Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

कोल्हापूर, हातकणंगलेत राष्ट्रवादीचे शक्तिप्रदर्शन
कोल्हापूर, १ एप्रिल / प्रतिनिधी

 

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून संभाजीराजे छत्रपती आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून श्रीमती निवेदिता माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून आज दुपारी शक्तिप्रदर्शन करत वाजत गाजत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस आणि आर.पी.आय आठवले गटाचे पदाधिकारी उपस्थित होते. गांधी मैदान येथून सुरू झालेल्या रॅलीमध्ये सुमारे २० हजार कार्यकर्ते सहभागी झाले होते. तत्पूर्वी गांधी मैदान येथे झालेल्या जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना विक्रमी मताधिक्क्य़ाने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
गांधी मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री.आर. आर.पाटील यांच्या उपस्थितीत संभाजीराजे छत्रपती आणि श्रीमती निवेदिता माने यांच्या प्रचाराचा शुभारंभ होणार होता. तथापि आर.आर.पाटील हे आलेच नाहीत. ते आज नाशिकच्या दौऱ्यावर गेले असल्याचे सांगण्यात आले. गांधी मैदान येथे श्रीमंत शाहू महाराज, राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ, बाबासाहेब कुपेकर, लेमनराव निकम, आर.के.पोवार, मालोजीराजे छत्रपती, के.पी.पाटील, राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार पी.एन.पाटील, प्रल्हाद चव्हाण, जि.प.अध्यक्ष नानासाहेब गाठ, आमदार सतेज पाटील, माजी मंत्री भरमूअण्णा पाटील, शिराळ्याचे श्री.नाईक, आर.पी.आय.चे प्रा.देशमुख आदी मंडळी उपस्थित होती. यावेळी दोन्ही उमेदवारांना विक्रमी मताने निवडून आणण्याचा निर्धार विविध वक्तयांनी व्यक्त केला. यावेळी मैदानावर सुमारे २० हजार कार्यकर्ते उपस्थित होते.
दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गांधी मैदान येथून भव्य रॅली सुरू झाली. एका उघडय़ा फुलांनी सजवलेल्या वाहनावर उमेदवार संभाजीराजे छत्रपती तसेच श्रीमती निवेदिता माने व अन्य पदाधिकारी उभे होते. या रॅलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह असलेल्या टोप्या घातलेले कार्यकर्ते वाद्याच्या तालावर नाचत होते. रॅलीच्या मार्गावर ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी केली जात होती. उमेदवारांच्या विजयाच्या घोषणा देत ही रॅली शहराच्या प्रमुख मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचली. रॅलीच्या मार्गावर अनेक ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती. ही कोंडी फोडण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस वाहनचालकांना पर्यायी मार्ग सुकर करून देत होते.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुन्हा एक छोटीशी सभा झाली. यावेळी विधानसभेचे सभापती बाबासाहेब कुपेकर यांनी सदाशिवराव मंडलिक यांचे नाव न घेता त्यांनी आमच्याबरोबर राजकारणाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावे असे आवाहन करताना येत्या दोन-तीन दिवसात या जिल्ह्य़ातील राजकीय चित्र स्पष्ट होईल असे सांगितले. राज्यमंत्री हसन मुश्रीफ यांचेही यावेळी भाषण झाले. नवी दिल्ली येथे संसद भवनाच्या प्रांगणात राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा उभा राहिला पाहिजे, यासाठी या जिल्ह्य़ातील सर्वपक्षीय मंडळींनी पुढाकार घेतला होता. आता याच राजर्षी शाहू महाराजांचे वंशज असलेले संभाजीराजे छत्रपती यांना संसदेमध्ये सर्वानी एक होवून पाठवू या. खरे तर संभाजीराजे छत्रपती यांना संसदेवर बिनविरोधच पाठवू या असे आवाहन हसन मुश्रीफ यांनी यावेळी केले.
दोन्ही उमेदवारांसह राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस आणि आर.पी.आय यांचे पदाधिकारी हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक अधिकारी कार्यालयात पोहोचले. त्यावेळी निवडणूक िरगण सोडणारे धनंजय महाडिक, त्यांचे चुलतबंधू अमल महाडिक, रामराजे कुपेकर हे तिघेजण दोन्ही उमेदवारांना शुभेच्छा देण्यासाठी तेथे पोहोचले. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक अधिकारी अशोक पाटील यांच्याकडे श्रीमती निवेदिता माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक अधिकारी विवेक आगवणे यांच्याकडे संभाजीराजे छत्रपती यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख
तसेच अतिरिक्त जिल्हाधिकारी तुकाराम कासार हे उपस्थित नव्हते. निवडणुकीच्या प्रशासकीय बैठकीसाठी ते दोघेही मुंबईस गेले असल्याचे सांगण्यात आले. आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.