Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

दोन सराईत गुन्हेगारांचा व्हॅनमधून पलायनाचा प्रयत्न; पाठलागाने अटक
कोल्हापूर, १ एप्रिल / प्रतिनिधी

 

रस्त्यावरून एकटय़ा दुकटय़ा महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसका मारून पळवून नेणाऱ्या आणि अशाच गुन्ह्य़ांमध्ये सध्या कळंबा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या तिघांपैकी दोघा सराईत गुन्हेगारांनी आज सायंकाळी धावत्या पोलीस व्हॅनमधून बाहेर उडय़ा टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी आणि नागरिकांनी या दोघाही सराईत गुन्हेगारांना पाठलाग करून पकडले. हा थरारक प्रकार कळंबा रोडवरील नंगीवली चौकात घडला.या प्रकरणी या दोघा सराईत गुन्हेगारांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात कायदेशीर रखवालीतून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
रघुनाथ बबन कांबळे,संभाजी निवृत्ती नाळे आणि सारंग चव्हाण हे तिघेही करवीर तालुक्यातील सांगरूळ या गावचे रहिवाशी आहेत. त्यांनी गेल्या कांही वर्षांत कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावून नेण्याचे अनेक गुन्हे केले आहेत. त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात अशा प्रकारचे १५ गुन्हे दाखल असून १३ गुन्ह्य़ांमध्ये त्यांना एकत्रित अशी दोन वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सध्या ते कळंबा मध्यवर्ती कारागृहात ही शिक्षा भोगत आहेत. उर्वरित दोन गुन्ह्य़ांच्या खटल्याचा निकाल प्रलंबित आहे. आज त्यांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते. प्रलंबित असलेल्या दोन खटल्यांचे निकाल ७ एप्रिल रोजी जाहीर करण्यात येतील असे न्यायालयाने घोषित केल्यानंतर आज सायंकाळी पोलीस गाडीतून या तिघाही गुन्हेगारांना कळंबा कारागृहात नेण्यात येत होते. यावेळी पोलीस गाडीमध्ये तीन पोलीस आणि एक महिला पोलीस असे चौघेजण होते.
मंगळवार पेठेतून गाडी पुढे जात असताना संभाजी नाळे याने माझ्या हातातील बेडी दुखते आहे अशी तक्रार केली. म्हणून त्याची बेडी सैल करण्याचा प्रयत्न करत असतानाच बेडीतून मुक्त झालेल्या संभाजी नाळे आणि सारंग चव्हाण यांनी पोलीस गाडीच्या दरवाजावर लाथा मारून दरवाजा उघडला आणि ते धावत्या गाडीतून बाहेर पडले. त्यानंतर हादरून गेलेल्या पोलिसांनी गाडी थांबवून पळून निघालेल्या या कैद्यांचा पाठलाग सुरू केला. महिला पोलीस कॉन्स्टेबल सुनंदा माधुरी चव्हाण यांनी धाडसाने पाठलाग करून संभाजी नाळे याला पकडले. त्याला खाली पाडले आणि त्याच्या छातीवर बसल्या. दरम्यान पठाण आणि मेस्त्री या दोन पोलिसांनी सारंग चव्हाणचा पाठलाग केला. नागरिकांच्या मदतीने त्यालाही अवघ्या कांही अंतरावरच पकडण्यात आले. पोलीस गाडीमध्ये असलेल्या रघुनाथ कांबळे याने मात्र पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही. त्यानंतर पोलिसांनी जुना राजवाडा पोलिसांना या घटनेची माहिती दिली. हा थरारक प्रकार सायंकाळी घडला तेंव्हा नंगीवली चौक परिसरात एकच खळबळ उडाली होती.