरोधापेक्षा प्रतीक पाटील यांना खरा विरोध आहे तो काँग्रेसचा सहयोगी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच! या दोन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एकमेकांना साहाय्य करून आघाडीचे उमेदवार विजयी करण्याचे आव्हान करीत असले तरी या मतदारसंघात काँग्रेसमधीलच प्रतिथयश नेत्याला बंडखोरी करायला लावून राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसपुढे मोठे आव्हान उभे केले आहे. अशा पाश्र्वभूमीवर जयंत पाटील यांचे घेतलेले आशीर्वाद हे प्रतीक पाटील यांना ‘फासा पडेल तो डाव, राजा बोलेल तो न्याय’ या उक्तीप्रमाणेच ठरणार आहेत.
मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास प्रतीक पाटील यांना दिल्लीवरून पक्षश्रेष्ठींचा दूरध्वनी आला की ‘उमेदवारी तुम्हालाच!’ त्यानंतर त्यांनी विकास महाआघाडीचे सर्वेसर्वा जयंत पाटील यांची भेट घेतली व त्यांना साकडेच घातले. विरोधी आघाडीचे नेतृत्व जयंत पाटील यांच्याकडे असतानाच त्यांचे आशीर्वाद घेतल्याने राजकारणातील एक बाजी प्रतीक पाटील यांनी जिंकली खरी! पण ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले’ प्रमाणे निवडणूक प्रचाराच्या काळात जयंत पाटील आपली भूमिका ठेवणार का? याकडेच आता राजकीय धुरिणांचे लक्ष लागून राहिले आहे.
इतिहासाची पुनरावृत्ती!
इतिहासाची पुनरावृत्ती होते, हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. वसंतदादा पाटील यांचे विरोधक जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर जयंत पाटील हे राजकारणात सक्रिय झाले. त्यावेळी त्यांचे वय अवघे २२- २३ वर्षांचे होते. त्या काळात वाळवा तालुक्यात वसंतदादा गटाने राजारामबापूंच्या राजकारणाला अक्षरश जेरीस आणले होते. ग्रामपंचायतीपासून ते विधानसभेपर्यंत वसंतदादांनीच बाजी मारली होती. वाळवा तालुका सहकारी साखर कारखान्यातही असंतोष निर्माण केला होता. अशी राजकीय परिस्थिती असतानाही जयंत पाटील यांनी आपल्या राजकारणाचा श्रीगणेशा जनता पक्षातून करण्याऐवजी काँग्रेसमधून करावा व त्यांनी राष्ट्रीय प्रवाहात सामील व्हावे, यासाठी वसंतदादांनी जयंत पाटील यांची समजूत काढून त्यांची मुंबईत घेतलेली भेटच महत्त्वाची ठरली होती. यावेळी जयंत पाटील यांना दिलेला शब्द वसंतदादांनी अखेरपर्यंत पाळला होता.
वाळवा साखर कारखाना, वाळवा पंचायत समिती व विधानसभा मतदारसंघात यापूर्वीचे राजकारण विसरून जयंत पाटील यांच्यामागेच आपली ताकद उभी करण्याचा वसंतदादांनी दिलेला शब्द पूर्ण केला व त्यानंतरच जयंत पाटील यांचा राजकारणातील अश्वमेध हा सुसाट वेगाने धावतो आहे. आता जी परिस्थिती १९८४- ८५ ला जयंत पाटील यांच्याबाबतीत झाली होती, तशीच परिस्थिती वसंतदादांचे चिरंजीव प्रकाशबापू पाटील यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांचे नातू प्रतीक पाटील यांच्यावर येऊन ठेपली आहे. आता जयंत पाटील यांनी दिलेले आशीर्वाद व शब्द खरोखरच पाळले, तर काँग्रेसचे व वसंतदादा घराण्याचे सर्व काही ठिकठाक होईल, अशी चिन्हे दिसत आहेत. परंतु सध्याच्या राजकारणात ही शालिनता पाळली जाते की नाही? हे पाहणेही रंजक ठरणारे आहे.